आता सिद्धरामय्याही ‘जय श्रीराम’ म्हणतील !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018   
Total Views |
 
 
 
कर्नाटक राज्यात निवडणुकीचे पडघम वाजण्यास या आधीच प्रारंभ झाला असून तेथील काँग्रेसचे सरकार खाली खेचण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार प्रयत्न चालविले आहेत. तेथील निवडणुका एप्रिल महिन्यात होत आहेत. निवडणुकीची अधिसूचना निघणे बाकी असले तरी आधीपासूनच सुरू झालेली रणधुमाळी पाहता ही निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत. हिमाचल प्रदेशमधील सत्ता गमावून बसलेल्या काँग्रेस पक्षाला कर्नाटकमधील सत्ताही आपल्या हातातून जाईल, अशी भीती वाटू लागली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटक राज्यास दिलेल्या भेटीत तेथील सिद्धरामय्या राजवटीचे वाभाडे काढल्यानंतर तर काँग्रेस पक्ष घायकुतीला आल्याचे दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांनी केवळ जाहीर भाषणांमधूनच नाही, तर ट्विटर हँडलद्वारे, सिद्धरामय्या यांची भाषा कशी दुटप्पी आहे, हे दाखवून देण्यास आरंभ केला आहे. योगी आदित्यनाथ यांचा सडेतोड युक्तिवाद आणि त्यास उत्तर देता देता सिद्धरामय्या यांना करावी लागणारी कसरत पाहता, योगी आदित्यनाथ हे सिद्धरामय्या यांच्या नाकात दमआणणार, अशी चिन्हे दिसत आहेत. सध्या तेथे ‘योगी आदित्यनाथ विरुद्ध सिद्धरामय्या’ असा सामना गाजत आहे.
 
कर्नाटकमधील आपल्या भाषणांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी, टिपू सुलतान जयंतीसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून अल्पसंख्याक समाजास चुचकारण्याचा जो खेळ सिद्धरामय्या खेळत आहेत, त्यावर जोरदार टीका केली होती. स्वत:ला ‘हिंदू’ म्हणविणार्‍या सिद्धरामय्या यांच्या राज्यात हिंदूंच्या हत्या होत आहेत, तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे जातीय विद्वेषास खतपाणी घालत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल टाकून सिद्धरामय्या हे धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ करीत आहेत, असेही योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘‘स्वत:ला ‘हिंदू’ म्हणविता, मग गोमांस खाणार्‍यांचे समर्थन कसे करता?’’ असे प्रश्न विचारून आदित्यनाथ यांनी सिद्धरामय्या यांना जेरीस आणले आहे. कर्नाटक राज्यात योगी आदित्यनाथ यांच्या आतापर्यंत दोन सभा झाल्या आहेत. पण, ट्विटर हँडलद्वारे, कर्नाटकात चालू वित्तीय वर्षात १२०० शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याकडे, दोन- तीन वर्षांमध्ये १२ हिंदूंच्या हत्या झाल्याकडे; तसेच सिद्धरामय्या यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणांकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. योगी आदित्यनाथ आणि सिद्धरामय्या यांच्यात जाहीर प्रचाराबरोबरच ‘ट्विटर‘ युद्ध चालू आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ‘ट्विटर‘ कौशल्याने अनेकांना पराभूत केले असल्याची कौतुकाची थाप पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पाठीवर मारली आहे. ‘‘योगी जी भी कमखिलाडी नहीं है| कई राज्यों में बहुत लोगों के साथ हमारे योगीजी ट्विटर ट्विटर का खेल खेल रहे है और ट्विटर के खेल में भी अच्छे अच्छे खिलाडियों को उन्होने परास्त करके रख दिया है|‘‘ अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी त्यांची प्रशंसा केली आहे. योगी आदित्यनाथ यांचा धसका घेतल्याने, योगी आदित्यनाथ ज्या ज्या वेळी कर्नाटकला भेट देतात, त्या त्या वेळी सिद्धरामय्या यांना हिंदुत्वाची आठवण होते, असे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या दौर्‍यानंतर, ‘‘आपण हिंदू असून आपल्या नावात ‘सिद्ध‘ आणि ‘राम‘ आहे,’’ असे सिद्धरामय्या यांनी म्हटले होते, हे लक्षात घेता योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकला वरचेवर भेट दिल्यास सिद्धरामय्या हे ‘जय श्रीराम‘ असा जप करू लागतील, असे भाजप नेते अरविंद लिंबवली यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष अप्रस्तुत मुद्दे उपस्थित करीत असल्याची टीका सिद्धरामय्या यांनी करताच त्यास योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. कर्नाटकमधील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती भयंकर असल्याकडे योगी आदित्यनाथ यांनी लक्ष वेधले. ‘’आम्ही मतपेढीच्या राजकारणात लडबडत नाही. विकास आणि राष्ट्रवाद हे आमच्यासाठी मुख्य मुद्दे आहेत. कर्नाटकात आम्ही त्याचा पाठपुरावा करूच. गरीब जनता, शेतकरी यांच्या हिताकडे व महिलांचे सक्षमीकरण यावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत,’’ असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या कर्नाटकात अमानुष हत्या होत आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत आणि प्रामाणिक व निष्ठावान कर्मचार्‍यांना अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. तेथे जे कुशासन आहे, त्यास जनता सडेतोड उत्तर देईल, असा विश्वास आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. गोमांस खाणार्‍यांचे समर्थन करीत असल्याची जी टीका आदित्यनाथ यांनी केली, त्यास थातुरमातुर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न सिद्धरामय्या यांनी केला. ‘‘मी गायींची काळजी घेतो, त्यांना चारापाणी घालतो, शेण काढतो. माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार योगी आदित्यनाथ यांना कोणी दिला? त्यांनी आतापर्यंत कधी गायींची काळजी घेतली आहे काय?‘‘ असा प्रश्न करून ते थांबले नाहीत. ते पुढे म्हणतात, ‘‘हिंदू धर्मातील अनेक जण गोमांस खातात. मला हवे असते तर मीही ते खाल्ले असते. पण, मला गोमांस आवडत नसल्याने मी ते खात नाही. असा प्रश्न करणारे ते कोण?‘‘ आदित्यनाथ यांची टीका सिद्धरामय्या यांना खूप झोंबली असल्याचे या सर्व घडामोडींवरून दिसून येते.
 
एकीकडे टिपू सुलतानाची जयंती साजरी करून अल्पसंख्याकांना चुचकारायचे, दुसरीकडे, हिंदू असल्याचा डांगोरा पिटून व मंदिरांना भेटी देऊन हिंदू समाजास भुलवायचे, जातीचे राजकारण करून समाजात फूट पाडायची, असे राजकारण खेळून सत्ता मिळविण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालविला आहे. कर्नाटकमधील निवडणूक प्रचारात या सर्वांचे प्रतिबिंब नाही पडले तरच नवल!
 
सिद्धरामय्या सरकारवर केवळ भाजप टीका करीत आहे, असे नाही. त्या राज्यातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षानेही सिद्धरामय्या यांच्या कारभारावर झगझगीत प्रकाश टाकला आहे. सिद्धरामय्या हे पाच हजार कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यात अडकले असल्याचा आरोप त्या पक्षाने केला आहे. या घोटाळ्याची माहिती देणारी एक पुस्तिकाही काढण्याचा त्या पक्षाचा मानस आहे. या मुद्द्यावर भाजपही सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हे आहेत.
 
कर्नाटक राज्यात सिद्धरामय्या सरकारपुढे भाजपने आव्हान उभे केले आहे. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडीयुरप्पा यांच्यासह राज्यातील भाजप नेते या आधीच कामाला लागले आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह, योगी आदित्यनाथ आदी नेत्यांनी काँग्रेस राजवटीची लक्तरे वेशीवर टांगण्यास या आधीच प्रारंभ केला आहे. पुढील महिन्यात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे प्रचारात उतरत आहेत. काँग्रेसचे हे ‘जनेऊधारी‘ अध्यक्ष कर्नाटक राज्यातील आपली सत्ता टिकविण्यासाठी काय नवी खेळी खेळतात ते लवकरच दिसून येईल. तेथील हिंदू समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न या आधीच चालू झाले आहेत. निवडणूक जवळ आली की, या प्रयत्नांना वेग येईल हे उघडच आहे. काँग्रेसचे कुटील मनसुबे हाणून पाडून तेथील सत्ता मिळविण्याचे आव्हान भाजपपुढे आहे.
 
 
- दत्ता पंचवाघ 
 
@@AUTHORINFO_V1@@