जनतेच्या पैशांची लूट करणारे नौटंकी लालूप्रसाद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018   
Total Views |
 

 
 
चारा घोटाळा प्रकरणीच्या दुसर्‍या खटल्याचा निकाल लागल्यानंतर या सर्व प्रकरणास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न लालूप्रसाद यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनीही आपल्या नेत्याची री ओढली. ‘मैं भी लालू, तू भी लालू, अब तो सारा देश है लालू‘, अशी पोस्टरबाजी करून निदर्शने करण्यात आली. आपला नेता धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असून त्यास या घोटाळ्यात नाहक गोवण्यात आले असल्याचा लालू समर्थकांचा दावा. लालूजींचा ‘प्रसाद‘ मिळालेले भाट यापेक्षा वेगळे काय बोलणार?
 
 
राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा आणि काळ्या पडलेल्या कंदिलाच्या प्रकाशात बिहारी जनतेला प्रकाश दाखविण्यास निघालेले लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका खटल्यात दोषी ठरले आणि सीबीआयच्या विशेष न्यायालयाने या महाशयांना साडेतीन वर्षे कारावासाची आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चारा घोटाळ्याशी संबंधित सहा खटले लालूप्रसाद आणि कंपूविरुद्ध गुदरण्यात आले. आतापर्यंत त्यातील दोन खटल्यांचा निकाल लागला असून अन्य खटल्यांचा निकाल लागणे बाकी आहे. २१ वर्षांपूर्वी झालेल्या ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळ्याशी संबंधित असे हे खटले आहेत.
 
 
चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव दोषी ठरल्याचे लक्षात घेता, त्यांच्या हातातील कंदील फडफडून विझून गेल्याने त्यांचे स्वत:चे राजकीय भवितव्य अंध:कारमय झाले आहे. मात्र, एवढा महाघोटाळा करूनदेखील लालूप्रसाद यादव यांना त्याबद्दल काहीही लाजलज्जा वाटत नाही. उलटपक्षी, राजकीय आकसातून हे सर्व केले जात आहे, असे हे महाभाग म्हणतात. न्यायालयापुढे येणार्‍या पुराव्यांच्या आधारे न्याय दिला जातो, हे सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशन आणि पाटणा बार असोसिएशनचे सदस्य असलेल्या लालूप्रसाद यांना माहीत नाही काय?
 
 
बिहारमधील चारा घोटाळा प्रकरणातील दुसर्‍या खटल्याचा निकाल लागल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती पाहता या लालू महाशयांकडून प्रत्येक गोष्टीचे कसे राजकीय भांडवल केले जात आहे, ते दिसून येईल. या निकालानंतर, भाजपसमवेत तडजोड करण्याऐवजी सामाजिक न्यायासाठी मरण पत्करणे मी पसंत करीन, असे त्यांनी म्हटले आहे. तडजोड न केल्याने असे घडले, असा त्याचा अर्थ! ९५० कोटींच्या चारा घोटाळ्यात आरोपी असलेल्या लालूप्रसाद यादव यांनी केलेल्या या वक्तव्यावर सूज्ञ जनता विश्वास ठेवील असे त्यांना वाटते की काय? चारा घोटाळा प्रकरणीच्या दुसर्‍या खटल्याचा निकाल लागल्यानंतर या सर्व प्रकरणास राजकीय रंग देण्याचा प्रयत्न लालूप्रसाद यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांनीही आपल्या नेत्याची री ओढली. ‘मैं भी लालू, तू भी लालू, अब तो सारा देश है लालू‘, अशी पोस्टरबाजी करून निदर्शने करण्यात आली. आपला नेता धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असून त्यास या घोटाळ्यात नाहक गोवण्यात आले असल्याचा लालू समर्थकांचा दावा. लालूजींचा ‘प्रसाद‘ मिळालेले भाट यापेक्षा वेगळे काय बोलणार?
 
 
चारा घोटाळ्याचे हे प्रकरण काही कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांनी केलेल्या तपासामुळे उजेडात आले. १९९६ मध्ये काही सरकारी अधिकार्‍यांनी चाइबासा येथे टाकलेल्या छाप्यानंतर या भ्रष्टाचाररूपी हिमनगाचा उलगडा होण्यास प्रारंभ झाला. अमित खरे, व्ही. एच. राव देशमुख, फिदेलीस टोप्पो, विनोदचंद्र झा यांनी केलेल्या तपासामुळे हा घोटाळा प्रकाशात आला. हे छापे ज्यावेळी टाकण्यात आले, त्यावेळी लालूप्रसाद यादव हेच बिहारचे मुख्यमंत्री होते, पण तपास अधिकारी कोणत्याही दबावाला बळी पडले नाहीत.
 
 
या ९५० कोटींच्या चारा घोटाळाप्रकरणी सहा खटले उभे राहिले. त्यातील पहिला खटला होता चाइबासा कोषागारातून ३७.५ कोटी रुपयांचा अपहार झाल्या संबंधातील. सप्टेंबर २०१३ मध्ये या खटल्याचा निकाल लागला आणि त्यात लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने लालूप्रसाद यांना जामीन दिला आहे. याबाबतची याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. गेल्या शनिवारी ज्या खटल्याबाबत न्यायालयाने शिक्षा सुनावली तो खटला होता देवघर कोषागारात झालेल्या ८९.२७ लाख रुपयांच्या अपहाराचा. त्यात लालूप्रसाद यांना साडेतीन वर्षे कारावास आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
 
 
फौजदारी कटकारस्थान करून पशु संवर्धनासाठी असलेल्या निधीचा घोटाळा केल्याचा आरोप लालू आणि कंपूवर ठेवण्यात आला होता. या निधीचा दुरुपयोग झाल्याचे उघड झाल्यानंतर १९९७ मध्ये लालूंना सत्ता सोडावी लागली होती. चारा घोटाळा प्रकरणातील निकाल लागणे बाकी असलेले अन्य चार खटले आहेत. या चारपैकी पहिला खटला आहे दुमका कोषागारात झालेल्या ३.९७ कोटी रुपयांच्या अफरातफरीचा. दुसरा खटला आहे चाइबासा कोषागारातून झालेल्या ३६ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा. झारखंड राज्यात हा खटला चालू आहे. तिसरा खटला आहे दोरांदा कोषागारातून झालेल्या १८४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याविषयीचा. हा खटलाही झारखंड राज्यात चालू आहे. चौथा खटला आहे, भागलपूर कोषागारातून झालेल्या ४५ लाख रुपयांच्या घोटाळ्याविषयीचा. सदर खटल्याची सुनावणी पाटणा येथे सुरू असून १० जानेवारीस लालू महाशयांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
 
 
पशुधनाच्या चारापाणी, औषधोपचार आदींसाठी असलेला निधी असा लांडीलबाडी करून हडप करण्यात आला. ९५० कोटींचा अपहार करणार्‍या या लालूप्रसाद आणि कंपूला याबद्दल काहीच शरम वाटत नाही. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्या. शिवपालसिंह यांनी लालूप्रसाद यांना दोषी ठरविले. लालूसमर्थक फोन करून आपल्यावर दबाव आणत असल्याचे स्वत: न्यायाधीशांनीच उघड केले. ‘‘लालूजी, आपल्या अनेक हितचिंतकांचे फोन मला येत आहेत. पण कायदा जे सांगतो त्याप्रमाणेच मी वागेन याबद्दल आपण निश्चिंत असावे,‘‘ असे लालूप्रसाद यांना ऐकवून असल्या दबावांना आपण बळी पडत नसल्याचे न्यायाधीशांनी लक्षात आणून दिले. झारखंडमधील बिरसा मुंडा कारागृहात असलेल्या ६९ वर्षे वयाच्या लालूप्रसाद यांनी, तुरुंगात खूप थंडी वाजत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणताच, थंडी कमी करण्यासाठी तबल्यासारखी वाद्ये वाजविण्याचा सल्ला न्यायाधीशांनी त्यांना दिला. चारा घोटाळा प्रकरणी न्यायालयाने लालूप्रसाद आणि अन्य १५ आरोपींना साडेतीन ते सात वर्षे कारावास आणि पाच लाख ते दहा लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
 
 
लालूप्रसाद यांचा मुलगा तेजस्वी याने, भाजप आणि नितीशकुमार यांनी आपल्या वडिलांविरुद्ध कटकारस्थान केल्याचा आरोप केला. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध झारखंड उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही त्याने सांगितले. आपल्या वडिलांना असलेले जनसमर्थन आणि जातीयवादी शक्तींना अटकाव करण्याचे त्यांनी दाखविलेले धाडस यामुळे त्यांच्या विरोधकांना असुरक्षित वाटत आहे, असेही तो म्हणतो. मात्र, पशुधनाच्या चारापाणी आणि औषधोपचार यावर खर्च केल्याचे दाखवून सरकारी तिजोरीवर ९५० कोटींचा डल्ला मारणारे लालूप्रसाद आणि त्यांचे साथीदार हे तुरुंगात खितपत पडण्याच्याच लायकीचे आहेत. आतापर्यंत ३१७ दिवस तुरुंगात वास्तव्य केलेल्या लालूप्रसाद यांनी खरे म्हणजे राजकारण संन्यास घेऊन तोंड काळे करायला पाहिजे. पण, सत्तेची चटक अनुभवलेले लालूप्रसाद आणि त्यांच्या कुटुंबातील मंडळी तसे वागण्याची सुतराम शक्यता नाही. पहिल्या खटल्यातील निकालाने लालूप्रसाद यांना ११ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. त्याबाबतची याचिका वरिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावल्यास लालूंना सक्तीचा राजकारण संन्यास घेऊन तोंड काळे करावे लागणार आहे. उर्वरित खटल्यांचे निकाल असेच लागत गेल्यास, ‘लालूजी, आप दिखते है भोलू, लेकीन आप तो निकले बडे चालू,’ यावर शिक्कामोर्तब होईल!
 
 
 
- दत्ता पंचवाघ 
 
@@AUTHORINFO_V1@@