समृध्द शेतीसाठी कृषी प्रदर्शन आवश्यक : मंत्री महादेव जानकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
धुळे : शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग करीत असतो. असे प्रयोग अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पुढे येतात. त्यामुळे कृषी प्रदर्शने शेतीसाठी नक्कीच पूरक ठरतील, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्सव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज केले.
 
येथील एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयाच्या मैदानावर ॲग्रोवर्ल्ड व अहिराणी दूध संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ॲग्रो वर्ल्ड कृषी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, आमदार अमरिशभाई पटेल, आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती मधुकर गर्दे, माजीमंत्री रोहिदास पाटील, विभागीय दुग्ध विकास अधिकारी, उपायुक्त शिरसाठ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे, कृषी प्रदर्शनाचे आयोजक शैलेंद्र चव्हाण आदि उपस्थित होते.
 
यावेळी जानकर म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्याने शेती केल्यास शेतकरी समृध्द होऊन शेतकऱ्याचा मुलगा उद्योजक होण्यास वेळ लागणार नाही. आमदार पाटील यांनी शेतकऱ्यांप्रती असलेली तळमळ दाखवून त्यांच्यासाठी भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजनासाठी योगदान दिले, ते महत्वाचे आहे. राज्यभरात एक ब्रॅण्ड एक फेडरेशन झाल्यास दुधाला मुबलक भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. शासनामार्फत जलयुक्त प्रमाणेच चारायुक्त शिवार योजना राबविण्यात येणार असून यातून मुबलक स्वरुपात चारा निर्मिती होऊन भविष्यात चाराछावण्यांची गरज भासणार नाही असेही ते म्हणाले.
 
जयकुमार रावल म्हणाले, शासन शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. बोंडअळीमुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शासनामार्फत अशा शेतकऱ्यांना प्रती एकरी ३६ हजाराची मदत जाहीर करण्यात येणार आहे. शहरात आयोजित करण्यात आलेले भव्य कृषी प्रदर्शन कौतुकास्पद असून दुग्धव्यवसायामुळे वेगळी ओळख असलेल्या खानदेशाचे गतवैभव परत मिळवून देण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर कृषी प्रदर्शनातील छोट-छोट्या शेतकऱ्यांच्या यशकथा माध्यमांनी समाजासमोर मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
 
शैलेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी सांगितले, या प्रदर्शनास शेतकरी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. जगदीश देवपूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
 
लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचवा : 
 
शासनाच्या शेतकरी व पशुपालकांसाठी असलेल्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी येथे दिले. मंत्री जानकर आज धुळे जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, प्रभारी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रापतवार, उपायुक्त वानखेडे आदी उपस्थित होते.
 
मंत्री जानकर म्हणाले, जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत. शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात. जिल्ह्यात उत्तम कामगिरी विभागाने बजवावी. जिल्ह्यातील रिक्त पदांवर अधिकाऱ्यांची लवकरच नियुक्ती करण्यात येईल. पशुवैद्यकीय, दुग्धोत्पादन, शेळी पालन, मेंढीपालन, कुक्कुटपालनाचा आगामी काळात आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. जिल्हा परिषद अध्यक्ष दहिते म्हणाले, पशुसंवर्धन विभागाने लाभार्थ्यांच्या यशकथा तयार कराव्यात. शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी योजनांचा लाभ दिला पाहिजे.
 
@@AUTHORINFO_V1@@