सत्तरीतील मधुचंद्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018   
Total Views |
 

 

भारत आणि इस्रायल या दोन देशांच्या स्वातंत्र्यानंतर सात दशकांच्या प्रतिक्षेनंतर पार पडत असलेला मधुचंद्र ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. आता दोघांचेही पाय जमिनीला लागायला लागले असून गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी भव्यदिव्य, पण अवास्तव गोष्टींची अपेक्षा करण्याऐवजी एकत्र काम करताना उद्भवणार्‍या अडचणींवर मार्ग कसा काढायचा, यावर द्विपक्षीय चर्चेचा भर राहिला आहे. मग ते इस्रायलचे केंद्र सरकार आणि भारतातील राज्यांमधील सहकार्य असो; थेट विमानसेवा सुरू करण्यामागच्या अडचणी असोत; हिंदी चित्रपट उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवलती असोत किंवा थेट विमानसेवेचे अधिक पर्याय उपलब्ध करणे असो, या समस्यांच्या सोडवणुकीमुळे द्विपक्षीय संबंधांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकेल.
 
दिल्ली आणि आग्य्राला भेट दिल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आपल्या ऐतिहासिक भारत दौर्‍याच्या तिसर्‍या टप्प्यात आज गुजरातची राजधानी गांधीनगरला भेट देत असून पंतप्रधान मोदी त्यांच्यासोबत भव्य रोड शो करणार आहेत. गुजरातमध्ये शेती, पाणी आणि नव-उद्यमी उद्योजकता हे विषय नेतान्याहूंच्या कार्यक्रम पत्रिकेवर असतील. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमानंतर संध्याकाळी उशिरा नेतान्याहूंचे मुंबईत आगमन होत आहे. उद्याच्या दिवसभरात आघाडीच्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या अध्यक्षांसोबत चर्चा, सुमारे १३० इस्रायली आणि २५० भारतीय उद्योजकांसमोर भाषण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत दुपारचे भोजन आणि महाराष्ट्र-इस्रायल सहकार्यावर चर्चा, २६/११ च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली, नरीमन हाऊसला भेट देऊन नऊ वर्षांपूर्वी आश्चर्यकारकरित्या वाचलेल्या मोशे आणि त्याच्या कुटुंबीयांची भेट, मुंबई आणि देशभरातील ज्यू समाजाच्या नेत्यांशी चर्चा आणि शेवटी ‘शालोमबॉलिवूड’ या कार्यक्रमाद्वारे सिनेसृष्टीतील आघाडीच्या कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांना एका सांस्कृतिक कार्यक्रमात इस्रायलला यायचे निमंत्रण देऊन ते जेरुसलेमकडे मार्गस्थ होतील.
 
भारत-इस्रायल संबंधांच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सांगता या महिन्याच्या अखेरीस होत असली तरी त्यांच्यातील मधुचंद्राला नुकतीच सुरुवात झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत भारताच्या पंतप्रधानांनी इस्रायलला पहिल्यांदाच भेट दिली, तर इस्रायलच्या पंतप्रधानांनी केवळ दुसर्‍यांदा भारतात पाऊल टाकले. दोन देशांचे राष्ट्रपती, कृषिमंत्री, भारताच्या विदेश मंत्री आणि इस्रायलचे संरक्षणमंत्री यांच्या जोडीला वरिष्ठ शासकीय अधिकारी, उद्योजक आणि विद्यार्थ्यांच्या भेटी नित्याच्या झाल्या आहेत. आज इस्रायलमधील परदेशी विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक, म्हणजे १० टक्के भारतीय असून आशियातून सर्वाधिक पर्यटक भारतातूनच भेट देतात. आज भारत-इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून उभ्या राहात असलेल्या ३५ कृषी गुणवत्ता केंद्रांपैकी २० पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असून आघाडीच्या भारतीय कंपन्यांनी इस्रायली संशोधन आणि स्टार्ट अप कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. भारताच्या ’मेक इन इंडिया’ या धोरणाला इस्रायलने ’मेक विथ इंडिया’ची जोड दिली आहे.
 
या मधुचंद्रासाठी दोन्ही देशांना स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षं वाट पाहावी लागली. २९ जानेवारी १९९२ रोजी भारत आणि इस्रायल यांच्यात पूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. गेल्या २५ वर्षांत द्विपक्षीय व्यापारात २० पट वाढ झाली असली आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य अधिकाधिक मजबूत झाले असले तरी या संबंधांवर हिरे, ठिबक सिंचन आणि संरक्षण या तीन क्षेत्रांचा प्रचंड प्रभाव होता. आजही तो आहे. गेल्या काही वर्षांत खासकरून नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या इस्रायल दौर्‍यानंतर या संबंधात खूप मोठ्या प्रमाणावर वैविध्य आले. गटशेतीच्या माध्यमातून एकात्मिक प्रादेशिक विकास, पुनर्चक्रीकरण केलेल्या पाण्याचा शेतीसाठी वापर, ग्रीड पद्धतीने पाणीपुरवठा, सायबर सुरक्षा, शिक्षण, स्टार्ट-अप कंपन्या आणि त्यांना भांडवल पुरवठा करणार्‍या वेंचर फंडांतील सहकार्य, स्मार्ट शहरं, चालकरहित वाहनं, सिनेमा आणि मनोरंजन, स्वच्छ ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता असे नवनवीन आयाम प्राप्त होत आहेत. भारताच्या दृष्टीने इस्रायल बद्दलचे कुतूहल आणि नवखेपणा आता कमी कमी होत आहे. ही चांगली गोष्ट असली तरी आव्हानात्मक आहे.
 
लग्नाच्या वेळेस एकमेकांकडून बाळगलेल्या अवास्तव अपेक्षा मधुचंद्रानंतर रूटीन आयुष्य सुरू झाल्यानंतर संपून आपले पाय जमिनीला लागतात. असे म्हटले जाते की, अन्य देशांत लोक चमत्कारांवर विश्वास ठेवतात; पण अत्यंत विपरीत परिस्थितीत स्वतंत्र झालेल्या आणि तगून राहिलेल्या इस्रायलसाठी चमत्कार किंवा अशक्यप्राय गोष्टी करणे ही नित्याची गोष्ट आहे. असे असले तरी, इस्रायल हा महाराष्ट्रातील साधारणतः दोन जिल्ह्यांच्या आकाराचा देश आहे. इस्रायलने लावलेल्या शोधांमध्ये, त्याने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामध्ये भारतातील अनेक समस्यांची सोडवणूक करण्याची क्षमता असली तरी ते जादूची कांडी फिरविण्याइतके सोपे नाही. इस्रायलला अनेक प्रकारच्या विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागला असला तरी एक गोष्ट त्यांच्या पथ्यावर पडली, ती म्हणजे आजच्या इस्रायलची बहुतांश लोकसंख्या देश स्वतंत्र झाल्यावर ५-१०-३०-४० वर्षांनी इस्रायलमध्ये स्थायिक झाली. त्यामुळे अनेक क्षेत्रांत इस्रायलला कोर्‍या पाटीवर लिहिण्याची संधी मिळाली. शेतजमीन, पाणी आणि खनिजसंपत्तीचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे लोकसंख्येला शिस्त लावणं फारसं अवघड गेलं नाही. याच्या बरोबर उलट परिस्थिती भारतात दिसते. पाच हजार वर्षांहून अधिक इतिहास, वेगवेगळ्या शासकांनी निर्माण केलेल्या शासन पद्धती आणि प्रांतिक विविधतेमुळे स्वातंत्र्यानंतर आपल्याला गिचमिड केलेल्या पाटीवर फारशी खाडाखोड न करता चित्र काढण्याचे आव्हान स्वीकारावे लागले. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मुबलकतेमुळे नागरिकांना शिस्त लावणेही सोपे नाही. इस्रायलच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १५० पट जास्त आहे. त्यामुळे इस्रायली तंत्रज्ञान आणि अनुभव उपयोगात आणण्यासाठी आपल्याला आपल्या व्यवस्था आणि सवयींमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागतील. इस्रायलकडे जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान असले तरी अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी आणि चीनप्रमाणे इस्रायल आपले तंत्रज्ञान पुढे रेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवली गुंतवणूक करू शकत नाही. त्यामुळे इस्रायली तंत्रज्ञानात गुंतवणूक करताना जर ते यशस्वी नाही झाले, तर तो तोटा सहन करण्याची आपली मानसिकता हवी. दुसरीकडे इस्रायलसाठीही भारताची वास्तववादी ओळख निर्माण होणे आवश्यक आहे. सर्वसाधारणतः इस्रायली लोकांकडे संयमाचा अभाव असतो. उद्या होणारी गोष्ट, त्यांना काल व्हायला हवी असते. भारतात कामकरायचे तर संयमआणि चिकाटी हवी. सगळ्या गोष्टींमध्ये ‘हो’ किंवा ‘नाही’ अशा उत्तरांची अपेक्षा करणार्‍या इस्रायलींना भारतीयांचा ‘नरो वा कुंजरो वा’ स्वभाव बुचकळ्यात टाकतो. मोहरीसारख्या छोट्या वाटणार्‍या गोष्टी अनेकदा अडचणींचे मेरू पर्वत उभे करतात. दोन देशांच्या स्वातंत्र्यानंतर सात दशकांच्या प्रतिक्षेनंतर पार पडत असलेला मधुचंद्र ही एका अर्थाने चांगली गोष्ट आहे. आता दोघांचेही पाय जमिनीला लागायला लागले असून गेल्या काही महिन्यांपासून काहीतरी भव्यदिव्य, पण अवास्तव गोष्टींची अपेक्षा करण्याऐवजी एकत्र कामकरताना उद्भवणार्‍या अडचणींवर मार्ग कसा काढायचा, यावर द्विपक्षीय चर्चेचा भर राहिला आहे. मग ते इस्रायलचे केंद्र सरकार आणि भारतातील राज्यांमधील सहकार्य असो; थेट विमानसेवा सुरू करण्यामागच्या अडचणी असोत; हिंदी चित्रपट उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी आवश्यक असलेल्या सवलती असोत किंवा थेट विमानसेवेचे अधिक पर्याय उपलब्ध करणे असो, या समस्यांच्या सोडवणुकीमुळे द्विपक्षीय संबंधांना एक नवीन ऊर्जा प्राप्त होऊ शकेल. द्विपक्षीय संबंधांचा रौप्य महोत्सव धूमधडाक्यात साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेंजामिन नेतान्याहू या दोघांनाही पुढच्या २५ वर्षांतील संधी आणि आव्हानांची जाण आहे. बिग डेटा, रोबोटिक्स आणि ड्रोनचा शेतीसह ग्रामीण आणि शहरी विकासातील वापर, संगणक चलित आणि इंटरनेटने जोडलेले वाहन उद्योग, प्रत्येक गोष्टीत इंटरनेट आणि समाजमाध्यमांनी शिरकाव केल्याने सायबर सुरक्षेची वाढलेली व्याप्ती, ब्लॉक चेनसारख्या तंत्रज्ञानाचा डिजिटल चॅनल ते न्यायव्यवस्थेतील वापर अशा अनेक क्षेत्रांत परस्पर सहकार्याला पर्याय नाही. नेतान्याहू परत गेल्यानंतर एका अर्थाने हा मधुचंद्र संपणार असला तरी भारत आणि इस्रायलमधील संसार सुरळीत आणि गोडीगुलाबीने चालेल, अशी अपेक्षा आहे.
 
 
 
- अनय जोगळेकर

 
@@AUTHORINFO_V1@@