जालंधर: केरळमधील बहुचर्चित नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल विरोधात साक्ष देणारे मुख्य साक्षीदार फादर कुरियाकोस कट्टुथारा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. यामुळे केरळमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी जालंधरच्या दासुआ येथील एका चर्चमध्ये कुरियाकोस यांचा मृतदेह सापडला. कुरियाकोस यांच्या मृत्यूचं नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
जालंधर येथील दासुआ सेंट मेरी चर्चमध्ये कुरियाकोस यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा सापडलेल्या नाहीत. त्यामुळे हि हत्या आहे कि आत्महत्या हे अजून स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
२०१४ ते २०१६ दरम्यान बिशप फ्रँको मुलक्कल याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित ननने केला होता. याप्रकरणी बिशप मुलक्कल यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बिशपविरोधात फादर कुरियाकोसे यांनी साक्ष दिली होती. परंतु नंतर बिशपला कोर्टाकडून जमीन मिळाला आहे. फादर कुरियाकोसे यांच्या संशयास्पद मृत्यूने या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/