रावणदहनाचे आयोजक हे सिद्धू यांच्या निकटचे होते. त्यामुळे आयोजक निश्चिंत होते. ज्या वेळी नवज्योत कौर आल्या तेव्हा आयोजकांनी जाहीर केले की, मॅडम, रेल्वे रुळांवर बसलेले हजारो लोक आपल्यासाठी आले आहेत. येथून 500 गाड्या गेल्या, तरी ते तेथून हटणार नाहीत. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. याचा अर्थ हजारो लोक रेल्वे रुळांवर आहेत, हे आयोजकांना माहीत असूनही त्यांनी रुळावरून हटण्याचे आवाहन केले नाही. दरवर्षीच येथे रावणदहन होते व त्याची वेळ सायंकाळी साडेपाच ते सहाची असते. पण, यावेळी कार्यक्रम पावणेसात वाजता सुरू झाला. तत्पूर्वी, तेथे रामलीला आणि पॉप सिंगरचा कार्यक्रम झाला. त्यासाठी मोठमोठे एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते. त्यामुळे लोकांचे लक्ष तिकडे होते. रावणदहन झाल्यानंतर त्यातील फटाके फुटू लागले व लोकांच्या अंगावर येऊ लागले, तसतशी गर्दी मागे सरू लागली आणि ती गर्दीही रेल्वे रुळांवर आली. त्याच वेळी तेथून जालंधर-अमृतसर रेल्वेगाडी आली. ड्रायव्हरने जोराने हॉर्नही वाजविला. पण, फटाक्यांची आतशबाजी, धूर आणि जल्लोषामुळे तो अनेकांना ऐकूच आला नाही. अनेक लोक सेल्फी काढण्यात दंग होते. परिणामी 60 लोक चिरडले गेले. हेही स्पष्ट झाले की, या कार्यक्रमासाठी पोलिस बंदोबस्तच ठेवला गेला नव्हता. आयोजकांनीही स्वयंसेवक ठेवले नव्हते. घटना घडली तेव्हा नवज्योत कौर तेथेच होत्या. त्यांना पोलिसांनी संरक्षणात सुरक्षित स्थळी नेले. कौर मॅडमनी तर यासाठी लोकांनाच जबाबदार धरून, लोकं त्यांच्या चुकीमुळेे मेले, असे कोडगेपणाने बोलत आहेत. त्या क्षेत्राचे आमदार व वादग्रस्त मंत्री नवज्योतिंसग म्हणतात, आयोजकांनी वारंवार सूचना दिली होती की, रेल्वे रुळांवरून बाजूला व्हा. पण, हे खोटे असल्याचे आयोजकांच्या भाषणावरून स्पष्ट झाले. सिद्धूने आणखी अकलेचे तारे तोडताना सांगितले की, हे माझ्याविरुद्ध एक कटकारस्थान रचले गेले आहे. ‘तुका म्हणे ऐशा नरा, मोजून माराव्या पैजारा...’ आता या प्रकरणाची दंडाधिकारीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
या चौकशीतून जे काय तथ्य समोर येईल, ते येईल. काही जण आपला दोष लपविण्यासाठी रेल्वेवर खापर फोडीत आहेत. खरंच यात रेल्वे वा ड्रायव्हर जबाबदार आहे का? ट्रेन ड्रायव्हर अरिंवद कुमारचे लेखी बयाण आले आहे. ड्रायव्हरने सांगितले की, सर्वत्र धूर असल्याने समोरची गर्दीच दिसली नाही. जेव्हा दिसली त्या वेळी मी इमरजन्सी ब्रेक मारला. गाडीची गती कमी केली. जोरजोराने हॉर्न वाजविला. पण, गाडी थांबत असताना, लोकांनी गाडीवर जबरदस्त दगडफेक केली. जर गाडी थांबविली असती, तर ट्रेनमधील प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असता. गाडी पुढे जाताना गती 91 कि. मी. प्रतितास होती. मी इमरजन्सी ब्रेक मारून ती आधी 61 पर्यंत आणली. त्यानंतर गती हळूहळू कमी केली. गाडी जवळपास थांबतच होती, पण लोकांनी दगडफेक केली. त्यामुळे मी गाडी पुढे नेली. बयाण नोंदविताना संबंधित गाडीचे गार्डही होते. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले की, रावणदहनाच्या मैदानावर फक्त दोन हजार लोकच उभे राहू शकतील, एवढीच त्याची क्षमता होती. पण, तेथे जमले पाच हजार लोक. आम्हाला असा कार्यक्रम सात वाजता होत आहे, याची कोणतीही सूचना दिली गेली नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रश्न हा राज्याचा आहे. आमचा नाही. रेल्वे बोर्डाचे चेअरमन अश्वनी लोहाणा यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, यात रेल्वेचा काहीही दोष नाही. जनतेने रेल्वे रुळावर यायला नको होते. ज्या रेल्वे फाटकांचा उल्लेख आला आहे, ती दोन्ही फाटके बंद होती. दोन्ही फाटकांवर गेटमन होते. दुसरे म्हणजे अगदी रेल्वेच्या मेन लाईनजवळच रावणदहन होणार आहे, ही माहिती कुणीही रेल्वे प्रशासनाला दिली नाही. ज्यावर अपघात झाला, ती रेल्वेची मेन लाईन आहे. तेथे वेगाला नियंत्रण नसते. दर दहा मिनिटांनी तेथून गाड्या जातात, हे स्थानिक लोकांना माहीत आहे. असे असताना, ते रेल्वे रुळांवर कशाला आले? ड्रायव्हरला ग्रीन सिग्नल असल्याने त्याने रेल्वे पुढे नेली. काही लोकांनी गेटमनने लाल दिवा का लावला नाही, असा बिनडोक प्रश्न विचारला. गेटमनचे काम फक्त संदेश आला की, गेट उघडणे आणि बंद करणे एवढेच आहे. ऐनवेळी लाल दिवा लावण्याचे अधिकार त्याला नाहीत.
आता प्रश्न उरतो तो पोलिस विभागाचा. नियम असा आहे की, आधी स्थानिक प्रशासनाची जागेसाठी परवानगी घ्यावी लागते. नंतरच पोलिस देतात. महापालिकेकडून ती घेतली गेली नाही, असे मनपा आयुक्त सोनाली गिरी यांनी स्पष्ट केले आहे. मग पोलिसांनी कशाच्या आधारावर परवानगी दिली. मंत्र्यांच्या सांगण्यावरून? दिली तर बंदोबस्त का ठेवला नाही? या प्रश्नांवर पोलिस महासंचालकांनी तोंडाला कुलूप लावले आहे. सारे पोलिस अधिकारी मूग गिळून बसले आहेत. यावरून सर्वाधिक बेजबाबदारपणा हा पोलिस विभागाने दाखविल्याचे दिसत आहे. आता रावणदहन मंडळाचे सर्व आयोजक पळून गेले आहेत. त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. मुख्य आयोजक स्थानिक कॉंग्रेस महिला नगरसेवकाचा मुलगा आहे आणि मंत्री सिद्धूचा जवळचा कार्यकर्ता. यावरून एकच निष्कर्ष निघतो की, पोलिसांच्या अक्षम्य दिरंगाईमुळेच 60 निष्पाप जिवांचा नाहक बळी गेला. अनेक लोक आपल्या बालकांना सोबत घेऊन आले होते. त्यापैकी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांची तर अजून ओळख पटलेली नाही. आपल्या देशात एक विचित्र मानसिकता तयार झाली आहे. कोणतीही घटना घडली की, त्यासाठी समोरच्याला जबाबदार धरण्याची. स्वत:चे पाप मात्र लपवायचे. आपल्या देशात नागरी कर्तव्य काय असते, हे स्वातंत्र्यानंतर कधी शिकविलेच गेले नाही! अमृतसरमध्ये हेच घडले. नागरी कर्तव्याची जनतेला जाणीव असती, तर हा अपघातच घडला नसता!