जेव्हा राजपथावरून निघते 'छत्रपतींची' स्वारी...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Jan-2018
Total Views |



नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकावर आधारित चित्ररथाचे आज दिमाखदार पद्धतीने राजपथ येथे सादरीकरण करण्यात आले. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आणि निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आलेल्या या चित्ररथाने राजपथ येथे उपस्थित सर्वांचीच मने जिंकली.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले, यानंतर सैनिकांचे संचलन आणि चित्ररथांच्या प्रदर्शनला सुरुवात झाली. यामध्ये महाराष्ट्राकडून 'शिवराज्याभिषेक' हा चित्ररथ सादर करण्यात आला. या चित्ररथाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ आणि वीरमुद्रेतील पुतळा उभारण्यात आला होता. मूर्तीच्या उजव्या हातामध्ये तलवार आणि पाठीवर ढाल अशा वीर आवेशात हा पुतळा साकारण्यात आला होता. त्यामागे काही मावळ्यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या होता. मावळ्यांच्या हातामध्ये अब्दागिऱ्या आणि राजचिन्हे दाखवण्यात आले होते. 

चित्ररथाच्या मध्यभागी रायगडाची प्रतिकृती दर्शविण्यात आली. सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, आभूषण देणारा दरबारी आणि त्यांच्या शेजारी पुरोहित गागाभट्ट उभे दिसत होते. या दरबारात इंग्रज अधिकारी सर हेन्‍री ऑक्सीडन दिसत होते. तसेच, न्यायाचा तराजू व त्या भोवती विविध फिरत्या प्रतिकृती दिसत होत्या. 
 
सरतेशेवटी चित्ररथाच्या मध्यभागी शिवराज्याभिषेकाचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. यामध्ये अष्टस्तंभाच्या मेघडंबरीमध्ये सिंहासनावर आरूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज दाखवण्यात आले होते. त्यांच्या उजव्या बाजूला राजमाता जिजाबाई, महाराणी सोयराबाई आणि राजपुत्र संभाजी राजे असा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस राजमुद्रा तसेच शिवराई व होण ही नाणी प्रतिकृती रूपात दर्शविण्यात आल्या होत्या. याचबरोबर रथाच्या चारी बाजूला भगव्या पताका आणि हिंदवी स्वराज्याचा राष्ट्रध्वज म्हणून ओळखला जाणारा भगवा ध्वज फडकवला जात होता. तसेच कवीराज भूषण विरचित 'इंद्र जिमि जंभ पर' या गीतासह या चित्ररथाचे राजपथवर संचलन करण्यात आले.



विशेष म्हणजे या चित्ररथाच्या आगमनाबरोबरच राजपथवर या सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व मराठी जनतेनी उभे राहून या चित्ररथाला अभिवादन केले. कोल्हापूरचे राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी देखील रथाच्या आगमनबरोबर उभे राहून 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली होती.

@@AUTHORINFO_V1@@