आभासी जगाचा पुण्याविष्कार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018
Total Views |


‘जय शंभुनारायणा’ व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपने उभारली धर्मशाळा!



 ( फित कापून लोकार्पण करताना रुग्ण लोहार शेजारी जिल्हा शल्यचिकित्सक धकाते व इतर )
भंडारा : व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक हे आभासी जग आहे. प्रत्यक्षाचा आभास देणारे सारेच कसे अप्रत्यक्ष असते या जगांत. या जगांत जोडलेले अनेक फ्रेंडस् समोरासमोर आले की बोलणे तर दूरच, एकमेकांना ओळखतही नाहीत. आलेले फॉरवर्ड करणे इतकेच काय ते काम असते... अशा एका ‘जय शंभुनारायण’ या व्हॅट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांनी शासकीय रुग्णालयात रुग्णांसोबत येणार्‍या नातेवाईकांची होणारी गैरसोय न पहावल्याने चक्क धर्मशाळा सुरू केली. कधीकाळी हे काम गाडगेबाबांनी केले होते. डेबुजी आता या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर नव्याने अवतरला आहे, असेच म्हणावे लागेल.

जय शंभुनारायण या ग्रुपच्या सदस्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा निर्धार केला. जिल्हाशल्य चिकित्सकांकडे त्यांच्या ताब्यातील धुळखात पडलेली धर्मशाळा मागितली गेली. गादी, चादर, उशी, ब्लँकेटची सर्व व्यवस्था करण्यात आली अन्  २६ जानेवारीच्या चांगल्या मुहूर्तावर निस्वार्थी वृत्तीतून उभ्या झालेल्या ‘धर्मशाळे’चे लोकार्पण करण्यात आले, तेही एका रुग्णाच्या हाताने! तरुणांची इच्छाशक्ती आणि एका शासकीय अधिकार्‍याच्या खंबीर पाठींब्यामुळे आज रुग्णांचे नातेवाईक रात्र निवांत काढू शकणार आहेत.

सोशल मिडीयातील स्वप्न सत्यात आणण्याचे स्वप्न पाहिले अन् त्याला कृतीची जोड दिली तर काय होऊ शकते, याचा सुखद प्रत्यय जय शंभुनारायण या व्हॅट्सअ‍ॅपने दिला आहे. हा ग्रुप तरुणांचा आहे. या ग्रुपमधील तरुणांनी ग्रुपवर काही कल्पना मांडल्या. या सर्व कल्पना लोक आणि समाज उपयोगी होत्या. ज्या भागात हे तरुण रहात होते, तेथील सामाजिक वातावरणही यामुळे सकारात्मक दृष्ट्या बदलले. ऐवढेच काय तर ग्रुपला वर्ष झाल्याबद्दल वाढदिवस साजरा करताना या सदस्यांनी रुग्णालयातील रुग्णांना फळ व आवश्यक साहित्याचेही वाटप केले. आणखी काही तरी करण्याची इच्छा या तरुणांमध्ये होती. रुग्णालयातील रुग्णांसोबत आलेल्या नार्तवाईकांचे रात्रीच्या वेळी होणारे हाल, थंडीत उडणारी धांदल व विशेष म्हणजे हे नातेवाईक रुग्णालयाच्या इमारतीत असलेल्या वर्‍हांड्यांत पथारी टाकून उरकत असलेल्या जेवनावळींमुळे घाण होणारी इमारत याचा विचार करून या नातेवाईकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याचा विचार पुढे आला. रुग्णालय परिसरात धुळखात, घाणीच्या साम्राज्यात पडून असलेली धर्मशाळा मिळाल्यास या कल्पनेला मुर्तरूप दिले जाऊ शकते, हे हेरून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते यांची भेट घेतली. आजपर्यंत राबविलेले उपक्रम आणि भविष्यातील कल्पनेसंदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनीही पाठीशी उभे राहण्याचा शब्द दिला. वाढलेली झुडूपे, साचलेली घाण सदस्यांनी श्रमदानाने दूर केली. इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली. डॉ. धकाते यांच्या प्रयत्नातून परिसराला कूंपण, विजेची व्यवस्था व पडदे लावून देण्यात आले आणि भंगार झालेल्या इमारतीला जीवंत रूप आले. २६ जानेवारी रोजी कुशन लोहारे या रुग्णाच्या हस्ते फित कापून धर्मशाळेचे लोकार्पण झाले. जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. धकाते, उपविभागीय पोलिस अधिकारी जोगदंड, पोलिस निरीक्षक सिडाम, डॉ. गिर्‍हेपुंजे यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.


या धर्मशाळेत ग्रुप सदस्यांची पूर्णपणे देखरेख राहणार असून नातेवाईकांना स्वयंपाक करण्याची व्यवस्थाही करून दिली जाणार आहे. २४ तास सुरक्षा रक्षक व कोणत्याही क्षणी ग्रुपचे सदस्य मदतीला धावून जाण्यास तप्तर असतील. ग्रुपचे अध्यक्ष क्रिष्णा उपरिकर, निरंजन निनावे, गोलू आंबीलकर, राम हेडाऊ, गोवर्धन निनावे, संदिप हिरणवार यांच्यासह सर्वच सदस्यांच्या सक्रीयतेने हा पुण्याविष्कार साकारला आहे.
@@AUTHORINFO_V1@@