एरंडोल, १७ ऑक्टोबर
‘जळगाव तरूण भारत’ने एरंडोल येथे बुधवार, १७ ऑक्टोबर रोजी करनदादा पाटील मित्र परिवार आणि गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूल सहकार्याने आयोजित अल्पना कला स्पर्धाअंतर्गत घेतलेल्या रांगोळी स्पर्धेत बलराम परदेशी यांनी प्रथम तर द्वितीय पुरस्कार काजल परशुराम मराठे यांनी पटकावला. तृतीयस्थानी जया दिलीप वाडिले राहिल्या.
साई गजानन मंदिर हॉल रामचंद्र नगर, बसस्टॅन्डजवळ येथे अत्यंत उत्साहात पार पडलेल्या यास्पर्धेत सुमारे ६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. विशेेष म्हणजे महिलांचे क्षेत्र समजल्या जाणार्या रांगोळी कलेत बलराम परदेशी यांनी पटकावलेल्या प्रथम क्रमांकाचे सर्वांनाच आश्चर्य वाटले.बक्षीस वितरण कार्यक्रमाला पारोळा नगरपरिषदेच्या नगरसेविका अंजलीताई करण पाटील, गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष सचिन विसपुते, माध्यमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका अंजुषा चव्हाण, साळी समाज अध्यक्षा शोभा साळी, संस्कार भारती जळगावच्या मातृशक्ती प्रमुख सुनंदा सुर्वे, संस्कार भारतीच्या शहर रांगोळी विभाग प्रमुख रेखा लढे, कवयित्री बहिणाबाई चौधरी ‘उमवि’तील यशवंत गरुड, रा.ती.काबरे विद्यालयातील कला शिक्षक डी.जी.बाविस्कर, बालकवी विद्यालयातील कला शिक्षक परमेश्वर रोकडे हे परीक्षक, माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संचालक किशोर ढाके आणि तरुण भारतचे निवासी संपादक दिनेश दगडकर व्यासपीठावर होते.
मान्यवरांच्या सत्कारानंतर या स्पर्धेमागील ‘तरुण भारत’ची भूमिका विशद करण्यात आली.
बेटी बचाओ, बेटी पढाओ, पर्यावरण, पाणी टंचाई, वीज संकट यासोबतच अन्य रांगोळ्याही स्पर्धकांनी रेखाटल्या होत्या. अत्यंत प्रभावीपणे हे विषय हाताळल्याने प्रेक्षकांनाही त्यांची परिणामकारकता अधिकच जाणवली.
अंजलीताई पाटील आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण झाले. प्रथम पुरस्काराचे मानकरी बलराम मोहनसिंग परदेशी यांना १००१/रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, काजल परशुराम मराठे हिला द्वितीय पुरस्कार ७०१/रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर जया दिलीप वाडिले हिला ५०१/रू. रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. उत्तेजनार्थ बक्षिसांच्या मानकर्यांमध्ये वैष्णवी जितेंद्र पाटील, प्रिया विपीन परदेशी आणि कल्याणी महेंद्र जोशी यांचा समावेश होता. त्यांना प्रत्येकी २०१/- रू. देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन भाग्यश्री सुभाष दर्शे यांनी केले. स्पर्धेसाठी गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या ज्योती विनायक महा (वडगावकर) यांच्या नेतृत्वाखाली कविता पाटील, मोनिका शेटे, राणी चौधरी, सुवर्णा वानखेडेकर, रुपाली तेलंगे, विद्या सोनी, ममता साटोटे, कवीता सुर्वे, मिनल चौधरी आणि ज्योती महाले तसेच तरुण भारत परिवारातील अनिकेत आफे्र यांनीही सहकार्य केले.
करनदादा पाटील मित्र परिवार आणि
गोपी गोल्ड इंग्लिश मीडियम स्कूल यांचे सहकार्य
या स्पर्धेसाठी करनदादा पाटील मित्र परिवारातील सदस्य आणि गोपी गोल्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शिक्षक तसेच अन्य सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रथम, द्वितीय अन् तृतीय पारितोषिक
* प्रथम - बलराम परदेशी, १००१/रू रोख,स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र
* द्वितीय - काजल मराठे ७०१/रू रोख,स्मृतिचिन्ह
* तृतीय - जया वाडिले ५०१/रू रोख, स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र
तीन उत्तेजनार्थ पारितोषिके
वैष्णवी पाटील, प्रिया परदेशी आणि कल्याणी जोशी यांना प्रत्येकी २०१/रू. व प्रमाणपत्र असे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
६२ स्पर्धकांचा सहभाग
रांगोळी स्पर्धेसाठी दुपारपासून स्पर्धकांनी सहभाग घेतला. या रांगोळी स्पर्धेत ६२ स्पर्धक सहभागी झाले होते. आकर्षक रंग, प्रमाणबद्ध रचना आणि समाजाला सध्या भेडसावणार्या रांगोळींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रांगोळया पाहण्यासाठी येथे अनेकांनी भेट दिली.
समारोप
१४ ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या अल्पना रांगोळी स्पर्धा २०१८ या उपक्रमाचा बुधवारी येथे झालेल्या स्पर्धेने समारोप झाला. १४ रोजी धरणगाव, १५ रोजी भडगाव, १६ रोजी शेंदुर्णी येथे ही स्पर्धा घेण्यात आली. या सर्व ठिकाणी लाभलेल्या स्पर्धकांच्या उत्स्फूर्त सहभागाने ही स्पर्धा अपेक्षेपेक्षाही अधिक यशस्वी झाली. सर्व ठिकाणी स्वतंत्र परीक्षक आणि त्यांना लाभलेली जळगाव येथे संस्कार भारतीची अनमोल साथ यामुळे या स्पर्धेने आपले वेगळेपण सिद्ध केले. अत्यंत निष्पक्ष निकाल, गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन आणि या क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेले परीक्षक यामुळे या स्पर्धेची उत्सुकता उत्तरोत्तर वाढतच गेली.
तरुण भारतने दरवर्षी अशी स्पर्धा आयोजित करावी, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. सर्व ठिकाणी प्रेक्षकांचा लाभलेला प्रतिसाद हा सुद्धा उत्साह वाढविणारा ठरला.
‘तरुण भारत’ सदैव तुमच्यासोबत - किशोर ढाके
रांगोळी स्पर्धेला लाभलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल स्पर्धकांचे कौतुक करताना माधव बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे संचालक किशोर ढाके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, नवरात्रोत्सवाच्या या काळात तुम्ही दाखविलेला उत्साह प्रोत्साहन देणारा आहे. भविष्यातही ‘तरुण भारत’ असेच उपक्रम आयोजित करणार आहे. त्यातून तुम्हाला तुमच्या मनातील कला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. ‘तरुण भारत’ सदैव तुमच्यासोबत आहे.