देव तुमचा आमचा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
माझ्या सारखी सामान्य माणसं देवाचं अस्तित्व मानतात. देव नावाचं जगात काही अस्तित्वातच नाही असेही काही लोकं मानतात हे मी ऐकलेले आणि वाचलेले आहे. पण माझ्या अवतीभवती असणारे सर्वजण म्हणजे मित्र मैत्रिणी, नातेवाईक, शेजारी सर्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या निर्मात्याला मानतात. त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याची पूजा अर्चना, स्मरण करतात. अस्वस्थ असताना कोणी देवीचे स्तोत्र म्हणत असतील तर कोणी मारुती स्तोत्र म्हणत असतील. माझी एक मैत्रीण convent मध्ये शिकली होती. तिला अशा वेळी prayer आठवत असे. हे तिनेच एकदा मला सांगितले होते. मन शांत व्हावं यासाठी प्रत्येकाचे असे काही उपाय असतातच. मला अशावेळी भीमसेन जोशींचे ‘ राम का गुण गान करिये ‘ हे भजन ऐकावसं वाटतं. हे भजन जेंव्हा ऐकते तेंव्हा रामाशी संबंधित अनेक विचार मनात तरंग उठवत राहतात. काही स्वतःचे तर काही वेगवेगळ्या पुस्तकात वाचलेले, रामाची महती वर्णन करणाऱ्या अनेक कथा – दंतकथा , कीर्तनातून ऐकलेल्या रूपक कथा. रामनाम घेता घेता, एका कडीतून दुसरी कडी तयार करते एक विचार शृंखला.
‘राम’ नामाचे महत्त्व वर्णन करणारी एक कथा मला फार आवडते. वाल्मिकी रामायण हा एक अद्वितीय ग्रंथ आहे. रामरक्षा इत्यादी श्लोकांसह शंभर कोटी श्लोक त्यात आहेत. या ग्रंथाची रचना झाल्यावर, मानव, देव आणि दानव त्यासाठी भांडू लागले. मानवांचे म्हणणे होते की, राम मानव रुपात अवतरला त्यामुळे रामायणावर आमचा अधिकार आहे. देव म्हणाले की, राम हा विष्णूचा अंश आहे म्हणून रामायण आमचे आहे. दानव म्हणाले रामायणात दैत्यराज रावणाच्या पराक्रमाचे वर्णन आहे. त्याच्या मुळेच ते घडले त्यामुळे रामायण फक्त आमचे आहे. ब्रम्हदेवाने त्या तिघांना महादेवांकडे पाठवले. महादेवांनी शंभर कोटी श्लोक तिघांमध्ये वाटले. प्रत्येकाला तेहतीस कोटी, तेहतीस लक्ष, तेहतीस हजार तीनशे तेहतीस श्लोक मिळाले. तरी एक श्लोक वाटायचा राहिला. त्या श्लोकात बत्तीस अक्षरे होती. महादेव म्हणाले, “ बाबांनो, तेहतीस अक्षरे असती तर प्रत्येकाला अकरा – अकरा दिली असती. पण बत्तीसच अक्षरे आहेत. तेंव्हा तुम्हाला दहा – दहा अक्षरे देतो आणि दोन मला ठेऊन घेतो.”
तिघांनी विचार केला की, महादेवांनी निःपक्षपातीपणे आपल्याला वाटणी करून दिली आहे. आता दोन अक्षरे ही किरकोळ बाब आहे. त्या सर्वांनी लगेच होकार दिला. होकार मिळाल्याबरोबर महादेवांनी लगेच त्यातली ‘राम‘ ही दोन अक्षरे स्वतःकडे ठेवून घेतली. तेंव्हा मानवाला ‘राम‘ या दोन अक्षरांचे सामर्थ्य लक्षात आले आणि तेंव्हा पासून जीवनात ‘राम‘ आणण्याचा मानव प्रयत्न करत आहे. अशी ही राम नामाचे महत्त्व सांगणारी कथा.
एखादी महान व्यक्ती समाजात उदयाला आली की, तिला आपण तिला ‘ देव ‘ करून टाकतो. गाभाऱ्यात तिला बसवून टाकलं आणि येता जाता नमस्कार केला की झालं ! त्याच्या जीवनाचे अनुकरण करण्याच्या जबाबदारीतून मुक्त होता येतं. वाल्मिकी रामायणातला राम हा मला आपल्यासारखाच मानव वाटतो. सीतेच्या विरहाने तो विलाप करतो तेंव्हा तो आपल्याला अधिकच जवळचा वाटतो. त्यामुळेच त्याच्या अचाट कर्तुत्त्व, अतुलनीय धैर्य, अखंड सावधानता या गुणांचे कौतुकही वाटते आणि आदरही वाटतो. मानवी जीवनातील पराधीनता त्याने धीरोदात्तपणे स्वीकारली. त्याबद्दल कोणालाही दोष दिला नाही. ही जाणीव मनाची अशांती दूर करते. आपणही त्याच्यासारखे उदात्त जीवन जगू शकतो असा विश्वास मनात जागतो. प्रत्यक्ष विष्णूने, मानवी जीवनाचा प्रवास मनुष्यत्त्वाकडून देवत्त्वाकडे कसा होऊ शकतो हे दाखवण्यासाठी श्रीरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला असावा. रामनामाचा उच्चार करण्याबरोबर त्याचे गुण सतत स्मरणात ठेवून यथाशक्ती तसे वागण्याचा प्रयत्न आपण नक्की करू शकतो हा विश्वास मनाला आश्वस्त करतो.


- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@