तेच ते नि तेच ते ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
सकाळी चालायला जाताना इयर फोन घालून रेडीओ ऐकत चालायची मला सवय आहे. बरेच फायदे असतात या सवयीचे. वाटेत कोणी थांबून गप्पा मारण्याची शक्यता नसते हा सर्वात महत्त्वाचा फायदा. चालण्याचे श्रम जाणवत नाहीत आणि डोक्यातलं विचारचक्र जरा हळू हळू धावतं. रेडीओवर कोणाच्या तरी आवाजात विंदांची ‘तेच ते नि तेच ते‘ ही कविता ऐकली. रुटीनचा कंटाळवाणेपणा चपखल शब्दांत वर्णन केलाय.
 
मलाही जाणवायला लागलं की, माझ्याही आजूबाजूला तीच माणसं दिसत आहेत, याच ठराविक वेळी फिरायला येणारी. पायाखाली तोच रस्ता आहे. पेव्हर्स ब्लॉक पण त्याच ठिकाणी, तसेच रोजच्या सारखे. डावीकडे त्याच कार्स आहेत. त्या पुसणारी तीच ठराविक माणसं, त्याचं क्रमाने आपल्या आपल्या ठरलेल्या गाड्या पुसत आहेत. काही मोठी काही छोटी अशी तीच ती रोज दिसणारी अनोळखी झाडं आहेत. ओळखीचा फक्त गुलमोहर आहे ज्याचा सध्या मोसम नाही त्यामुळे फक्त हिरवा हिरवा आहे. तेच छोटंसं देऊळ. आता त्या नेहमीच्या आज्जी येतील नमस्कार करायला, असं मनात येतंय तोच त्या आल्या पण! जवळच्या बाकावर बसून स्तोत्र पुटपुटत बसल्या नेहमीप्रमाणेच. पुढे गेल्यावर सोसायटीच्या गेट जवळ एका बाकावर तीन आजोबा बसतात. आपल्या नातवंडांना स्कूल बसपर्यंत सोडायला येतात. आज दोघेच दिसले. तेवढा बदल सुद्धा छान वाटला मनाला! मनात आलं, आपलं पण ‘ तेच ते नि तेच ते ‘ झालंय. काहीतरी बदलायला हवंय. दुसरीकडे जायला पाहिजे फिरायला. पण सकाळच्या गडबडीच्या वेळी इथे खाली फेऱ्या मारायचं जेमतेम जमतंय. त्यात आता दुसरीकडे जायचं म्हणजे फिरणं बंदच व्हायचं वेळे अभावी. झटकून टाकला विचार आणि फेऱ्या संपवल्या.
पुढचा दिवस फिरायला दांडी! उठायला उशीर वगैरे काहीतरी कारण सांगण्यापुरतं. मनात विंदांची कविता!
मैत्रीण आली होती बरेच दिवसांनी. पहाटे परत जायला निघाली. तिला सोडायला सोसायटीच्या गेटपर्यंत गेले आणि तिथून परत येऊन फेऱ्या सुरु केल्या. दोन उंच झाडांच्या मधून सूर्योदयाचे इतके छान रंग दिसत होते, आज पर्यंत कधीच कसे दिसले नाहीत? देवळाच्या पाठीमागे प्राजक्ताचं झाड, अधून मधून एखादं फूल अलगद खाली पडत होतं. त्या झाडाच्या पायाशी शेवंती, आजवर न पाहिलेल्या वेगळ्याच रंगाची, आजपर्यंत न दिसलेली, एरवी फक्त हिरवं दिसणारं एक अनोळखी उंच झाड पण आज त्यावर चढलेली बोगनवेल दिसली. गडद गुलाबी रंगाची फुलं आणि झाडाची हिरवी पानं, रंगसंगती मोहक दिसत होती. रोज पाठमोरी दिसणारी माणसं आज चेहऱ्यानं ओळखीची होत होती. शेजारीच लागून असलेल्या दुसऱ्या सोसायटीच्या एका बाल्कनीतून, कुंडीत फुललेले, पांढऱ्या गुलाबाचे गुच्छ खाली डोकावत होते. सोसायटी मधल्या लहान मुलांच्या बागेत, कडेकडेने लावलेली लालजर्द आणि पिवळी कर्दळीची रोपं आज पर्यंत कधीच दिसली नाहीत. फेऱ्या मारता मारता अर्ध्याचा पाऊण तास कसा झाला कळलंही नाही. खरं म्हणजे परिसर तोच होता, मी पण तीच होते. बदलली होती माझ्या फिरण्याची दिशा. माझ्याच नकळत मी नेहमीची दिशा बदलली आणि आतापर्यंत न बघितलेला view दिसला. जुना परिसर नवा होऊन गेला.
याच्या पुढचा प्रयोग म्हणून एका सुट्टीच्या दिवशी माझी फिरण्याची वेळ मी बदलली आणि मला खूप नाविन्य मिळाले त्याच फेऱ्यांमध्ये. आजूबाजूला घडणाऱ्या घटना वेगळ्या होत्या. माणसं पण वेगळी होती. स्वच्छ पुसलेल्या काही कार्स गेट मधून बाहेर पडत होत्या तर काही आत येत होत्या. दुसऱ्या एक आजी छोट्या नातीला कडेवर घेऊन देवळाला प्रदक्षिणा घालत होत्या. रोज पाठीवर sacks लावून बस साठी धावणारी मुलं खेळत होती, सायकल चालवत होती. पहाटेच्या अंधुक प्रकाशात दिसणारे दृश्य, उन्हाच्या कोवळ्या किरणांमध्ये वेगळेच दिसत होते. ‘ तेच ते ‘ वाटणारे ‘ हेच कां ते! ‘ वाटत होते.
मला वाटलं कि सकाळचं चालणं हे एक उदाहरण झालं. पण कोणत्याही बाबतीतला तोच तो पणा घालवण्यासाठी उपाय तर शोधावा लागतोच. आपल्यातले, आपल्या कृतीतले, विचारातले छोटे छोटे बदल याचं उत्तर देऊ शकतात.
सवड काढून आपापल्या सोयीप्रमाणे, जवळच्या – लांबच्या ठिकाणी, वर्ष दोन वर्षातून एकदा फिरायला जाणं हा रुटीनच्या कंटाळ्यावर उपाय असला तरी तात्पुरता आहे. त्याच दैनंदिन जीवनात सर्वांना परत यावंच लागतं. सामान्य माणसाच्या जीवनातला तोचतोपणा हे एक वास्तव आहे. आपली दिशा आणि आपली वेळ बदलून जर काही काळासाठी का होईना तोचतोपणा टाळता येत असेल तर तुलनेने सोपा उपाय आहे हा, नाही कां ?
- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@