तूच माझी वंडर शेफ....

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
भारी वाटतं ना, वंडर शेफ वगैरे वाचून! शुध्द मराठीत 'तूच माझी अन्नपूर्णा' असं लिहिलं असतं ना तर चक्क एखादा, समस्त भगिनी वर्गाच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या अखंड धारा वाहतील असा प्रचंड इमोशनल मराठी सिनेमा वाटला असता. 'सुगरण' पण छान शब्द आहे ! पण 'सुगरण' नाव असलेले मराठी कार्यक्रम इतके झालेत की, घासून गुळगुळीत झालंय ते नाणं! शिवाय 'वंडर शेफ'ची शान 'सुगरण'ला नाही. सुगरणीवरून आठवलं - सुगरण पक्षिणीला 'सुगरण' नाव का पडलं असावं? खोपा मस्त बांधते ती म्हणून ! पण चारा तर नेहमीचाच देत असणारा पिल्लांना.
 
असो. अजून एक गंमत आठवली. रोज रोज शिकरण करणारी मामी सुगरण म्हणवली जात असेल तर मग मला पण सुगरण म्हणायला काहीच हरकत नाही! असो. थोडेसे विषयांतर झाले.
 
टीव्हीवर हमखास टी.आर.पी मिळवणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पाककला संबंधीचे कार्यक्रम असतात. सगळेच उत्कृष्ट दर्जाचे असतात असे नाही पण तरी बहुतांश भगिनी वर्ग आवडीने हे कार्यक्रम पाहतो. आता तर लहान मुले पण पदार्थ करून दाखवतात. शिवाय सध्या देशोदेशींच्या पदार्थांची पण खूप विविधता आहे. परदेशी भाज्या फळे पण शहरांमध्ये मिळायला लागली आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमांचा आवाका पण वाढला आहे. 'पाककला स्पर्धा' हा पण खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. अशा एका कार्यक्रमात माझ्या एका मैत्रिणीला 'गूळ – पोळी' स्पर्धेत बक्षिस मिळालं. तिने कौतुकाने आमच्या ग्रुप मधील मैत्रिणींना गूळ पोळी खायला बोलावले होते. मुले पण बरोबर होती. तिच्याकडून परत येताना घडलेला एक संवाद असा होता -
 
"चिनू, एकच पोळी का खाल्लीस ? मावशी किती आग्रह करत होती!"
"मला नाही आवडली गूळ पोळी मावशीची !"
"का रे ? स्पर्धेत बक्षीस मिळालंय तिला गूळ पोळी साठी !"
"तू करतेस तशाच पोळ्या आवडतात मला. तू करणार आहेस ना?"
"अरे मला तिच्यासारख्या गुळपोळ्या जमत नाहीत. एकही पोळी फुटली नव्हती तिची. गूळ जरासुद्धा बाहेर आला नव्हता."
"अगं आई म्हणूनच नाही आवडल्या मला त्या. तुझ्या पोळ्या कशा खमंग लागतात! गूळ बाहेर आलेलाच आवडतो मला."
मला खूप गंमत वाटली हा संवाद ऐकून. कोणताही खाद्यपदार्थ कसा असला पाहिजे याचे पाकशास्त्राप्रमाणे काही नियम असतात. पुरणपोळी – पिवळीधमक, लुसलुशीत. मोदक – कळीदार, मोठे, पांढरेशुभ्र, पातळ आवरण आणि खमंग सारण. गुलाबजाम – आतपर्यंत पाक शिरलेले इत्यादी.
 
 
नेहमीच्या पदार्थांमध्ये भात – पांढराशुभ्र, मोकळा. साबुदाणा खिचडी – मोकळी. पातळ पिठले – गुठळ्या नसलेले, असे असेल तर चांगले समजतात. पण हे सर्व नियम पाळून केलेला स्वयंपाक घरातल्या सर्वांना आवडेलच असं अजिबात नाही. खरी गंमत अशी आहे की प्रत्येक घराचं असं एक वेगळं cook – book असतं. आज्जीच्या, आईच्या, ताईच्या ठराविक पदार्थांची ठराविक चव इतकी आंगवळणी (जीभवळणी) पडलेली असते की तो पदार्थ पाकशास्त्राप्रमाणे आदर्श आहे की नाही यामुळे काही फरकच पडत नाही.
 

 
 
एका नवपरिणीत दाक्षिणात्य नवरा बायकोची एक गोष्ट मला आठवते. घरी कॉफीच्या बिया भाजून, त्या दळून, कॉफी करण्याची घरात पद्धत असते. कितीही छान कॉफी केली तरी नवऱ्याचं एकच पालुपद – माझ्या आईसारखी नाही जमली – बायको बिचारी हिरमुसली आणि तिने नाद सोडून दिला. एके दिवशी बिया भाजताना तिचं लक्ष नव्हतं त्यामुळे त्या जळल्या. उशीर व्हायला नको म्हणून तिने त्याच दळल्या आणि कॉफी केली. नवरा एकदम खूष ! म्हणाला, “ आज जमली तुला अगदी माझ्या आई सारखी कॉफी !"
 
मोकळी साबुदाणा खिचडी आदर्श असेलही पण गोळा खिचडी आणि ती पण खाली थोडीशी लागलेली, खरपुडी झालेली, आवडत असेल तर, ती तशी करणारी - हल्ली तुझा स्वयंपाक अळणी असतो असा आरोप, सासूच्या बीपी मुले किंवा सासऱ्यांच्या अल्सरमुळे, हसतमुखाने सहन करून, बाकीच्यांसाठी लसणीचे तिखट करून ठेवणारी - दाण्याचे कूट, खोबरे, कोलेस्ट्रोल साठी वाईट म्हणून, त्या शिवाय चविष्ट कोशिंबीर करणारी - चणाडाळ सोसत नाही म्हणून मूग डाळीचे पुराण घालणारी - कोणाची आवडनिवड तर कोणाचे पथ्यपाणी सांभाळत स्वतः स्वयंपाक करणारी किंवा ‘काकू‘ ‘मावशी‘ नामक नाव धारण करून येणाऱ्या सखी कडून तो करून घेणारी – अशी घराघरात आढळणारी या वंडरशेफची किती विविध रूपे आहेत!
 
कोणत्याच स्पर्धेत भाग न घेतलेल्या किंवा भाग घेऊनही यशस्वी न ठरलेल्या अशा कित्येक सुगरणी घरातल्या सदस्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. कारण मनापर्यंत पोचण्याचा मार्ग पोटातून जातो. तीच असते त्या सर्वांची खरीखुरी "वंडर शेफ".
 
- शुभांगी पुरोहित
@@AUTHORINFO_V1@@