गावे आजारमुक्त करण्यासाठी शोषखड्डे आवश्यक- अभिमन्यू काळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
गोंदिया: अनेक आजार हे सांडपाण्यामुळे निर्माण होणाऱ्या डासामुळे होतात. सांडपाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. तरच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होईल. गावे डासमुक्त झाली तरच गावे आजारमुक्त होईल, यासाठी शोषखड्डे करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी केले. तिरोडा येथील अदानी वीज निर्मिती प्रकल्पातील सभागृहात शोषखड्डे निर्मितीतून डासमुक्त गाव करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत जिल्हाधिकारी काळे हे अध्यक्ष म्हणून बोलत होते. 
 
 
 
यावर्षी दुष्काळ सदृश्यस्थिती आहे. त्यामुळे आतापासून नियोजन करुन शोषखड्डे तयार करण्याचे आणि छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे संकलन मोठ्या प्रमाणात करावे लागणार आहे. दुष्काळ सदृष्य परिस्थितीमुळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करुन दयावा लागणार आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून जास्तीत जास्त रोजगाराची कामे उपलब्ध करुन देण्यासाठी १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आतापासूनच खड्डे करावे. रब्बी हंगामात सुध्दा पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार नसल्यामुळे रोहयोतून मोठ्या प्रमाणात कामे घ्यावी असे त्यांनी सांगितले.
 
 
 
ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता आहे त्या गावांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आतापासूनच नियोजन करावे असे सांगून काळे म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची दुरुस्ती करावी. सार्वजनिक विहिरीतील गाळ काढून घ्यावा. ज्या ठिकाणी विंधन विहिरीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी विंधन विहिरीसाठी मंजूरी घ्यावी. नादुरुस्त विंधन विहिरींची दुरुस्ती करावी. पाईप कमी पडत असतील तर बोअरसाठी पाईपची मागणी करावी. गावांसाठी ज्या ठिकाणावरुन पाणीपुरवठा करण्यात येतो तेथील पाण्याच्या स्त्रोतावर शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतीतील विहीर किंवा विंधन विहिरीचा परिणाम होत असेल तर अशांवर पाणी उपसा करण्यास बंदी घालावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात करावी असे त्यांनी सांगितले. 
 
@@AUTHORINFO_V1@@