तृणमूली गुंडांची ‘ममतागिरी’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018   
Total Views |

 

 

 
 
 
तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी पश्चिम बंगालमध्ये सर्वसामान्य नागरिकांवरील अन्याय-अत्याचार आणि हल्ल्याचे सत्र सुरूच ठेवल्याचे ताज्या घटनाक्रमातून दिसते. उत्तर प्रदेशात पोलिसांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या व संबंधित पोलीस कर्मचार्‍यांविरोधात कारवाईला सुरुवात केलेल्या विवेक तिवारी प्रकरणाचा गाजावाजा सर्वच माध्यमांत होत असताना त्यांचे पश्चिम बंगालकडे मात्र नेहमीसारखे दुर्लक्ष झाले. अर्थात, मागच्या १०-१५ दिवसांत पश्चिम बंगालमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन विद्यार्थी कार्यकर्त्यांचा बळी गेल्यावरही जशी सुस्ती माध्यमांनी दाखवली, तशीच आताही दाखवली. कारण, गुन्हा करणारे तृणमूल काँग्रेसचे गुंड होते आणि पीडित गरीब सर्वसामान्य हिंदू. पश्चिम बंगालच्या धनियाखालीमध्ये राहणाऱ्या हरीभक्त मंडल या युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र आपल्या फेसबुक अकाऊंटद्वारे पोस्ट केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. हरीभक्तची ही कृती सहन न झाल्याने तृणमूल काँग्रेसचे गुंड कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी तात्काळ हरीभक्तचे घर गाठले. घरी गेल्या गेल्या त्यांनी हरीभक्तला व त्यांच्या पालकांना लाथाबुक्क्यांनी बुकलून काढायला सुरुवात केली. परिणामी सर्वांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. हरीभक्त व त्याच्या पालकांना रुग्णालयात नेल्यानंतरही तृणमूलच्या गुंडांनी तिथेही आपली लायकी दाखवली. तहान लागल्याने हरीभक्तच्या आईने पाणी मागताच, “आम्ही इथे ममता बॅनर्जींचे, तृणमूल काँग्रेसचे कार्य करण्यासाठी आलो आणि ही बाई काय पाणी मागते,” असा विचार करून हरीभक्तच्या आईचा राग आलेल्या तृणमूल कार्यकर्त्यांनी तात्काळ आपल्या अमानुषतेचे दर्शन घडवले. पाणी मागणाऱ्या हरीभक्तच्या आईवर मूत्रविसर्जन केले आणि तेच मूत्र प्यायला दिले. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र फेसबुक अकाऊंटवर अपलोड केल्याने ममतांच्या राज्यात सर्वसामान्यांवर असे हल्ले होत असतील तर आता देशातल्या जनतेनेच सांगावे, नेमकी आणीबाणी कुठे आहे? कारण मोदी व भाजपवर आणीबाणी लादल्याचा आरोप तर मोठ्या तावातावाने विरोधकांकडून केला जातो. पण, खरी आणीबाणी तर नेमकी विरोधकांच्या सत्ताक्षेत्रातच चालू आहे, ज्याचा अनुभव त्या त्या राज्यातले नागरिक घेत आहेत. ममता बॅनर्जींना रोहिंग्यांचा आणि बांगलादेशी घुसखोरांचा नेहमीच पुळका येतो, आता आपल्याच राज्यातल्या एका सर्वसामान्य व्यक्तीचा आणि त्याच्या आईचा विचार करण्याची, त्यांना न्याय देण्याची बुद्धी ममतांना होईल का?
  

नक्षलग्रस्त भागातबासिंग सिलेमा

 

नक्षलग्रस्त भाग म्हटला की, डोळ्यासमोर उभा राहतो तो दुर्गम, डोंगराळ, जंगली भाग. भारतातील बहुतांश नक्षली आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ, मध्य प्रदेशातल्या जंगली भागातूनच आपल्या काळ्या कारवाया करतात. नक्षल्यांच्या अन्याय-अत्याचाराचे पहिले बळी कोण असतील तर ते तिथे राहणारे वनवासी. वर्षानुवर्षे जंगलालाच आपले घर, परिवारातील सदस्य मानत असलेल्या वनवासींचे प्रश्न, अडीअडचणी, समस्यांची सोडवणूक करण्याच्या नावाखाली नक्षल्यांनी खरे म्हणजे वनवासी बांधवांनाच देशोधडीला लावण्याचा कित्ता गिरवला. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि नक्षलवादी, माओवादी विचारसरणीच्या प्रचार-प्रसारासाठी वनवासींचा वापर करून घेण्यात हातखंडा असलेल्या ‘लाल सलाम’वाल्यांनी वनवासींपर्यंत ना सरकारी योजना पोहोचू दिल्या ना कोणता विकास प्रकल्प. म्हणूनच नक्षलग्रस्त भागात कोणत्याही आधुनिक सोयी-सुविधा पोहोचू शकल्या नाहीत. शहरातल्या मनोरंजनाच्या गोष्टी तर नक्षलग्रस्त भागात पोहोचणे आणि नक्षल्यांच्या दहशतीला न जुमानता त्या सुरळीतपणे चालणे तसे अवघडच. पण, आता छत्तीसगढमधून एक नवीनच उदाहरण समोर आले आहे. मनोरंजनासाठी केवळ आठवडी बाजाराचेच साधन असलेल्या नक्षलग्रस्त आणि वनवासीबहुल भागात नुकतेच एक चित्रपटगृह बांधण्यात आले असून त्याचे गेल्या गुरुवारीच उद्घाटनही करण्यात आले. छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात पोलिसांच्या सहकार्याने १०० आसनांचे छोटेखानी चित्रपटगृह सुरू करण्यात आले असून ‘बासिंग सिलेमा’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. वनवासी समाजाने बाहेरील जगाशी जुळावे, नव्या जगाची माहिती करून घ्यावी म्हणून या चित्रपटगृहाची निर्मिती करण्यात आली असून तिथे शुभारंभालाच ‘बाहुबली’ चित्रपट दाखविण्यात आला. नारायणपूरच्या पोलीस अधीक्षकांनी हे चित्रपटगृह सुरू करण्यात पुढाकार घेतला होता. पोलिसांचा हा प्रयत्न खरे म्हणजे कौतुकास्पदच. त्याचबरोबर नक्षलवाद्यांना, तुम्ही कितीही उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न केले तरी आम्ही पाय रोवून ताठ मानेने उभेच राहू, हा संदेश देणाराही. छत्तीसगढमध्ये भाजपचे सरकार आल्यापासून आणि केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून देशातल्या सर्वच भागातील नक्षलवादी चळवळ कमजोर होत गेली. नक्षल्यांच्या आणि त्यांच्यामागे उभे राहणाऱ्या कथित विचारवंत, बुद्धीजीवींच्या मुसक्या आवळल्याने हे शक्य झाले. त्यामुळेच आजचे हे चित्रपटगृहाचे उद्घाटन नक्षल्यांचा अवकाश आकसत असल्याचेच दर्शवणारे, असेच म्हणावे लागेल.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@