कित्येक दुष्ट संहारिला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
’मोसाद’ ही इस्रायलची गुप्तहेर संघटना आहे. तिचं मूळ हिब्रू नाव आहे ’ह मोसाद ल मोदिन उल् तफ्‌किदिममेयुचादिम.’ या नावाचं अरबी भाषांतर होतं ‘अल् मुसाद् लिल इस्तिखबरात बल् महाम’ म्हणजेच इंग्रजीत- ’इन्स्टिट्यूट फॉर इंटेलिजन्स अॅंड स्पेशल ऑपरेशन्स.’ ‘मोसाद’ किंवा ‘मुसाद्’ म्हणजे इन्स्टिट्यूट किंवा संस्था.
 
ब्रिटनच्या एम.आय.५ व एम.आय.६, अमेरिकेच्या एफबीआय व सीआयए, भारताच्या सीबीआय व रॉ या गुप्तहेर संघटना अनुक्रमे अंतर्गत गुप्तवार्ता संकलन आणि परराष्ट्रीय गुप्तवार्ता संकलन अशी कामं करतात. त्याच धर्तीवर इस्रायलची ‘शिन बेत’ आणि ‘मोसाद’ अशी गुप्तवार्ता खाती आहेत. शिवाय इस्रायली लष्कराचे ‘अमान’ हे वेगळे गुप्तहेर खाते आहे. तशी ‘मोसाद’ची सुरुवात १९३८ साली झाली. तत्कालीन पॅलेस्टाईन हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात होता. तिथे अर्थातच अरब मुसलमानांचं वास्तव्य होतं. युरोपात देशोदेशी विखुरलेल्या ज्यू लोकांच्या नेत्यांनी, पॅलेस्टाईनमध्ये ज्यू वस्ती वाढविण्याची परवानगी ब्रिटिशांकडून पदरात पाडून घेतली. मग त्यांनी विविध देशांमधून ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमध्ये आणून बसविण्याचा धडाकाच लावला. खुद्द पॅलेस्टार्ईनमध्ये राहून अशा प्रकारची कामं करणारे जे धडाडीचे तरुण ज्यू नेते होते, त्यांच्यात अग्रभागी झळकणारं नाव होतं डेव्हिड बेन गुरियॉं.
 
गुरियॉं यांनी अनेक उघड वा गुप्त संस्था निर्माण केल्या होत्या. त्यापैकीच ‘मोसाद लअलिया बेत’ ही गुप्त संस्था १९३८ साली स्थापन साली. दर महिन्याला किती ज्यू बाहेरून पॅलेस्टाईनमध्ये आयात केले जावेत, याचं विशिष्ट प्रमाण ब्रिटिशांनी ठरवून दिलेलं होतं. स्वतंत्र इस्रायलची स्वप्न पाहाणार्‍या ज्यू नेत्यांच्या दृष्टीने ते प्रमाण फारच कमी होतं. तेव्हा त्या कायदेशीर प्रमाणाला बगल देऊन जास्तीत जास्त ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमध्ये घुसवण्यासाठीच ‘मोसाद’ची निर्मिती झाली.
 
प्राचीन काळी पॅलेस्टाईन किंवा इस्रायल हे ज्यू लोकांचं अतिशय प्रबळ असं राज्य होतं. जेरुसलेम या राजधानीतून अनेक ज्यू राजांनी राज्य केलं. त्यातली खूप प्रसिद्ध नावं म्हणजे राजा डेव्हिड आणि राजा सॉलोमन. या नावांचे हिब्रू म्हणजे ज्यू उच्चार ‘दाविद’ आणि ‘शॉलमान’ असे होतात, तर अरबी उच्चार ‘दाऊद’ आणि ‘सुलेमान’ असे होतात.
 
पुढे रोमनांनी पॅलेस्टाईन जिंकून आपल्या अफाट साम्राज्याला जोडले. ज्यू रोमनांचे गुलाम बनले. गुलामगिरीत त्यांचा धर्मही फार अध:पतित झाला. तेव्हा एकवीसशे वर्षांपूर्वी पॅलेस्टाईनमध्येच योसेफ नाझरथ याचा मुलगा यीशू (हाच मूळ हिब्रू उच्चार आहे) याने धार्मिक बजबजपुरी विरुद्ध बंड पुकारलं. म्हणजे यीशू हा स्वत: ज्यू होता आणि ‘‘मी लोकांना खरा धर्म काय आहे, हे सांगण्यासाठी आलो आहे,’’ असं तो म्हणत होता.
 
असो. जेरुसलेमच्या प्रस्थापित ज्यू धर्ममार्तंडांना यीशूची ही बंडखोरी सहन झाली नाही. त्यांनी रोमन सुभेदाराचे कान फुंकले आणि त्याच्याकरवी यीशूला क्रूसावर खिळवून देहान्त प्रायश्चित्त दिले. आणखी दोन-अडीचशे वर्ष उलटली आणि त्या काळात म्हणजे अठराशे वर्षांपूर्वी पॅलेस्टाईनी गुलाम ज्यू आणि राज्यकर्ते रोमन यांचे संबंध कमालीचे बिघडले. तेव्हा रोमनांनी तमाम ज्यू धर्मीयांना पॅलेस्टाईनमधून हद्दपार केले. मायभूमीतून परागंदा झालेले हे ज्यू लोक भूमध्य समुद्रामार्गे युरोप खंडात जास्त प्रमाणात गेले. आफ्रिका आणि आशिया खंडातही आले. आपल्या भारतातसुद्धा समुद्रमार्गे कोकणपट्टीत नि केरळात आले.
 
आणखी तीन-चार शतकांनंतर रोमन साम्राज्याला मोडीत काढून तुर्क लोकांनी पॅलेस्टाईन जिंकला. यावेळी पॅलेस्टाईनचे नागरिक कोण होते, तर ख्रिश्चन अरब आणि हद्दपारीतून बचावलेले तुरळक ज्यू. त्या सर्वांनाच तुर्कांनी इस्लामी बनवून टाकलं. अशा रीतीने पॅलेस्टाईनी अरब मुसलमान बनले, मात्र खुद्द अरबस्तानसकट सगळे अरब मुसलमान तुर्कांच्या विशाल साम्राज्याचे घटक होते. या तुर्क राजवटीला म्हणतात, ’उस्मानी साम्राज्य किंवा ऑटोमन एम्पायर.’
 
हे तुर्की साम्राज्य पहिल्या महायुद्घाच्या अंताबरोबरच मोडीत निघालं. कारण, या महायुद्धात तुर्कस्तान हा जर्मनीचा मित्र होता. जर्मनीबरोबरच तुर्कांचाही पराभव झाला आणि त्यांच्या अरबी द्वीपकल्पातल्या भूभागावर इंग्रज आणि फें्रच यांनी डल्ला मारला. अशा तर्‍हेने १९१९ साली पॅलेस्टाईन इंग्रजांच्या ताब्यात आला.
 
जगभर देशोदेशी विखुरलेल्या नि अठराशे वर्षं उलटल्यावरही आपल्या मायभूमीत परतून इस्रायल हे आपलं प्राचीन राष्ट्र पुन्हा उभं करण्याचं स्वप्न पाहणार्‍या ज्यू लोकांनी ही संधी साधली. त्यांनी ब्रिटिशांकडून पॅलेस्टाईनमध्ये जाऊन स्थायिक होण्याची परवानगी मिळवली. आता हे तिथल्या मुसलमान अरबांना कसं सहन व्हावं? त्यांनी या स्थलांतरीत ज्यूं विरुद्ध दंगली सुरू केल्या. ज्यूंनी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला सुरुवात केली. आसामातील सिल्हेट जिल्ह्यात मुसलमानांनी अतिशय पद्धतशीरपणे आपली लोकसंख्या वाढवत नेली. अखेर तो जिल्हा तत्कालीन पूर्व पाकिस्तानात गेला. ही युक्ती पॅलेस्टाईनमधल्या ज्यूंनी १९२० पासूनच वापरली आणि ती अखेर अरबांच्या नाकावर टिच्चून १९४८ साली इस्रायल हे आपलं राष्ट्र बनवलं. ‘मोसाद’ आणि ‘शिन बेत’ या गुप्त संघटना आधीपासून कार्यरत होत्याच. १९४९ पासून त्यांना इस्रायली शासनाच्या अधिकृत गुप्तहेर संघटना बनवण्यात आलं. रूवेन शिलोहा हा ‘मोसाद’चा पहिला प्रमुख बनला. तो अन्य कुणालाही नव्हे, तर भेट पंतप्रधान बेन गुरियॉ यांनाच फक्त उत्तरदायी होता. ‘शिलोहा’ने सर्वत्र आपली हेरजाळी पसरवायला सुरुवात केली. या काळात ‘मोसाद’च्या कारवायांचे प्रमुख लक्ष्य अर्थातच विविध राष्ट्रं नि त्यातही अरबांचा म्होरक्या इजिप्त हे होतं. मात्र, ‘मोसाद’ हे नाव जगभर दुमदुमायला १९५६ साल उजाडावं लागलं. १९५६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात पाश्चिमात्त्य वृत्तपत्रांमधून मोठमोठ्या मथळ्यासह एक बातमी झळकली. सोव्हिएत रशियाचा अध्यक्ष निकीता क्रुश्र्चेव्ह याने सोव्हिएत पॉलिट ब्युरोच्या बैठकीत जोसेफ स्टॅलिनच्या राजवटीवर टीका केली. १९२४ पासून सुरू झालेली स्टॅलिनची पाशवी राजवट कोट्यवधी रशियनांचा बळी घेऊन अखेर १९५३ साली संपली होती. मग सत्तास्पर्धा होऊन क्रुश्र्चेव्ह राष्ट्राध्यक्ष झाला होता, पण त्याने स्टॅलिनविरुद्ध अवाक्षरही काढलं नव्हतं. ते आता घडलं होतं नि कुठे तर पक्षाच्या सर्वोच्च समितीच्या बैठकीत. एकप्रकारे ही स्टॅलिनच्या पापांची कबुली होती म्हणून या बातमीला अतोनात महत्त्व होतं.
 
ही बातमी पश्चिमी माध्यमांना कुठून मिळाली? सोव्हिएत पॉलिट ब्युरोत आपल्याबद्दल सहानुभूती असणारी व्यक्ती निर्माण करण्यात सीआयए किंवा एम.आय.६ यांना यश मिळालं नव्हतं. पण, तेच काम ‘मोसाद’ने केलं होतं. त्या हस्तकाकडून कुश्र्चेव्हच्या या महत्त्वपूर्ण भाषणाची खबर ‘मोसाद’ला मिळाली. ‘मोसाद’चा तत्कालीन प्रमुख इस्सर हारेल याने ती बातमी थेट सीआयए प्रमुख ऍलन डल्लेस याच्याकडे पोहोचवली आणि मग प्रसारमाध्यमांनी ती बातमी नि ‘मोसाद’चं नाव जगभर पोहोचवलं.
 
१९६० साली तर ‘मोसाद’ने कमालच केली. हजारो ज्यूंच्या कत्तलीला कारण असलेला नाझी नेता ऍडॉल्फ आईकमन हा महायुद्धातल्या पराभवानंतर पळून गेला. तो दक्षिण अमेरिकेत अर्जेंटिनामध्ये नाव बदलून राहतो आहे, अशी खबर ‘मोसाद’ला मिळाली. अत्यंत धाडसी छापा घालून ‘मोसाद’ने आईकमनला पळवलं. इस्रायलमध्ये आणलं नि त्याच्यावर खटला भरून त्याला फासावर लटकवलं.
 
१९७६ साली पॅलेस्टाईनी अरब गनिमी संघटनेने बरेच ज्यू प्रवासी असलेलं एक विमान पळवलं नि युगांडाच्या एन्टेबी विमानतळावर ते उतरवून ज्यू ओलिसांच्या बदल्यात इस्रायलच्या ताब्यात असलेल्या अरब अतिरेक्यांच्या सुटकेची मागणी केली. ‘मोसाद’ने एन्टेबी विमानतळावर अतिशय धाडसी छापा घालून आपल्या लोकांना सोडवून आणलं. ‘मोसाद’ची या छाप्याची योजना इतकी काटेकोर होती की, छापाच्या कामातल्या शंभर इस्रायली कमांडोजपैकी फक्त एक माणूस प्रत्यक्ष कारवाईत ठार झाला. त्याचं नाव लेफ्टनंट कर्नल यॉन नेतान्याहू. सध्याचे इस्रायली पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचा थोरला भाऊ.
 
अशा अनेक धाडसी आणि यशस्वी कारवायांनी ‘मोसाद’ने गुप्तहेर जगात स्वतःचा दरारा निर्माण केला आहे.
 
जानेवारी २०१० मध्ये ‘मोसाद’ने दुबईत एक कारवाई केली. ‘हमास’ या अरब अतिरेकी संघटनेचा एक म्होरक्या महमूद अल् मभौ हा दुबईतल्या एका आलिशान हॉटेलात येणार असल्याची खबर ‘मोसाद’ला मिळाली. वेगवेगळ्या युरोपीय हस्तकांनी त्या हॉटेलात तळ ठोकला. संधी साधून महमूदला गाठलं. त्याला इलेक्ट्रिक शॉक्स देऊन त्यांच्याकडून माहिती काढली. मग त्याला विषाचं इंजेक्शन दिलं आणि पसार झाले.
 
दुसर्‍या दिवशी दुबईत एकच खळबळ उडाली. आपल्याच देशात येऊन ‘मोसाद’ने ‘हमास’सारख्या जबरदस्त संघटनेच्या एका म्होरक्याला बिनबोभाट खतम करावं, याचा अरबांना फार राग आला. त्यांनी आंतरराष्ट्रीय बोंबाबोंब सुरू केली. इस्रायलने ताबडतोब प्रतिक्रिया दिली की, यात ‘मोसाद’चा काहीही संबंध नाही. मात्र, महमूद अल् मभौच्या मृत्यूचं आम्ही स्वागतच करतो. कारण, गाझा भागामध्ये शस्त्रास्त्रांची चोरटी वाहतूक करण्यात हा इसम अग्रगण्य होता.
 
 
परंतु, हे प्रकरण रेंगाळलं आणि त्याने वेगळंच वळण घेतलं. दुबईतल्या हॉटेलातल्या क्लोज सर्किट सुरक्षा कॅमेर्‍याने ‘मोसाद’च्या हस्तकांच्या प्रतिमा पकडल्या. हे कथित पर्यटक जर्मनी, पोलंड वगैरे युरोपीय देशांच्या बनावट पासपोर्टांवर दुबईत शिरले होते. त्यामुळे त्या देशांच्या राजनैतिक अधिकारांचा भंग झाला. एकंदरीत राजनैतिक अडचण उभी राहिली. याचा परिणाम म्हणून ‘मोसाद’चे प्रमुख मीर दागान यांना पायउतार व्हावं लागलं. तशीही मीर दागान यांची निवृत्ती जवळ आली होती. आठ वर्षं ते ‘मोसाद’च्या प्रमुखपदावर होतेच. त्यांना निवृत्त केलं, असं दाखविण्यात आलं. राजनैतिककदृष्ट्या पंचाईत झाली म्हणजे काही फार बिघडलं असं नाही. काट्यासारखा सलणारा एक शत्रू ‘मोसाद’ने संपवला, हे महत्त्वाचं!
 
- मल्हार कृष्ण गोखले
@@AUTHORINFO_V1@@