६८ वर्षीय बनारसीबाईंची रक्तदानाची पंचाहत्तरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |

शतक गाठून आगळा आदर्श घालण्याचा निर्धार


पुसद : दान कोणतेही असो, दानशूर व्यक्तींच्या धनसंचयातील धन कधीच कमी होत नसते. तसेच दान करीत राहिल्याने जीवनाचे मोलही वाढते. सर्वदानात श्रेष्ठ दान म्हणून रक्तदानाचा गौरव होतो. एक-दोन-तीन नव्हे तर तब्बल ७५ वेळा रक्तदान करून पुसद येथील मोतीनगर भागातील ६८ वर्षीय बनारसीबाई सीताराम चांडक यांनी समाजात एक लौकिक प्राप्त केला असून, रक्तदानाचे शतक गाठण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. 

महिला रक्तदानात मागे आहेत. त्याला कारणेही अनेक आहेत. मात्र बनारसीबाई ‘बी निगेटिव्ह’ या दुर्मिळ गटाच्या रक्तदात्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचे ७५ वेळा रक्तदान करणे अत्यंत मोलाचे मानले जायला हवे.

बनारसी हनुमानदास बजाज यांनी विवाहापूर्वी एकदाही रक्तदान केलेले नाही हे येथे उल्लेखनीय. आपला रक्तगट दुर्मिळ आहे, याचीही त्यांना कल्पनाही नव्हती. विवाह झाल्यानंतर वयाच्या २२ व्या वर्षी त्या पतीसोबत एका नातेवाईक रुग्णाला भेटायला डॉ. सतीश चिद्दरवार यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. तेव्हा तेथे बाजूला उपचार घेत असलेल्या एका महिला रुग्णाला रक्ताची गरज होती. तिला हवे असलेले रक्त मिळत नव्हते. म्हणून त्यांनी आपल्या पतीजवळ मी रक्त दिले तर चालेल का, अशी विचारणा केली.
आपल्या अर्धांगिनीच्या धाडसाचे कौतुक करून सीताराम चांडक यांनी बनारसी यांना प्रोत्साहन दिले. त्यानंतर बनारसीबाईंचे रक्त तपासल्या गेले. ‘बी निगेटिव्ह’ हा त्यांचा रक्तगट असल्याचे कळल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा रक्तदान केले. दुर्मिळ रक्तगटाच्या गरजूंना बनारसीबाईंनी आजवर रक्तदानासाठी नकार दिलेला नाही, हे विशेष.

एकदा तर रात्री १२ वाजता त्यांनी व त्यांची डॉक्टर मुलगी संतोषी यांनी डॉ. राजेश अग्रवाल यांच्या दवाखान्यात जाऊन एका निकड असलेल्या रुग्णासाठी रक्तदान केले.

आईमुळे रक्तदानाची प्रेरणा मिळाल्याचे त्यांची विवाहित मुलगी डॉ. संतोषी दिनेश राठी, पुसद वनविभागात लेखापाल असलेला त्यांचा मोठा मुलगा कैलास व व्यवसायी व क्रिकेटपटू असलेला अमित आणि पुतण्या अ‍ॅड. अमोल सुभाष चांडक सांगतात. या सर्वांचा रक्तगट ‘बी निगेटिव्ह’ हाच असून, या सर्वांनी आजपर्यंत तब्बल ५० वेळा रक्तदान करून समाजात आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे.

लग्नानंतर सासू-सासर्‍यांचा रक्तदान करण्यास तीव्र विरोध असतानाही बनारसीबाई चांडक यांनी रक्तदान करण्याचे कार्य अविरत सुरूच ठेवले आहे. आज ६८ वर्षांच्या असलेल्या बनारसीबाईंनी रक्तदानाचे ‘शतक’ साजरे करण्याचा निर्धार केला असून, रक्तदानाने मनाला आनंद मिळतो व लोकांना जीवनदान देण्याचे महत्कार्य आपल्या हातून घडत असल्याचे समाधान मिळते, अशी प्रतिक्रिया ‘तरुण भारत’जवळ त्यांनी व्यक्त केली.

आतापर्यंत नांदेड व नागपूर येथेही जाऊन गरजू रुग्णांसाठी त्यांनी रक्तदान केलेले आहे. याशिवाय पुसद येथील चिद्दरवार हॉस्पिटलमध्ये १६ वेळा, सत्यशांती हॉस्पिटल येथे ९ वेळा व विविध रक्तदान शिबिरांतून अनेकवेळा रक्तदान करणार्‍या बनारसी चांडक यांनी वयाच्या २२ व्या वर्षी पहिले रक्तदान करून, ५२ व्या वर्षी ३१ वेळा रक्तदान केल्याचा विक्रम नोंदवला आहे.

आज वयाची ६८ वर्षे पूर्ण झालेल्या बनारसीबाईंनी तब्बल ७५ वेळा रक्तदान करून एक विक्रमच केला आहे. बोलणे, चालणे, उठणे-बसणे, आवाज व तब्येत या सर्वच बाबतीत त्या ‘ऑल इज वेल’ असून डॉक्टरांनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत रक्तदान करता येईल, असे सांगूनही आपण रक्तदान करणारच, असे त्या ठामपणे सांगतात. रक्तदान करून समाजकार्य केल्याबाबत बनारसीबाई चांडक यांचा अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलढाणा जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्थांनी गौरव केला आहे.
रवी देशपांडे
@@AUTHORINFO_V1@@