दहशतीचा तो काळ आठवला की, अजूनही अंगावर शहारे येतात... चोपड्याचे पितामह, संघ कार्यकर्ते विठ्ठलदास गुजराथी यांच्या रोमहर्षक आठवणी : संघ विचाराला बळ मिळो!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |

 

दहशतीचा तो काळ आठवला की, अजूनही अंगावर शहारे येतात...
 
चोपड्याचे पितामह, संघ कार्यकर्ते विठ्ठलदास गुजराथी यांच्या रोमहर्षक आठवणी : संघ विचाराला बळ मिळो!

 
चोपडा, १७ ऑक्टोबर
आणीबाणीतील ते भयावह दहशतीचे दिवस आठवले की, आजही अंगावर शहारे येतात. पत्नीची प्रकृती आणि मुलं लहान यामुळे घरच्यांच्या काळजीने मनोधैर्य टिकवणे अवघड जायचे. अशी आठवण आहे, ८७ वर्षीय विठ्ठलदास गुजराथी (तभा विठ्ठलभाई ‘व्ही.सी.अंकल’ ) यांची.चोपडा शहराच्या समाज, धर्म आणि राजकारणाचे ते पितामह आहेत. शांत, रमणीय परिसरातील आणि जुन्या आकर्षक वास्तू रचनेचे ‘ओमनिवास’, डॉ.हेडगेवार चौक, गुजराथी गल्ली चोपडा हे त्यांचे निवासस्थान...त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९३१ चा. तत्कालीन मॅट्रिक ते उत्तीर्ण आहेत.
 
 
विविध प्रकारचे भारतीय खेळ आणि संघकार्य अर्थात समाजाची निरपेक्ष सेवा हा त्यांचा जणू छंदासारखा जीवनाचा अभिन्न भाग आहे. बालपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. विशेष उल्लेखनीय म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० जानेवारी १९४८ ला म.गांधीजींची हत्या झाली, त्यावेळी तत्कालीन कॉंग्रेस सरकारने संघावर बंदी घातली. त्या काळात नवयुवक असलेल्या त्यांना अटक करीत साडेतीन महिने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावत नाशिकला कारावासात ठेवण्यात आले होते.
 
 
१२ जून १९७५ ला अलाहादाबाद उच्च न्यायालयाने निकाल दिला आणि पंतप्रधानपद न सोडताच इंदिरा गांधींनी २५ जूनला सत्तालोभापायी देशात आणीबाणी घोषित करीत संघासह विरोधी पक्षांच्या हजारो कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांना तुरुंगात डांबले.साहजिकच संघाने या हुकूमशाहीला विरोध केला. तेव्हा ४८ ची जुनी यादी काढून विठ्ठलभाईंना अटक करण्यात आली. अर्थात आपल्याला अटक होणार, अशी मनाची तयारी होतीच. ते धुळ्याला असताना अटक होणार असे कळाले. चोपड्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक टी.जी.पाटील यांनी आधीच मालमत्ता जप्तीची धमकी दिली होती. अटक वॉरंटपत्र एकाच पाकिटाद्वारे बजावण्यात आले, त्यात त्याच्यासह नजीकच्या धनवाडीचे माधवराव कौतिक चौधरी, (नंंतर आमदार), रामभाऊ छगन सोनार, पद्मसीभाई शाह यांचेही नाव होते.(दुर्दैवाने सध्या हे तिघे स्वर्गवासी) घरी आल्यावर त्यांनी अटक करवून घेतली. त्यांचे ज्येष्ठ बंधू स्व. नारायणदास (राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई यांचे श्‍वसूर) हे संघात सक्रिय आणि पुतणे अरविंद किसनदास गुजराथी हे तालुका संघचालक होते. त्यावेळी विठ्ठलभाईंचा शेती हाच चरितार्थाचा व्यवसाय आणि पत्नी माणकबाई, ४ मुली, २ मुले असा परिवार होता. सध्या चि. प्रवीण आणि सून सौ. रमा त्यांच्यासोबत आहेत, नात सौ. छाया रवींद्र गुजराथी यांचे सासर चोपड्यातच आहे. धाकटा ज्योतीकुमार नोकरीनिमित्त मुंबईत स्थायिक आहे. नाशिक कारागृहात २३९ दिवस असताना त्यांना प्रांत संघचालक स्व. बाबाराव भिडे, ज्येष्ठ नेते प्रल्हादजी अभ्यंकर, डोंबिवलीचे नगराध्यक्ष श्रीपादराव (आबासाहेब) पटवारी, पुण्याचे गिरीश बापट (विद्यमान मंत्री), तत्कालीन जनसंघाचे आमदार गुहागर-रत्नागिरीचे डॉ. नातू, अप्पासाहेब गोगटे, बबनराव लोहकरे आणि चोपड्याचे सर्व कार्यकर्ते होते. रोज सकाळी व सायंकाळी संघशाखा, योगासने, विविध खेळ, दुपारी चर्चासत्र-बौद्धिक आणि वाचनालयातील निवडक ग्रंथ संपदेचे वाचन असा दिनक्रम होता. मात्र, पत्नीचा पोटदुखीचा त्रास, घरच्यांची आठवण आणि काळजी यामुळे मनोधैर्य टिकवून ठेवणे अवघड होते. दरमहा घरच्यांची भेट व्हायची. ते वृत्तपत्र वाचण्यास देण्याचे निमित्त करून सहज खाता येणारे पदार्थ आणत. पुढे चांगल्या वर्तणुकीचा दाखला देत त्यांना जुलै ७६ च्या आदेशानुसार त्यांची मुक्तता करण्यात आली. ते स्वखर्चाने घरी परतले, बस स्टँडवर चौघे नातलग आले होते.
 
राम मंदिराचे निर्माण, माझा शेवटचा श्‍वास...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा समाजकल्याणाचा आणि राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचा, देशाला परम् वैभवाला नेण्याचा विचार सर्वच समाजबांधवांनी पुढे न्यावा. या विचारांचा जर आचरणयुक्त पुरस्कार भारतीय जनता पक्ष करीत असेल तर सर्वसामान्य जनतेने बळ द्यायला हवे. कट्टर राष्ट्रभक्त आणि निर्मोही, चारित्र्यसंपन्न नरेंद्र मोदींना देशाने पुन्हा पंतप्रधान करायला हवे. सरसंघचालक पूज्य मोहनजी भागवत यांच्या देश घडविण्याच्या प्रयत्नांही साथ मिळावी. ‘राम मंदिराचे निर्माण झाल्याशिवाय माझा श्‍वास शेवटचा श्‍वास ठरू नये’ अशीही त्यांची प्रभू रामचंद्राकडे आर्त विनवणी आहे.
 
नातलगांनी लक्ष दिले...
मोठे चि. प्रवीण हे मॅट्रिकचे विद्यार्थी. त्यांच्यावर शेती, घराची अनपेक्षित जबाबदारी आली. त्यांनी पोरसवदा वयात ही यथाशक्ती सांभाळली, पण दुर्दैवाने शेतीत नुकसान आलेच. या बिकट काळात बंधू स्व.कांतीलाल, चंदूशेठ (किसनदास द्वारकादास), नारायण, वल्लभ, गिरधरशेठ (माजी नगरसेवक) यांनी परिवाराला शक्ती देत त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवले.
 
संघ विचारांचा प्रभाव...
आणीबाणी उठल्यावर झालेल्या निवडणुकीत त्यांनी जोरदार सहभाग दिला. जनतेच्या संतापाचा परिणाम लोकसभेला चाळीसगावचे सोनूसिंग पाटील निवडून आले तर चोपडा विधानसभा जागेवर धनवाडीचे माधवराव कौतिक चौधरी हे विजयी झाले. जनतेचा संघ विचारांवर विश्‍वास कायम असून भाजपला त्याचा लाभ होत आहे.
 
संस्थांची धुरा आणि वाटचाल, उत्कर्षाचे साक्षीदार
विठ्ठलभाईंनी लढावू कार्यकर्ते म्हणून अनेकदा कारावास भोगला आहे. संघ, विश्‍व हिंदू परिषद, सहकार भारती, भारतीय किसान संघ, ग्राहक पंचायत कार्यात ते अनेक वर्ष अग्रणी राहिले. विख्यात नगरवाचन मंदिराचे सचिव राहिले. वाचनालयाच्या शतक महोत्सवाला १९८५ मध्ये अटलजी आले असता त्यांचे स्वागत करण्याचा मान त्यांना मिळाला. होमगार्डचे अधिकारी, रेडक्रॉस चोपडा शाखा, दूध संस्था, चोपडा पीपल्स बँक यांचे काही काळ अध्यक्ष, चोपडा-कसबे वि.का.सोसायटीचे ४५ वर्ष अध्यक्ष, तोट्यातील संस्था नफ्यात आणून स्ववास्तू उभारण्याची कामगिरी, रथोत्सव, वहनोत्सव आयोजक आणि १५५३ ला स्थापित व्यंकटेश बालाजी संस्थानचे विद्यमान अध्यक्ष (सध्या १ कोटीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू) आसकरण ताराचंद रक्तपेढीच्या स्थापनेत पुढाकार, गतवर्षीच १०० वर्षे पूर्ण केलेल्या प्रताप विद्यामंदिराची मातृसंस्था चोपडा एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@