आयुर्वेदाचे ज्ञान घरोघरी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Oct-2018   
Total Views |


 


पारंपरिक अमूल्य आयुर्वेदशास्त्राची मूल्यता समाजाच्या प्रत्येक स्तरांपर्यंत पोहोचायला हवी. हे ज्ञान खासकरुन वनवासींपर्यंत पोहोचावे यासाठी अरविंद देवधर दुर्गम भागात कार्यरत आहेत.


१९७०चं दशक असेल. रा. स्व. संघाचे बौद्धिक होते. नाना ढोबळे स्वयंसेवकांना म्हणाले,”विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात संघाच्या कामामध्ये सहभाग नोंदवायला हवा.यावर समोर बसलेल्या स्वयंसेवकांपैकी काही स्वयंसेवकांनी प्रतिक्रिया दिल्या, “नि:स्वार्थीपणे कितीही समाजासाठी काम केले तरी, लोकांना त्याची किंमत नाही. आपण समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र काम करतो, पण समस्या वाढतच जातात आणि लोक त्यावर गंभीरपणे विचारही करत नाहीत आणि जी लोकं समस्यांवर काम करतात त्यांना सहकार्यही करत नाहीत. मग विद्यार्थी आणि तरुण संघाचे काम करायला कसे तयार होतील?” हे सगळं नानांनी शांतपणे ऐकून घेतले आणि ते म्हणाले, “समस्या नसत्या किंवा आपलेच समाजबांधव त्रासात नसते, तर मग संघाचे काम करावेच लागले नसते. समस्या आहेत आणि समाजबांधव आपलेच आहेत, म्हणूनच तरुणांनी समाजासाठी काम करायला हवे.नाना ढोबळे सांगत होते. त्यांचे म्हणणे ऐकून अरविंद देवधर नावाच्या तरुणाची जीवनदिशाच बदलली. ‘समाजबांधव आपले आहेत आणि समस्या आहेतच, मग त्या दूर करण्यासाठी आपल्यापरीने काम करायचे,’ हा विचार घेऊन अरविंद समाजात वावरू लागले.

 

मुळचे रत्नागिरीचे देवधर कुटुंब, पुढे बडोद्यात स्थायिक झाले. नंतर मुंबईत आले. मुंबईत देवधर महानगरपालिकेत कामाला लागले. पुढे साताऱ्यात त्यांची बदली झाली. या सगळ्या स्थित्यंतरात अरविंदचे आयुष्य घडत होते. पोटापुरतेच उत्पन्न देवधर कुटुंबीयांचे होते. पण, आर्थिकतेच्या कमकुवतेपायी देवधर कुटुंबाने कधी रडगाणे गायले नाही. अरविंद सांगतात, “मुलांनी शिकावे, यासाठी ते म्हणायचे, आपल्याकडे ना जमीन, ना जुमला, ना वडिलोपार्जित संपत्ती, शिक्षण हीच आपली संपत्ती आणि मान. शिक.” अरविंद यांना वडिलांचे म्हणणे मनोमन पटले. घरात मुळात सुसंस्कृत वातावरण. वडिलांना शास्त्रीय गायनाची आणि व्यायामाची आवड. आर्थिक उत्पन्न हातातोडाशी मिळते असले तरी, गरीब-गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, विवाहासाठी, नवीन घर उभारण्यासाठी मदत करत. आईला तिच्या आईकडून वैद्यकीचा वारसा मिळालेला होता. तिला शेजारीपाजारी ‘आजीबाईचा बटवा’ म्हणत. दुर्धर आजारांवरही ती उपचार करायची. घरी ज्ञानेश्वरीचे पठण तर नित्य नियमित होत असे. अध्यात्म होते, पण, ते सामाजिक होते. देवदेव करा पण, घरच्या आईबाबांकडे, आजीआजोबांकडे दुर्लक्ष कराल, तर देव पावणार नाही ही घरची शिकवण. या वातावरणात अरविंद घडले.

 

महाविद्यालयीन जीवनात ‘अभाविप’चे कार्यकर्ते झाले. पुढे बी.फार्मसी शिकून नोकरीसाठी मुंबईला नोकरीसाठी आले. आईकडे असलेले आयुर्वेदाचे ज्ञान परंपरेने त्यांच्याकडे आले होते. अॅलोपॅथी शास्त्रातील औषधोपचार, गोळ्या बनवणाऱ्या कंपनीत काम करतानाही त्यांनी आयुर्वेदशास्त्राचा अभ्यास वैयक्तिक स्तरावर सुरू ठेवला. काम करता करता अरविंद यांनी नाना टिळक, अप्पा साठे, तात्या करंबेळकर या ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या मदतीने श्री साप्ताहिकी शाखा सुरू केली. १९८२ कष्टकरी युवकांसाठी संघाची ही रात्र शाखा सुरू झाली.१९८२पासून आजतागायत अरविंद हे डोंबिवलीच्या संभाजी प्रभात शाखेचे कार्यवाह आहेत. का? यावर त्यांचे म्हणणे, “एक तासाची शाखा उरलेल्या २३ तासांत माणसाने कसे जगावे याची प्रेरणा देते.” असो, अरविंद यांच्या जडणघडणीचा इतका तपशील द्यायचे; कारण आज एका फार्मसी कंपनीतून निवृत्त होऊन अरविंद एक वेगळेच सेवाकार्य करत आहेत. अरविंद अॅलोपॅथीचे किंवा आयुर्वेदाचेही डॉक्टर नाहीत. पण, डहाणू ते पनवेल, मुंबई-ठाणे वगैरे भागांतून हजारो लोक अरविंद यांच्याकडे येतात. अरविंद सांगतात, “मी येणाऱ्या सगळ्यांना सांगतो की, मी कोणतेही प्रमाण शिक्षण घेतलेला डॉक्टर नाही. आजीकडे पारंपरिक आयुर्वेदिकज्ञान होते आणि ती शेजाऱ्यापाजार्यांना ‘आजीबाईचा बटवा’ म्हणून उपचारही करायची. परंपरेने आईकडे ते ज्ञान आले. आईकडेही लोक उपचारासाठी यायचे. आईमुळे ते माझ्याकडे आले. त्या पारंपरिक ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करायलाच हवा.

 

मूळव्याध, मोतीबिंदू, मूत्रविकार, स्नायूंचे विकार अशा कितीतरी आजारांवर अरविंद आयुर्वेदिक उपचार करतात. स्वयंपाकात नित्यनियमाने वापरात असलेल्या घटकांचा वापर करूनही ते आजार बरे करतात. अगदी शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे, अशा दुर्धर आजारांवरही आयुर्वेदाकडे उत्तर आहे आणि आपण सप्रमाण हे सिद्धही करू शकतो, असे अरविंद यांचे म्हणणे आहे. अरविंद त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला ‘आजीबाईचा बटवा’ म्हणून आयुर्वेदाधारीत औषध देतातच पण, ज्यांना कुणाला या औषधांबाबत माहिती करून घ्यायची आहे किंवा दुर्धर आजार, आधुनिक जीवनशैली आणि आयुर्वेदसमजावून घेत पारंपरिक आयुर्वेदपद्धतीने कसे उपचार करता येतील याची माहिती करून घ्यायची आहे, त्यांना ते आठवड्यातून दोनवेळा विनामूल्य मार्गदर्शन करतात. यामागे हेतू हा की, समाजामध्ये वस्तीपातळीवर आरोग्यावर विचार आणि उपचार करणारे आरोग्यदूत निर्माण व्हावेत. आरोग्यक्षेत्रात आयुर्वेदाचे ज्ञान जनसामान्यात रूजावे. ज्ञानकौशल्याचा विनमय समाजबाधंवासाठी करणारे अरविंद देवधर!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@