२ मुठी तांदळापासून २ लाख सोबती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Oct-2018   
Total Views |



ज्यांच्याकडे हिंमत आणि साहस असते, तेच वेगळ्या उंचीवरील यशाला गवसणी घालू शकतात, हे आपण जाणतोच आणि फूलबासन यादवने आपल्या कार्यातून ते सिद्ध करूनही दाखवले.

 

एक वनवासी समाजातील महिला जी कधी पोट भरण्यासाठी दाण्या दाण्याला महाग होती, आज तिनेच लाखो महिलांना रोजगाराच्या संधी तर उपलब्ध करून दिल्याच पण, त्यांना स्वत:च्या पायावरही उभे केले. जिचा विवाह केवळ दहाव्या वर्षी खेळण्या-बागडण्याच्या वयात झाला, तीच महिला आज बालविवाहाच्या विरोधात समाजाशी धैर्याने सामना करत आहे. जो समाज कधीकाळी तिच्या दारिद्य्राची टवाळी करत असे, आज तोच समाज तिच्याबरोबरीने उभाच राहिलेला नाही, तर तिच्या एका आवाजावर कोणतीही गोष्ट करण्यासाठी एका पायावर तयारही आहे. कोण आहे ही महिला? कुठे राहते ही महिला? काय केले तिने? छत्तीसगढच्या राजनंदगाव जिल्ह्याच्या सुकुलदैहान गावात राहणारी फूलबासन यादव फक्त आपल्या जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात महिला सशक्तिकरणातील एक आदर्श मानली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असतानाही फूलबासनने मोठ्या जिकिरीने सातवीपर्यंत शिक्षण घेतले. दहाव्या वर्षी फूलबासनचा विवाह शेजारच्याच गावातील चंदूलाल यादवशी झाला आणि १३ व्या वर्षी तिने सासरी पाऊल टाकले. पती चंदूलालकडे ना काही जमीन होती ना कुठला रोजगार. चंदूलाल गुराखी होता. परिणामी, उत्पन्नही जेमतेमच होते. अशा बिकटसमयी फूलबासनला दोनवेळच्या अन्नासाठीही तरसावे लागे. कितीतरी दिवसच्या दिवस अक्षरशः भुकेने व्याकूळ होऊनही तिला पाणी पिऊन कसेतरी आयुष्य कंठावे लागले.
 

पोटात अन्नाचा कण नसलेल्या स्थितीत फूलबासनला शरीर झाकण्यासाठी साड्या वा पायांची निगा राखण्यासाठी साधी चप्पल मिळण्याचा विचारही करवत नसे. संसाराचा गाडा हाकता हाकता मुश्किलीने दिवस ढकलावे लागत असे आणि त्यातच वयाच्या २० व्या वर्षीच पदरी पडलेल्या ४ मुलांची जबाबदारी आलेल्या फूलबासनची बिकट अवस्था ती काय सांगावी? गरिबांचा वाली कोणीही नसतो, ही गोष्ट खरे म्हणजे फूलबासनशिवाय कोणी सांगू शकणार नाही. लोकांना तर आसपास कोणी गरिबीत जगणारा दिसला की, जणू काही खिल्ली उडवण्यासाठी एखादे खेळणे मिळाल्यासारखेच वाटते. तसेच फूलबासनबाबतही झाले. मदत करण्याऐवजी फूलबासन चेष्टेचा विषय झाली. आर्थिक तंगीत पुढे सरकणाऱ्या आयुष्यात भुकेने बेहाल झालेली चार मुले रडत-खडत जमिनीवर लोळू लागत. पण ज्याच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, ती व्यक्ती कोणतेही धाडस करायला मागेपुढे पाहत नाही, असे म्हणतात. फूलबासननेही तसेच केले आणि ती इतरांसाठी एक उदाहरण म्हणून समोर आली. फूलबासनने रात्रंदिवस, उन्हापावसाची पर्वा न करता २००१ साली ‘माँ बम्बलेश्वरी’ स्वयंसाहाय्यता गटाची सुरुवात केली. पहिल्याप्रथम तिने ११ महिलांच्या सोबतीने दोन मुठी तांदूळ आणि दोन रुपये जमा करायला चालू केले. पण कोणत्याही चांगल्या कामाला विरोध करणारी मंडळी जशी नेहमीच कुठूनतरी टपकतात, तशीच ती फूलबासनच्या कामाला विरोध करण्यासाठीही उगवलीच. गावकर्यांच्या डोळ्यात तिचे चांगले काम सलू लागले व गावकरी तिच्या विरोधात उभे ठाकले. एवढेच नव्हे, तर तिला तिच्या नवऱ्यानेही साथ दिली नाही. पतीच्या विरोधामुळे फूलबासनला कितीतरी रात्री घराबाहेरही काढाव्या लागल्या पण, ज्यांच्याकडे हिंमत आणि साहस असते तेच वेगळ्या उंचीवरील यशाला गवसणी घालू शकतात, हे आपण जाणतोच आणि फूलबासनने ते सिद्ध करूनही दाखवले.

 

आज राजनंदगाव जिल्ह्याच्या जवळपास सर्वच गावागावांत तिने सुरू केलेल्या महिला संघटना आढळतात. या संघटना महिलांना स्वावलंबी करण्यापासून ते त्यांची आर्थिक दशा सुधारण्यासाठीचीही कामे करतात. शिक्षण, चांगुलपणा आणि स्वच्छतेच्या विचारांना घेऊन पुढे जाणाऱ्या फूलबासनने महिलांना लोणची, चटण्या, पापड, अगरबत्ती, वॉशिंग पावडर, मेणबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले व आता ‘बम्बलेश्वरी ब्रॅण्ड’च्या नावाने तयार केलेली ही उत्पादने ३०० पेक्षा अधिक ठिकाणी विकलीही जाऊ लागली. जिल्ह्यातील महिला आत्मनिर्भर व्हाव्यात, त्यांच्या मनातील भीती जावी म्हणून फूलबासनने त्यांना सायकल चालवायला शिकवले. गावागावांतील महिलांच्या सहकार्याने दारूबंदीसाठी पुढाकार घेत आंदोलनेही केली. आंदोलनाचा परिणाम होऊन आज राज्यातील ६५० गावांत दारूबंदी झाल्याचे दिसते. सुमारे राज्यातील ६०० गावे अशी आहेत जिथे आता बालविवाह होत नाहीत, हे फूलबासनचेच कर्तृत्व. फूलबासनच्या संघटनेशी आज तब्बल दोन लाख महिला जोडलेल्या आहेत आणि तिच्या संघटनेने सरकारी मदतीशिवाय २५ कोटींपेक्षा अधिक रक्कमही जमा केलेली आहे. ज्याचा उपयोग सामाजिक कामासाठी केला जातो. केवळ गरीब मुलींचा विवाहच नव्हे, तर मुली-महिलांच्या शिक्षणासाठीही उपाय योजले जातात. सोबतच महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी कमीतकमी व्याजावर शेती, कुक्कूटपालन, शेळीपालन आणि रोजगाराच्या अन्य साधनांसाठी कर्जही दिले जाते. शिवाय २००१ सालापासून फूलबासन यादव यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय निःशुल्क स्वच्छता अभियान चालवले, हे विशेष. २०० महिलांच्या श्रमदानातून त्यांनी कित्येक शौचालयांचीही निर्मिती केली. ‘माँ बम्बलेश्वरी जनहितकारी समिती’च्या नेतृत्वाखाली या परिसरात स्वच्छता, वृक्षारोपण, जलसंरक्षण, रक्तदानविषयक जनजागृती मोहीमही राबविण्यात येते. दारिद्य्रात खितपत पडलेली महिला एकदा ठरवले की, काय काय करू शकते हे फूलबासनच्या कार्याकडे पाहिले की तात्काळ समजते. केंद्र सरकारने फूलबासनच्या याच कार्याची दखल घेऊन २०१२ साली त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही गौरविले व आजही त्यांचे कार्य तसेच सुरू आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@