दीदींची पावले पडू लागली २०१९च्या दिशेने...!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2018   
Total Views |

अलीकडेच तृणमूल सरकारने उद्योजकांच्या एका शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला. या शिखर परिषदेच्या जाहिराती राष्ट्रीय पातळीवरील दैनिकातून देण्यात आल्या होत्या. त्यात गैर काही नाही, पण ज्या प्रकारे गाजावाजा करण्यात येत होता त्यातून केंद्र सरकारबद्दलची असूयाही दिसून येत होती. एखादे राज्य पुढे जात असेल तर कोणाही भारतीयाला आनंदच होईल. पण, आपला सवतासुभा असल्यासारखे वागणे मात्र कोणालाच रुचणार नाही. पण, ममता बॅनर्जी यांना हे कोण सांगणार?
 
एकेकाळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राहिलेल्या ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी फारकत घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाशी उभा दावा मांडल्यासारखे वागायचे ठरविले असल्याचे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. २०१९ साली होणार्‍या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन त्यांची पावले पडण्यास या आधीच सुरुवात झाली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सतत टीका करणे, केंद्र सरकार प. बंगालला नीट मदत करीत नाही, असा आरडाओरडा करीत राहणे असा त्यांचा एककलमी कार्यक्रमआहे की काय, असे वाटू लागले आहे. भाजपला विरोध करणार्‍यांना जवळ करायचे, त्यांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करायचा, केंद्र सरकारच्या पानभर जाहिराती येत आहेत ना, मग आपणही मागे नाही हे दाखवून आपल्याही पानभराच्या जाहिराती राष्ट्रीय दैनिकात झळकवायच्या, असे त्यांचे सध्या उद्योग चालू आहेत. त्याच्या जोडीला, धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पांघरून मुस्लीमसमाजाचे लांगूलचालन करणार्‍या ममतादीदींनी आपण हिंदू समाजाच्याही बाजूचे आहोत, हे दाखविण्यास प्रारंभ केला आहे. एखाद्या निर्णयाशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसताना त्या सरकारची बदनामी करण्याची एकही संधी सोडायची नाही, असे त्यांनी ठरविले असल्याचे दिसून येत आहे.
 
अलीकडे सर्वोच्च न्यायालयात जो ‘भूकंप‘ झाला, त्याच्याबद्दल लगेच ममता बॅनर्जी यांनी चिंता व्यक्त केली. या घडामोडींशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नसतानाही, न्यायपालिकेत होणारा केंद्र सरकारचा बाह्य हस्तक्षेप लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक असल्याचेही त्यांनी जाहीर करून टाकले. प्रत्यक्षात न्यायपालिकेच्या या घडामोडींमध्ये केंद्र सरकारने कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप केलेला नव्हता. उलटपक्षी, न्यायपालिकेने आपले अंतर्गत प्रश्न स्वत:च सोडवावेत, अशी भूमिका घेऊन त्यांचे स्वतंत्र अस्तित्व अबाधितच राहायला हवे, हे दाखवून दिले होते. पण, या प्रश्नावर केंद्र सरकारला बदनामकरण्याची जी मोहीमविरोधकांनी उघडली होती, त्यात ममता बॅनर्जी यांनीही हात धुवून घेतले. अशीच एक घटना म्हणजे आमआदमी पक्षाच्या २० सदस्यांना अपात्र ठरविण्याचा जो निर्णय स्वायत्त असलेल्या निवडणूक आयोगाने घेतला, त्यावरून केंद्राच्या विरुद्ध विरोधकांची कोल्हेकुई सुरू झाली. ममता बॅनर्जीही त्यात सामील झाल्या. राजकीय सूड उगविण्यासाठी आयोगासारख्या घटनात्मक संस्थेचा वापर होता कामा नये, असे त्या बडबडल्या. केंद्र सरकारच्या इशार्‍यावरून ही कृती केली गेली, असे त्यांना सुचवायचे होते. या मुद्द्यावर आमआदमीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांची सहानुभूती मिळविण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. काही घडले की केंद्राकडे बोट दाखवायचे, टीका करण्याची एकही संधी सोडायची नाही, जे जे भाजपविरोधी ते ते आपले, या ममतादीदींच्या भूमिकेचा अनुभव देश घेत आहे. लोकसभा निवडणुका आता जवळ येऊ लागल्याने मोदी आणि भाजप यांना आव्हान देण्यासाठी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, शरद पवार आदी मंडळी कामाला लागली आहेत. पण, मोदी यांना टक्कर देण्यासाठी कोणाला पुढे करायचे, यावर या सर्वांचे एकमत होणे बाकी आहे. ते होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. कारण, या सर्वांनाच शिंक्यावरचे लोणी फक्त आपल्यालाच खायला मिळावे, असे वाटते!
 
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला मागील निवडणुकीपेक्षा कमी जागा मिळाल्याचा असुरी आनंद ममता बॅनर्जी यांना झाला होता. त्या भरात त्यांनी हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर यांचे तातडीने अभिनंदन करून त्यांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. पुढील जुळवाजुळव सोपी व्हावी म्हणूनच त्या असे वागल्या ना? ममता बॅनर्जी या धर्मनिरपेक्ष असल्याचा दावा करतात. पण, अल्पसंख्याकांचे लांगूलचालन त्या करीतच असतात. गेल्या दुर्गापूजा उत्सवाच्यावेळी त्याचे प्रत्यंतर आले. त्याच दरम्यान मोहरमआल्याने तृणमूल सरकारने दुर्गा विसर्जन मिरवणुकांवर निर्बंध आणले. अल्पसंख्याक समाजास चुचकारण्याचाच तो प्रकार होता. पण, आपल्या डावपेचात बदल करण्याचे तृणमूल कॉंग्रेसने ठरवलेले सध्या दिसते. मध्यंतरी बीरभूमजिल्ह्यात तृणमूलने ब्राह्मण पुरोहित संमेलनाचे आयोजन केले होते. त्या संमेलनात १५ हजार ब्राह्मण उपस्थित होते. त्यांचा शाल, गीतेची प्रत देऊन सन्मान करण्यात आला. मुल्लामौलवींना सरकारी मानधन आणि ज्यांच्या घरात गीतेची प्रत असतेच असते, त्यांना आणखी एका गीतेची भेट! हे संमेलन पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले होते, हे लक्षात घेता त्यामागचा हेतू काय होता, याची कल्पना यावी.
 
दरवर्षीप्रमाणे यंदाही दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील सागर बेटावरील गंगासागर मेळ्यात लाखो भाविक सहभागी झाले होते. या मेळाव्याचे निमित्त साधून ममतादीदींनी केंद्रावर टीका केली. ’’कुंभमेळ्यास जसे केंद्र सरकार आर्थिक मदत करते, तशी मदत याही मेळाव्यास देण्यात यावी,’’अशी मागणी त्यांनी केली. आपले शासन भाविकांची खूप काळजी घेते, हे दाखविण्यासाठी सहभागी झालेल्यांना विमा संरक्षण देण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. हा एवढा पुळका कसा काय आला? दुर्गापूजा विसर्जनावर निर्बंध आणणार्‍या तृणमूलला ब्राह्मणांचे, गंगासागर मेळ्याचे एकदमभरते कसे काय आले? कारण उघड आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे मंदिरांना भेटी देत सुटले आहेत, तर ममता बॅनर्जी हिंदू समाजास खुश करण्याच्या प्रयत्नात आहेत. कोलकाता विद्यापीठाकडून डी. लीट पदवी पदरात पडून घेतलेल्या ममता बॅनर्जी या भाजपला पाण्यात पाहतात. भाजपचा कार्यक्रमकसा हाणून पाडता येईल, असा प्रयत्न त्यांचे शासन करीत असते. याच महिन्यात भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने पूर्व मेदिनीपूर ते उत्तर बंगालमधील कूचबिहारपर्यंत एका बाईकरॅलीचे आयोजन केले होते. त्यास मोडता घालण्यासाठी सरकार न्यायालयात गेले. पण, न्यायालयाने सरकारचे म्हणणे अमान्य करून या आठ दिवसांच्या बाईक रॅलीला परवानगी दिली. भाजपला रोखण्याचा तृणमूलचा प्रयत्न असा फसला.
 
अलीकडेच तृणमूल सरकारने उद्योजकांच्या एका शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्यास प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा सरकारने केला. या शिखर परिषदेच्या जाहिराती राष्ट्रीय पातळीवरील दैनिकातून देण्यात आल्या होत्या. त्यात गैर काही नाही, पण ज्या प्रकारे गाजावाजा करण्यात येत होता त्यातून केंद्र सरकारबद्दलची असूयाही दिसून येत होती. एखादे राज्य पुढे जात असेल तर कोणाही भारतीयाला आनंदच होईल. पण, आपला सवतासुभा असल्यासारखे वागणे मात्र कोणालाच रुचणार नाही. पण, ममता बॅनर्जी यांना हे कोण सांगणार?
 
तृणमूलसह सर्व भाजप विरोधकांची २०१९च्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू झाली आहे. ‘‘भाजपविरोधी शक्ती मार्गदर्शनासाठी आमच्याशी संपर्क साधत आहेत,’’ असा दावा तृणमूलचे नेते करीत आहेत. या दाव्यात किती तथ्य आहे, ते निवडणुका जवळ येऊ लागल्या की दिसून येणार आहे!
 
 
- दत्ता पंचवाघ 
@@AUTHORINFO_V1@@