वृक्षपूजा- तुलसीपूजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2018   
Total Views |



अनंत औषधी उपयोग असलेली, वातावरण शुद्ध ठेवणारी ‘तुळस’ आज जवळजवळ प्रत्येक भारतीय माणसाच्या घरी दिसते, ती तिच्या धार्मिक पावित्र्यामुळेच. आज माणसांना ‘तुळस लावा’ असं मुद्दाम सांगावं लागत नाही, हीच आपल्या परंपरांची थोरवी होय.

 

भारतात सहसा असा कुठला माणूस भेटणार नाही, ज्याच्या घरी ‘तुळस’ नाही. शहरात ब्लॉकमध्ये राहणारा माणूससुद्धा गॅलरीत छोटंसं का होईना, एक ‘तुळशी’चं रोपटं लावून त्याला पाणी घालतो. ‘तुळशीवृंदावन ज्याचे घरी। त्यासी प्रसन्न श्रीहरी।असं संत नामदेवमहाराजांनी तुळशीवृंदावनाचं माहात्म्य सांगितलं आहे. ‘तुळस’ ही भारतीय संस्कृतीतील अत्यंत पूजनीय वनस्पती. ‘तुळशी’च्या अनंत औषधी उपयोगांमुळेच कदाचित ती इतकी पवित्र आणि शुभ मानली गेली असावी. ‘तुलसी’ हे ‘तुळस’ या नावाचं संस्कृतीकरण असावं, असं व्युत्पत्तिकोशात म्हटलं आहे. ब्रह्मवैतरपुराणात ‘तुलसी’ शब्दाची व्युत्पत्त्ती आढळते ती अशी,

 

नरा नार्यश्च तां दृष्ट्वा तुलनां दातुमक्षमा: ।

तेन नाम्ना च तुलसीं तां वदन्ति पुराविद: ॥

 

अर्थ - नरनारींनी त्या वनस्पतीला पाहिले आणि त्यांना तिची कोणत्याही वनस्पतीशी तुलना करता येईना. म्हणून पुरातत्ववेत्ते तिला ‘तुलसी’ या नावाने संबोधू लागले. कोणी म्हणतात की, समुद्रमंथनाच्या वेळी त्यातून जे अमृत निघालं, त्याचे काही थेंब जमिनीवर सांडले व त्यातून ‘तुळस’ निघाली आणि पुढे ती ब्रह्मदेवाने विष्णूला दिली. तर कोणी म्हणतात की, जालंधर दैत्याची पत्नी वृंदा हिच्या शरीरातून निघालेल्या घामातून ‘तुळस’ उत्पन्न झाली. अशा अनेक आख्यायिका आहेत. चरकसंहिता, व पाणिनीच्या अष्टाध्यायीत ‘सुरस’ या नावाने तुळशीचा उल्लेख आला आहे. हिरवी तुळस (श्री तुळस) आणि काळी तुळस (कृष्ण तुळस) असे ‘तुळशी’चे दोन प्रकार आहेत. ‘तुळस’ ही विष्णूला परमप्रिय आहे. ‘तुळशी’चे केवळ दर्शनही पापनाशक असून तिची पूजा मोक्षदायी आहे असं म्हटलं आहे. पद्मपुराणात म्हटलं आहे –

 

माणिकांचनपुष्पाणि तथा मुक्ता मयानि च।

तुलसीदलपत्रस्य कलां नार्हन्ती षोडषीम॥

 

अर्थ - सुवर्णाची, रत्नांची आणि मोत्यांचीही फुले विष्णूला वाहिली तरी, त्यांना तुलसीपत्राच्या सोळाव्या कलेचीही सर येणार नाही. कार्तिकमासात तुलसीदलांनी केलेल्या विष्णुपूजेचं माहात्म्य विशेष आहे. तुळशीचं दर्शन, स्पर्श, सेवन, ध्यान, रोपण, नमन आणि पूजन युगानुयुगांची पातके नष्ट करते, असे म्हटले आहे. ‘तुळशी’मध्ये मुळापासून अग्रापर्यंत सर्व देवता वास्तव्य करत असतात असं सांगितलं आहे. स्त्रियांना ‘तुळस’ ही वात्सल्यमयी माता वाटते. स्त्रिया आपली दुःखे ‘तुळशी’पुढे मोकळ्या मनाने व्यक्त करतात आणि कौटुंबिक कल्याणासाठी तिची आळवणीही करतात.

 

तुलसिकाननं चैव गृहे यस्यावतिष्ठते ।

तद गृहं तीर्थभूतं हि नायान्ति यमकिंकरा: ॥

 

अर्थ - ज्या घरी तुळशीचं वन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र होय. त्या घरात यमदूत येत नाहीत. ‘तुलसीपत्र’ जरी सर्रास सगळ्या धार्मिक कार्यांमध्ये वापरली जात असली तरी, ‘तुळशी’ची पानं खुडण्याविषयी काही विधिनिषेध सांगितले आहेत. वैधृती, व्यतिपातादि योग, मंगळ, शुक्र आणि रवी हे वार, विविध पर्वे, रात्र आणि उभयसंध्या या योगांवर ‘तुळस’ खुडू नयेत. तसंच तैलाभ्यंग केल्यावर, अशुची असताना, पारोशा वस्त्राने तुलसी खुडू नयेत. तसं केल्यास ते विष्णूचं शीर तोडल्यासारखं होतं. ‘तुलसी’ खुडताना पुढील श्लोक म्हणून तिची प्रार्थना करण्यास सांगितलं आहे

 

तुलस्यमृतजन्मासि सदा त्वम् केशवप्रिये ।

केशवार्थे विचिन्वामि वरदा भव शोभने ॥

 

अर्थ - हे तुलसी, तू अमृतापासून जन्मली आहेस. तू विष्णूला सर्वकाळ प्रिय आहेस. मी विष्णूसाठी तुला खुडतो आहे. हे शोभने, तू मला वर देणारी हो. सांजसकाळ सर्वांनीच ‘तुलसीदर्शन’ करावं असं सांगितलं आहे. तुलसीदर्शनाचा मंत्र असा –

 

तुलसि श्रीसखि शुभे पापहारिणि पुण्यदे ।

नमस्ते नारदनुते नारायणमन: प्रिये ॥

 

अर्थ - हे तुलसी, तू लक्ष्मीची मैत्रीण, शुभदा, पापहारिणी आणि पुण्यदा आहेस. नारद तुझी स्तुती करतो. तू नारायणाच्या मनाला अत्यंत आवडतेस. तुला नमस्कार असो. वैष्णव लोक ‘तुळशी’च्या काष्ठमण्यांची माळ तयार करून ती नेहमी आपल्या गळ्यात घालतात. याला ‘तुलसीकाष्ठमालाधारणविधी’ म्हणतात. वारकरी स्त्रिया पंढरीला जाताना डोक्यावरून पितळेचं तुळशीवृंदावन नेतात. ‘तुळशी’च्या मुळातील माती कपाळी लावण्याचीही पद्धत आहे. प्रवासाला निघताना ‘तुळशी’ला उजवी प्रदक्षिणा घालून मार्गस्थ होतात. गणेशाने मात्र ‘तुळशी’ला शाप दिल्याची कथा ब्रह्मवैवर्त पुराणात असल्याने गणेशाला ‘तुळस’ निषिद्ध आहे. ओडिशात ‘तुळस’ ही सर्व देवतांची प्रतिनिधी मानली जाते. तिला ‘वृंदावती’ असंही म्हणतात. ओडिशातील कुमारिका ‘जन्हीओसा’ नामक एक व्रत करतात. या व्रतात कुमारिका अश्विन पौर्णिमेस उपवास करून ‘तुळशी’ची व तिच्या जवळच चंद्राची पूजा करतात. वृंदावती ही ओडिशात उग्र मानली आहे. तिच्या व्रतात जो कोणी विघ्न आणील, त्याला ती कठोर शासन करते. अशा कथा तिकडे प्रचलित आहेत. केरळातील नायर लोकांच्या मते ‘तुळस’ ही शिवाला प्रिय आहे. ते लोक ‘तुळशी’च्या फांदीवर पाणी ओतून ते हातात घेऊन प्राशन करतात.

 

‘तुलसीविवाह’ अजूनही बहुतांश हिंदुंच्या घरी केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी विष्णूचं (बाळकृष्णाच्या मूर्तीचं) ‘तुळशी’शी लग्न लावलं जातं. आषाढ शुद्ध एकादशीला शयन करणारा विष्णू कार्तिक शुद्ध एकादशीला जागा होतो. यानिमित्त केल्या जाणाऱ्या प्रबोधोत्सवाला जोडून ‘तुलसीविवाह’ हा उत्सव रूढ झाला आहे. ‘तुलसीव्रत’ नामक एक काम्य व्रत कार्तिक शुद्ध नवमीपासून एकादशीपर्यंत तीन दिवस करतात. या तीन दिवसांत विष्णूची सुवर्णप्रतिमा आणि ‘तुळस’ यांची पूजा करायची असते. ‘तुळशी’च्या वनात हे व्रत करणं विशेष पुण्यदायी मानलं जातं. ‘तुलसीलक्षपूजा’ नामक एक काम्य व्रत असून ते मुख्यतः स्त्रिया आचरतात. यामध्ये एक लक्ष्य तुलसीपत्रांनी श्री विष्णूची पूजा करतात. ‘तुलसीलक्षप्रदक्षिणा’ नावाचंही एक काम्य व्रत सांगितलं असून यामध्ये चातुर्मासात ‘तुळशी’ला एक लाख प्रदक्षिणा घालतात. अशी ही वातावरण शुद्ध, ऑक्सिजनमय ठेवणारी आणि माणसाला निरोगी, ठणठणीत ठेवणारी ‘तुळस!’ आज माणसाला ‘तुळशीची झाडं लावा’ असं सांगावं लागत नाही हीच आपल्या रूढी-परंपरांची थोरवी होय.

 

(संदर्भ: 1. भारतीय संस्कृतिकोश; 2. मराठी विश्वकोश)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@