रोजावा क्रांती- आवाहन आणि आव्हान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2018   
Total Views |

 

 

 
 
 
रोजावा क्रांती ही एक वेगळी क्रांती जगाने पाहिली. रोजावा क्रांतीने पश्चिम आशियामध्ये काही आव्हाने निर्माण केली व पश्चिम आशियाला काही आवाहनेही केली आहेत.
 

रोजावा क्रांती ही प्रामुख्याने कुर्दिस्तान चळवळीतून निर्माण झालेली असल्याने व ती ज्या भौगोलिक भागात घडली तो भाग कुर्दबहुल असल्याने साहजिकच या क्रांतीत कुर्दवंशियांची संख्या जास्त होती. पण, या क्रांतीचे महत्त्व व वेगळेपणच हे आहे की, कुर्दिस्तान चळवळीतून निर्माण झालेली असली तरी या शासन प्रयोगात कुठेही कुर्दांचे वर्चस्व अधोरेखित केलेले नाही. या क्रांतीने सर्वप्रथम आव्हान दिले ते खरं तर सीरिया व तुर्कस्तान शासनाला. त्यातल्या त्यात तुर्कस्तानला तर ते फारच झोंबले, पण त्यासोबत रोजावा क्रांतीने ‘इसिस’समोरही आव्हान उभे केले. या आव्हानाचे रुपांतर युद्धात झाले, ज्यात ‘इसिस’चा कोबानमध्ये दारुण पराभव झाला. रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत अब्दुल्ला ओकलानच्या माध्यमातून रोजावा क्रांतीने पश्चिम आशियामध्ये शांतता व स्थैर्य प्रस्थापित होण्यासाठी एक विचार करण्याजोगा पर्याय निर्माण केला आहे. तो केवळ कुर्दांनी निर्माण केल्यामुळे द्वेषाने पछाडलेल्या तुर्कीने याकडे दुर्लक्ष तर केले नाहीच, उलट हा प्रयोग यशस्वी होणार नाही यासाठी जंग जंग पछाडले. पण, तरीही रोजावाने आपली यशस्विता दाखवून दिलीच. अमेरिका, रशियासारख्या विकसित देशांनी व महासत्तांनी या प्रयोगाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अमेरिकेने कोबान युद्धात रोजावाला साहाय्य केलेले असले तरी ते साहाय्य ‘इसिस’ विरोधापुरते मर्यादित होते.

 

पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित व्हावी, असे खरंच या महासत्तांना वाटत असेल तर रोजावा क्रांतीच्या शासनप्रणालीचा अभ्यास करून यावर चर्चा होणे अपेक्षित आहे. सध्यातरी त्या दिशेने म्हणावी तितकी हालचाल दिसून येत नाही. दुसरीकडे रोजावाने पश्चिम आशियातील इस्लामी मूलतत्त्ववादी, जहाल कट्टरपंथी, हुकूमशाही, साम्यवादी शासित देशांपुढे आव्हान निर्माण केले आहे, परिणामतः इतर देश याकडे कसे पाहतात व प्रतिक्रिया देतात, हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. कदाचित आपल्या तत्त्वांना या रोजावाच्या निधर्मी शासनामुळे धोका निर्माण होण्याची भीती त्यांना वाटू शकते. (जशी ‘इसिस’ला वाटली.) तसेच कुर्दिस्तान चळवळ ज्या देशात सुरू आहे त्या तुर्कस्तान, इराण, इराक व सीरिया देशांना यामुळे आपल्या देशाच्या अखंडत्वाला धोका आहे, असेही वाटू शकते. (उदा- जसा धोका तुर्कस्तानला वाटतोय.) रोजावाने आता कुर्दिस्तान निर्माण करणे आमचे ध्येय नाही, हे सांगितल्यामुळे कदाचित इराकी कुर्दिस्तान, इराण व तुर्कस्तानातील कुर्दिस्तान समर्थकांना रोजावामुळे आपल्या कुर्दिस्तानच्या स्वप्नांचा चक्काचूर होईल, याची भीती वाटू शकते. विशेषतः इराकी कुर्दिस्तानची प्रतिक्रिया यावर महत्त्वाची भूमिका बजावू शकते. बहुसंख्य कुर्दवंशीयांचा धर्म इस्लाम आहे, पण एकंदरित कुर्दवंशीयांचा अभ्यास करताना असे दिसून येते की, त्यांचा धर्मापेक्षा वंशाचा अभिमान जास्त प्रबळ आहे. म्हणून काही कुर्दवंशीय इस्लाममधून झोराष्ट्रीयन धर्मात धर्मांतरित होत असूनही कुर्दिस्तान चळवळीला किंवा रोजावा क्रांतीला काही फायदा-तोटा झाल्याचे दिसून येत नाही.

 

पश्चिम आशियाने रक्तरंजित लढे/ क्रांत्या पाहिलेल्या आहेत. त्यात शिया-सुन्नी किंवा इराण-इराक युद्ध, साम्यवादी क्रांती, वहाबी चळवळ, अरब वर्चस्ववादी धोरणं पाहिली आहेत. ‘अरब स्प्रिंग’मुळे त्या भागात लोकशाहीची पहाट उगवेल, अशी आशा काहींनी व्यक्त केली होती. पण, तीही नंतर फोल ठरली. आता पुन्हा रोजावाच्या निमित्ताने लोकशाहीची आशा निर्माण झाली आहे. पण, ‘अरब स्प्रिंग’वर बोलणारे, लिहिणारे आता रोजावावर मात्र मौन बाळगून आहेत. त्याला रोजावा क्रांतीचा प्रेरणास्रोत अब्दुल्ला ओकलानची दहशतवादी पार्श्वभूमी, प्रमुख ‘नाटो’ सदस्य तुर्कस्तानचा प्रखर विरोध, रोजावा क्रांतीत झालेले मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप अशी विविध कारणे आहेत. कोबान युद्धामुळेच काहीजण यावर व्यक्त व्हायला लागलेलोकशाही संघवाद व महिला सबलीकरण ही रोजावाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. पश्चिम आशियातील अस्थिरतेवर रोजावाचा प्रयोग हा रामबाण उपाय आहे, असा ओकलानला विश्वास आहे. काही प्रमाणात रोजावात ते सिद्धही झालंय. लगेच हा प्रयोग सर्व पश्चिम आशियात लागू करावा, असे म्हणणे नाही. पण, निदान रोजावातील लोकांशी चर्चा करून, त्यांची मते जाणून घेऊन एका विचारमंथनाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यास काहीच हरकत नसावी.

 

रोजावा शासनप्रणाली पश्चिम आशियात लागू होईल की नाही हा वेगळा मुद्दा, पण त्यांचे महिला सबलीकरणाचे धोरण केवळ पश्चिम आशियाच नव्हे, तर सर्व जगाने आचरण्यात आणण्याजोगे आहे. महिलांची प्रशासनापासून सैन्यापर्यंतची भरीव कामगिरी ही प्रशंसनीय आहे. विशेषत: सैन्यातील महिलांच्या कामगिरीनेच रोजावाला कोबानसारख्या युद्धात विजय मिळवणे शक्य झालेअब्दुल्ला ओकलानला आपल्या व आपल्या शासनप्रणालीच्या मर्यादा माहिती आहेत, म्हणून ओकलानने सर्व जगासाठी उपयुक्त असे न म्हणता केवळ पश्चिम आशियातील प्रश्नावर उपाय म्हणून लोकशाही संघवादाचा प्रयोग मांडला आहे. (लोकशाहीवादी इतर अमेरिका, इंग्लंड व भारतासारखे देश वेगळे आणि रोजावातील लोकशाही संघवादाचा प्रयोग वेगळा आहे. केवळ लोकशाही नावामुळे गल्लत होऊ शकते.) आधीच अस्थिर अशा या प्रदेशात हिंसाचाराने प्रश्न सुटणार नाहीत. वेगवेगळे धर्म, वंश, समूह, टोळ्या अशा संमिश्र प्रदेशात सर्वांना सामावून घेणारी अशी ही शासनप्रणाली आहे, असे ओकलानचे मत आहे.

 

यासोबत या प्रदेशाला जे तेलसमृद्धतेचे वरदान मिळाले आहे, तेच कधी कधी त्यांच्यासाठी शाप ठरते, कारण तेलाचे राजकारण हाही एक महत्त्वाचा कोन या प्रदेशाचा विचार करताना लक्षात घेणे आवश्यक आहे. तेलाचे राजकारण हा येथील अस्थिरतेच्या कारणामधील एक मुद्दा आहे, पण एकमेव किंवा प्रमुख मुद्दा नाही हेही समजून घेणे गरजेचे आहे. विविध प्रकारच्या इतर ऊर्जास्रोतांच्या शोधामुळे भविष्यात तेलावरील जगाचे अवलंबित्व हळूहळू कमी होत जाईल, त्यामुळे साहजिकच महासत्तांचा या प्रदेशातीळ रसही हळूहळू कमी होत जाईल. त्यामुळे या प्रदेशात काय बदल, घडामोडी, उलथापालथी होतील हाही कळीचा मुद्दा आहे. रोजावा क्रांतीत लहान मुलांची भरती, युद्धात मानवाधिकारांचे उल्लंघन यासारखे गंभीर आरोप रोजावा सैनिकांवर झाले आहेत. त्याची सत्यता तपासून योग्य कारवाई रोजावा शासनानेच करणे आवश्यक आहे, कारण क्रांती चुकीच्या व जहाल लोकांच्या हाती गेल्यास सगळ्यावर पाणी फेरले जाईल तसेच पुन्हा अंतर्गत बंडाळी, गृहकलह निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. लढाऊ, पण पश्चिम आशियातील शांततेसाठी होत असलेला हा आगळावेगळा प्रयोग ज्याची भारतातील अभ्यासक व सामान्यांना माहितीच नव्हती. म्हणून हा रोजावा क्रांतीचा इतिहास थोडक्यात निदान मराठी वाचकांसमोर आणण्यासाठी या लेखमालिकेचे प्रयोजन केले होते. यावर आता अभ्यासकांचे लक्ष वळेल, अशी आशा करून ही लेखमालिका संपवतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@