
अमृतसर : रेल्वे रुळावर उभे राहून रावण दहन पाहणाऱ्या नागरिकांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी दिले आहेत. पुढील चार आठवड्यात पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातग्रस्त ठिकाणाची त्यांनी आज पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
पुतीन यांच्याकडून शोक व्यक्त
या भीषण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला आहे. या भीषण दुर्घटनेची आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील दखल घेतली गेली असून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनीही दुर्घटनेवर शोक व्यक्त केला. त्याचबरोबर पंजाबमध्ये एक दिवसाचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
ते तर ‘घुसखोर’
या भीषण दुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेले व जखमी हे रेल्वेचे प्रवासी नव्हते. तर ते ‘घुसखोर’ असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे. त्यामुळेच रेल्वेकडून या मृतांना व जखमींना कोणतीही नुकसान भरपाई दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री पियूष गोयल अमेरिका दौरा सोडून भारतात परतणार आहेत.
अपघातग्रस्तांना मदत
पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये व जखमींवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
काय आहे घटना?
अमृतसह येथील जौडा फाटकाच्या बाजूला दसऱ्यानिमित्त रामलीला आणि रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाजूला असलेल्या रेल्वे रुळांवर उभे राहून लोक हा कार्यक्रम पाहत होते. अमृतसर येथून हावडा मेल आली त्याच वेळी दुसऱ्या बाजूनेही दुसरी रेल्वे आली. त्यामुळे लोकांना नेमके कोणत्या बाजूला पळावे हे समजले नाही. त्यानंतरच्या दुर्घटनेत ६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/