‘अनुवाद हा भाषांतरापलीकडचा...’

    21-Jan-2018   
Total Views | 74
 

 
मारियानो अंतोलिन रातो या स्पॅनिश लेखकानुसार अनुवाद ही अशक्यप्राय गोष्ट आहे, तर जोसे सॅरामॅगो हा लेखक म्हणतो की, ‘‘एक लेखक राष्ट्रीय साहित्य लिहितो, तर अनुवादक जागतिक साहित्य निर्माण करतो.’’ तेव्हा, अनुवाद वाटतो तितका सोपा प्रकार नाही. लक्ष्य भाषा आणि स्रोत भाषा अशा दोन्ही भाषांवर प्रभुत्व आणि इतर कौशल्ये अनुवादाकाच्या अंगी असावी लागतात. मराठी साहित्यालाही अनुवादाची मोठी परंपरा आहे. सुजाता देशमुख याच परंपरेच्या पाईक. नुकतचं त्यांनी अनुवाद केलेल्या ‘गौहर जान म्हणतात मला’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’ला दिलेल्या मुलाखतीत सुजाता देशमुख यांनी उलगडलेला अनुवादाचा अन्वय...
 

‘गौहर जान’ या पुस्तकाच्या भाषांतरामागची प्रेरणा कोणती?
‘भाषांतर’ या शब्दापेक्षा ‘भावानुवाद’ हा शब्द मला जास्त योग्य वाटतो आणि प्रत्येक अनुवाद हा भावानुवाद व्हावा, यावर माझा कटाक्ष असतो. ‘गौहर जान’ ही फार मोठी कलाकार मानली जाते. तवायफांच्या कोठ्यांतून आणि श्रीमंतांपुरत्या मर्यादित बैठकांतून भारतीय शास्त्रीय संगीत जिच्यामुळे घराघरांत पोहोचलं, ती ही गौहर जान. कारण, भारताची ती पहिली ग्रामोफोन गायिका होती. मुख्य म्हणजे, बालगंधर्वांच्या आयुष्यातली गौहर जान ती ही नव्हे.
 
पूर्वीच्या काळातल्या बहुतांश कलावंतांच्या, विशेषतः सगळ्या स्त्री कलावंतांच्या सांगितिक प्रवासामागे प्रचंड कष्टांचा, अपरिमित संकटांचा आणि दुःखांचा सामना आहे. त्यातून त्या बावन्नकशी सोन्यासारख्या तावून-सुलाखून निघालेल्या आहेत. होतं काय की, त्यांचं गाणं आजही नावाजलं जातं. परंतु, तो कालखंड अज्ञातच राहतो. हा सांगितिक वारशाचा मागोवा मग कुणी विक्रमसंपतसारखा उमदा, अभ्यासू कलाकार घेत जातो आणि त्यातून उभा राहतो त्या कालखंडाचा ऐतिहासिक दस्तऐवज. तोही ललित शैलीमधला. नोंदी स्वरूपांमधला हा क्लिष्ट इतिहास अशा प्रवाही पद्धतीने सामान्य वाचकांपर्यंत पोहोचला, तर पूर्वसुरींचा केवढा मोठा ठेवा आपल्यासमोर येतो हे लक्षात येतं.
 
भारताची ही संपन्न संस्कृती जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी इंग्रजीतून ती येणं महत्त्वाचं आहेच. तरीही आपल्या मातृभाषेतनं तिचा प्रसार व्हावा या उद्देशाने अनुवादासाठी मी या चरित्राची निवड केली. पुस्तक वाचलं तर, विक्रमसंपतच्या अभ्यासू संशोधक वृत्तीचा आणि त्यानं गौहर जानचे जे कॅलिडोस्कोप पैलू पुढे आणले आहेत त्याचा, उस्ताद अमजद अली खॉं, पं. अरविंद पारीख आणि पं. जसराज अशांसारख्या दिग्गजांनी लेखी प्रतिक्रिया देऊन कसा गौरव केला आहे, ते लक्षात येतं.
 
पुस्तकाचे भाषांतर आपल्याला कितपत आव्हानात्मक वाटते? आजवर कुठलं पुस्तक भाषांतरित करताना अडचणी आल्या का?
 
‘अनुवाद’ हा भाषांतरापलीकडे जातो. ती एक वेगळी कलाकृतीच असते. परंतु, तरीही साहित्यामध्ये अनुवादाला दुय्यम स्थान मिळण्यामागे ‘नैसर्गिक मातृत्व’ आणि ‘दत्तक मातृत्व’ हा फरक मानला जात असावा. अनुवाद म्हणजे, ‘मदरिंग ऍन ऍडॉप्टेड चाइल्ड!’ थोडक्यात, आयतं मातृत्व! परंतु, स्वतःच्या रक्ताच्या असो, वा दत्तक असो, मुलाचं संगोपन हे तेवढ्याच जिकिरीचं, कस लावणारं असतं. कोणतंही पुस्तक एका भाषेतून दुसर्‍या भाषेत आणताना दोन्हीतले बारकावे अनुवादकाला माहिती असावे लागतात. नुसते भाषिक बारकावेच नव्हे, तर पुस्तकाच्या विषयाची आणि लेखकाची संपूर्ण प्रकृतीही लक्षात घ्यावी लागते. त्यामुळे हे कामनुसतं आव्हानात्मकच नव्हे, तर कमालीच्या जबाबदारीचंही असतं. माझे आत्तापर्यंत एकूण आठ अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यापैकी प्रसिद्ध पत्रकार दिलीप पाडगांवकर यांच्या ‘अंडर हर स्पेल’ (‘तिची मोहिनी’) या पुस्तकाचा अनुवाद मला जिकिरीचा गेला. त्याचं कारण असं की, या पुस्तकाची पुष्कळशी पार्श्वभूमी परदेशी होती आणि त्यामध्ये फ्रेंच, इटालियन आणि स्पॅनिश शब्दांची रेलचेल होती. त्यामुळे हा अनुवाद करताना मला त्या त्या भाषेच्या जाणकार व्यक्तींची प्रत्येकी चार-पाच शब्दांकरिता मदत घ्यावी लागली.
 
 

 
 
तुमचं आवडतं आणि अनुवादासाठी आदर्श पुस्तक कोणतं?
 
‘आवडतं’ आणि ‘आदर्श’ या दोन्हीसाठी मी दोन अनुवादांचा उल्लेख करेन. ‘दहशतीच्या छायेत : डायरी एका काश्मिरी अनामिकाची’ आणि ‘माझंही एक स्वप्न होतं’ या डॉ. वर्गीस कुरियन यांच्या आत्मचरित्राचा. ही दोन पूर्णपणे भिन्न प्रकृतीची पुस्तकं मला आवडतात. कारण, एकामध्ये फाळणीपासून भारताला जडलेल्या काश्मीरच्या भळभळत्या जखमेचा अगदी वेगळ्या प्रकारे लेखाजोखा मांडलेला आहे. तिथला दहशतवाद, आपल्या देशात राजकारण्यांनी प्रत्येक प्रश्नाचं केलेलं राजकारण, मानवी मूल्यांची सरसकट झालेली पायमल्ली... माझी नुसतीच वांझोटी चिडचिड, तगमग होत होती. अशावेळी या भावानुवादानं एका प्रकारे माझं कॅथार्सिस झालं, तर दुसर्‍या पुस्तकातनं, स्वातंत्र्योत्तर काळात महात्मा गांधीजींइतकी भारताची नस जाणणार्‍या डॉ. कुरियन यांनी ग्रामीण भागात शेतकर्‍यांना एकत्र करून, दुधाचा जोडधंदा उभारून भारतासारख्या दूध-लोणी आयात करणार्‍या देशाला नुसतं स्वावलंबीच नव्हे, तर जगातल्या प्रमुख निर्यातदार देशांच्या ओळीत बसवण्याची अभूतपूर्व क्रांती कशी केली, हे समग्रपणे पुढे येतं. या पुस्तकानं मला अतिशय सकारात्मक दृष्टिकोन आणि ऊर्जा बहाल केली.
 

तुमचे आवडते अनुवादक कोण?
 
अगदी खरं सांगायचं झालं तर मी स्वतः फारसे अनुवाद वाचत नाही. आपण अनुवाद कोणते आणि केव्हा वाचतो? जेव्हा आपल्याला ती भाषा कळत नसेल तेव्हा. मुळामध्ये मी इंग्रजी, मराठी आणि क्वचित हिंदीही वाचते. रशियन, जपानी, चिनी, कोरियन अशा भाषांतल्या अनुवादित कथाही इंग्रजीतून अधूनमधून वाचते. परंतु, त्यांचे अनुवादक लक्षात नाहीत. मात्र, विजय तेंडुलकर, रामपटवर्धन, मंगेश पाडगांवकर, विंदा करंदीकर, पु. ल. देशपांडे, वि. वा. शिरवाडकर यांचे जे जे अनुवाद वाचले, ते मनावर प्रचंड प्रभाव पाडून गेले. खूप आवडले. यामागचं साधं कारण असं की, ही सर्व मंडळी स्वतः दिग्गज सर्जनशील लेखक तर होतीच, शिवाय इंग्रजी वा मराठीचे अत्यंत नावाजलेले प्राध्यापकही होते. त्यांची स्वतःची प्रतिभा, भाषांवरचं प्रभुत्व आणि कमालीची देखणी लेखनशैली यांमुळे त्यांचे अनुवाद अप्रतिमझाले नसते, तरच नवल!
 
तुमच्या आगामी काळात प्रकाशित होणार्‍या अनुवादित पुस्तकांविषयी काय सांगाल?
 
हॉंसदा सौभेन्द्र शेखर या संथाळी लेखकाचा ‘आदिवासी विल नॉट डान्स’ (‘नाचणार नाही आदिवासी आता’) हा युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता कथासंग्रह मी अनुवादित केला आहे. तो लवकरच प्रकाशित होईल. आदिवासी जगातल्या सहसा माहीत नसलेल्या आयुष्याचा विविधांगांनी या कथांमध्ये परामर्श घेण्यात आला आहे. याशिवाय ‘अ ग्रीफ टू बरी’ (‘दुःखाचे थडगे’) हा वसंत कन्नाबिरन यांच्या पुस्तकाचा अनुवादही येऊ घातला आहे. कोणत्या ना कोणत्या कारणानं जोडीदाराची कायमची ताटातूट झाल्यानंतर ज्या तेरा बायकांनी आयुष्यामध्ये मोठमोठाली कामं उभी केली, त्यांच्या या मुलाखती आहेत.
 
 

- तुषार ओव्हाळ
 

तुषार ओव्हाळ

मास मीडियामध्ये पदवी. मराठी वृत्तवाहिनीसाठी ३ वर्षे राजकीय आणि इतर संशोधन. राज्यशास्त्र विषयात रूची. वाचनाची आवड. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये उपसंपादकपदी कार्यरत.

अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यात बंदरक्षेत्रात १२० कोटींची विदेशी गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सहा जिल्ह्यांमध्ये आयटीआय संस्थाचे आधुनिकीकरण दरवर्षी ५०००-७००० तरुणांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार बंदरे आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग,बंदरे विभाग आणि अटल सॉल्युशेन,एम.डी रुरल ग्रुप यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील विदेशी पतसंस्था सामंजस्य करारातंर्गत १२० कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिक मधील सहा निवडक आयटीआय..

स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंदांपासून सावधान! स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे गंभीर आरोप

स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंदांपासून सावधान! स्वामी गोविंदानंद सरस्वती यांचे गंभीर आरोप

"स्वतःला शंकराचार्य म्हणवणाऱ्या अविमुक्तेश्वरानंद सारख्या खोट्या साधूबाबा पासून सावध राहा. महाराष्ट्राची संस्कृती, राज्यातील विविध संप्रदाय आणि धर्माचा नाश करण्याच्या उद्देशाने हा संन्यासी बनून फिरतो आहे", असा गंभीर आरोप स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती यांनी मंगळवारी केला. स्वामी श्री गोविंदानंद सरस्वती हे पूज्यपाद बद्री ज्योतिर्मठ, द्वारका शारदा पीठ जगद्गुरू शंकराचार्य ब्रह्मलीन स्वामी स्वरूपानंद सरस्वती जी महाराज यांचे दण्डी संन्यास दीक्षित शिष्य आहेत. प्रेस क्लब, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121