लाचखोर पोलीस उपनिरीक्षक गजाआड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 

 
 
मलकापूर : अवैध रेतीचे टिप्पर सुरळीतपणे चालू देण्याचा मोबदला म्हणून हप्ता घेणारे मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व एका पोलीस कर्मचाऱ्याला ७ हजाराची लाच घेताना अकोला अँटी करप्शन ब्युरोने पकडल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली. या कारवाई मुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
 
मलकापूर येथील अभिजित मास्कर हे गौण खनिज विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांचे ३ टिप्पर रेती वाहतूक करतात हे ३ टिप्परद्वारे रेती वाहतूक करू देण्याचा मोबदला म्हणून प्रति टिप्पर ३ हजार रुपये म्हणजे ९ हजार रुपये हप्ता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंबादास किसन हिवाळे यांनी मागितला होता. तडजोडी अंती ७ हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले. या बाबतची तक्रार अभिजित मास्कर यांनी अकोला अँटी करप्शन ब्युरो अकोला यांचेकडे दाखल केली होती त्यांनी पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
 
आज सकाळी १०. ३० वाजता मास्कर यांनी ७ हजार रुपये लाचेची रक्कम पोलीस हवालदार मोहम्मद इस्तीयाक शेख बुढन यांना दिली ती त्याने घेऊन कॅबिन मध्ये बसलेल्या पोलीस निरीक्षक अंबादास किसन हिवाळे यांच्याकडे नेऊन दिली असता त्यांनी ती रक्कम खिशात टाकताच दबा धरून बसलेल्या अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दोघांना रंगेहात पकडत ताब्यात घेतले तर तक्रारदाराला हप्त्यापोटी लाचेची रक्कम ठाणेदार यांना देण्यासाठी प्रोत्साहित करणारे पोलीस उपनिरीक्षक साहेबराव शंकर खांडेकर याला पथकाने त्याच्या घरून ताब्यात घेतले.
 
 
कारवाईची माहिती मिळताच संपूर्ण पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. तसेच रेती व्यावसायिकांनी पोलीस स्टेशन आवारात एकच गर्दी केली. या कारवाईमध्ये अकोला अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस निरीक्षक व प्रभारी पोलीस उपअधीक्षक ईश्वर चव्हाण, हवालदार चंद्रकांत काळे, विजय पंचबुद्धे, नाईक सुनील राऊत, शिपाई संतोष दहीहांडे, प्रविण कश्यप यांचा समावेश होता.
 
@@AUTHORINFO_V1@@