चाफळचे राम मंदिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018
Total Views |
 
 

कृष्णेच्या खोऱ्यात आल्यावर आपला संप्रदाय वाढविण्यासाठी समर्थांनी मसूर हे ठिकाण निवडण्यात मोठे औचित्य दाखवले होते. कोणतेही कार्य करण्यापूर्वी एकंदर परिस्थितीचा अभ्यास करून आपल्या कृतीत विवेक सांभाळला तर यशप्राप्ती होते, असा समर्थांचा सिद्धांत आहे. समर्थांचे कार्य नि:स्पृहपणे चालले होते. त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थी विचार त्यांच्या मनात नव्हता.

आमची प्रतिज्ञा ऐसी ।

काही न मागावें शिष्यांसी ।

आपणामागे जगदिशासी ।

भजत जावें ॥ (दा. १२.१०.३४)

एवढीच माफक अपेक्षा ठेवून ते कार्य करीत होते. त्याबद्दल लोकांत प्रसिद्धीही त्यांना नको होती. आपले काम झाले की समर्थ जवळच्या डोंगरावरील एखाद्या घळीत निसर्गाच्या सान्निध्यात मुक्कामाला जात असत. मसूर हे सुरक्षित ठिकाण मिळाल्याने समर्थांनी इ. स. १६४५ साली पहिला रामनवमीचा उत्सव नऊ दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यामागे समर्थांचा काय उद्देश होता, याचा आढावा आपण मागील लेखात घेतला आहे. समर्थांनी मसूरला दोन-तीन उत्सव साजरे केले. पण, तेवढ्याने त्यांचे समाधान झाले नाही. कुठेतरी एखाद्या ठिकाणी रामाची मूर्ती कायमस्वरुपी स्थापून तिथे देऊळ बांधावे आणि तिथे रामनवमीचा उत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणावर व्हावा, अशी योजना समर्थांच्या मनात घोळत होती. त्यासाठी योग्य नेतृत्व व शिष्य तयार करायचे होते. नि:स्पृह माणसे पुढे आली, तर या धार्मिक परंपरा टिकून राहतील, याची समर्थांना कल्पना होती. मसूरच्या उत्सवात रामाची मूर्ती नव्हती, तेव्हा राममंदिर बांधण्यासाठी योग्य अशा जागेचा शोध समर्थ घेऊ लागले.

 

 
उत्तरेकडून मोगलांच्या स्वाऱ्या येत होत्या. त्या आल्यावर मंदिरांचा विद्ध्वंस करणे, मंदिराचे दगड वापरून त्या जागी मशीद बांधणे, मूर्तीची तोडफोड करणे हे प्रकार नित्याचे झाले होते. या विद्ध्वंसकाच्या तावडीतून देवळांचे जतन करणे हेच मुळात कठीण होते. असं असताना रामरायाचे नवीन देऊळ बांधावे, लोकांना रामाच्या पराक्रमाची आठवण राहावी म्हणून रामाची मूर्ती स्थापन करावी व तेथे मोठा उत्सव करून लोकांना धार्मिक पातळीवर ‘रामराज्य हवे’ या विचारासाठी एकत्र आणावे म्हणून समर्थांचा हा सारा खटाटोप होता. समर्थांना मंदिरासाठी डोंगरदऱ्यानी वेढलेले निसर्गरम्य व सुरक्षित स्थान हवे होते. समर्थांनी मंदिरासाठी जागेचा शोध सुरू केला. ठिकाण मन प्रसन्न होईल असे निसर्गरम्य तर हवे पण, त्याहीपेक्षा ते सुरक्षित असावे. मुघलच्या मूर्तिभंजक घणघाती कारवायांच्या त्या काळात नवे मंदिर बांधायचे आहे, हे ऐकून काही लोक समर्थांना हसले असतील. काहींनी टिंगलही केली असेल. पण, समर्थांनी असल्या बोलघेवड्या टीकाकारांना कधी महत्त्व दिले नाही. राममंदिरासाठी समर्थांनी चाफळची निवड केली. हे गाव मांड नदीच्या काठावर वसले आहे. ही मांड नदी पुढे २० ते २५ मैलांवर कृष्णा नदीला मिळते. पावसाळ्याच्या दिवसात मांड नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ असते. नदीत उतरून ती पार करणे जवळ जवळ अशक्य. तेव्हा शत्रूचा धोका कमी. शिवाय चाफळ खोर्‍यापर्यंतचा सारा भूभाग आदिलशहाच्या अंमलाखाली होता. आदिलशहाच्या दरबारात मराठा सरदारांचे वर्चस्व होते. त्यामुळे चाफळसारखे सुरक्षित, निसर्गरम्य ठिकाण रामदासांनी निवडले ते सर्व दृष्टींनी योग्य होते. समर्थांनी मंदिरासाठी जागेचा शोध सुरू केला. लोकांनी मांड नदीच्या काठी स्मशानाजवळील जागा दाखवली. तेथे शेंदूर लावलेले अनेक दगड होते. लोक तिकडे जायला घाबरत. समर्थांनी ती जागा पक्की केली. शिष्यांच्या मदतीने त्यांनी शेंदूर फासलेले दगड एकेक करून नदीच्या पात्रात टाकले. शेवटी लोकग्रहास्तव म्हसोबाचा मोठा दगड त्यांनी तिथे राहू दिला.
 

समर्थ रंगनाथस्वामींच्या भेटीस जाऊन निगडीहून परत येत असताना रहिमतपूरनजीक अंगापूरच्या जंगलात शिवनाथ म्हणून एक स्थान आहे. तेथे स्नान करून समर्थ ध्यानास बसले असता त्यांना शब्द ऐकू आले की, “तुम्हाला हवी ती मूर्ती या डोहात आहे.” समर्थांनी डोहात उडी घेतली व दोन हातात दोन मूर्ती घेऊन ते बाहेर आले. एक मूर्ती धनुर्धारी रामाची व एक महिषासूरमर्दिनीची होती. (संदर्भ जय जय रघुवीर समर्थ - ल. रा. पांगारकर) रामदासांच्या काही चरित्रकारांनी या कथेचा पुढील भाग सांगताना ती चमत्काराला जोडली आहे. रामदास त्या मूर्ती झोळीत टाकून चाफळच्या दिशेने निघाले. ते काही गुराखी पोरांनी पाहिले. त्यांनी गावात जाऊन बातमी दिली की, एक गोसावी आपल्या डोहातील मूर्ती काढून घेऊन जात आहे. काही प्रतिष्ठित लोकांनी पाठलाग करून समर्थांना वाटेत गाठले. ते म्हणाले, “मुसलमानांच्या भीतीने आम्ही त्या मूर्ती डोहात टाकल्या. त्या आमच्या गावाच्या आहेत. तुम्ही त्या परत करा.” समर्थ काही बोलले नाहीत. झोळीतील मूर्ती काढून त्यांनी तेथील गवतावर ठेवल्या व ते तेथून पुढे निघाले. इकडे मूर्ती गावात न्यायच्या म्हणून लोकांनी त्या उचलण्याचा प्रयत्न केला. पण, त्या तेथे घट्ट रुतून बसल्या होत्या. खूप प्रयत्न करूनही गावकर्‍यांना त्या मूर्ती हलवता येईना. अखेर धावत जाऊन ते समर्थांना शरण गेले व मूर्ती घेऊन जाण्यास सांगितले. समर्थांनी परत येऊन त्या मूर्ती सहजपणे उचलून झोळीत टाकल्या व त्यांना घेऊन ते चाफळला आले.

 

जागा मिळाली, मूर्ती मिळाल्या, आता मंदिर उभे करायच्या कामाला समर्थ लागले. त्यासाठी पैसेही मिळाले. पुणे येथे गिरीगोसावींचे कीर्तन शिवाजीने ऐकले. काही बिदागी देऊ केली. त्यावेळी त्या नि:स्पृह गोसाव्याने ते नाकारले व सांगितले की, “रामदास चाफळला श्रीरामाचे देऊळ बांधत आहेत. त्यांना मदत करावी.” त्यावेळी शिवाजीने चाफळचे मामलेदार नरसोमलनाथ यांच्या मार्फत तीनशे होन पाठवले. इतर शिष्यमंडळींकडूनही द्रव्य जमा झाले. अशा रीतीने रामाचे देवालय बांधले व त्यात राममूर्तीची व महिषासूरमर्दिनी मूर्तीची स्थापना केली. रामाची रथात उभी असलेली अशी मूर्ती आहे. प्रसिद्ध मूर्तिविज्ञान तज्ज्ञ व इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मते, ही मूर्ती सूर्यनारायणाची आहे. रथाचा सारथी मारुती नसून अरुण आहे. तथापि समर्थ रामदासांनी ती मूर्ती रामाची म्हणूनच स्थापन केली आहे. तेव्हा ती श्रीरामांचीच समजली पाहिजे. हनुमंतस्वामींच्या बखरीत अंगापूरच्या डोहातील मूर्ती बाहेर काढल्याचा शके १५६९ (इ.स. १६४७) व चाफळ उत्सवाची सुरुवात शके १५७० (इ.स. १६४८) असा उल्लेख आहे. ही वर्षे ‘वाकेनिसी’ टिपणाशी बरोबर जुळतात. चाफळच्या पहिल्या रामजन्मोत्सवाचे वर्णन समर्थांनी सुरेख केले आहे. त्याची सुरुवात…

 

‘भोवती डोंगरांचा फेर ।

मध्ये देवाचे शिखर ।

पुढे मंडप संपूर्ण । पंधरा खण ॥

 

अशी आकर्षक आहे. आज साडेतीनशे वर्षे झाली तरी, चाफळचा उत्सव तसाच चालू आहे. समर्थांच्या इच्छाशक्तीचा तो प्रभाव आहे.

 
 
- सुरेश जाखडी 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@