पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका ६ बाद २६९
सेंच्युरियन (दक्षिण आफ्रिका) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यातील आजच्या पहिल्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या ६ बाद २६९ धावा झाल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा फाफ डू प्लेसिस २४ धावांवर तर केशव महाराज १० धावांवर खेळत होते.
दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक प्रमाण वेळेनुसार आज सकाळी १० वाजता दुसऱ्या सामन्यास सुरुवात झाली. यजमान संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने आपल्या डावाची सुरुवात भक्कम सुरुवात केली. सलामीवीर डीन एल्गर याने ३१ धावा केल्या तर एडन मार्क्रम याचे शतक केवळ ६ धावांसाठी हुकले. डीन नंतर आलेल्या हाशिम आमला यानेही मार्क्रमला चांगली साथ देत ८२ धावा केल्या. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडायला सुरुवात झाली.
आमला नंतर आलेल्या एबी डि विलियर्सने केवळ २० धावा केल्या. त्यानंतर यजमान संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिस मैदानात उतरला. मात्र त्याला म्हणावी तशी साथ कोणीच देऊ न शकल्याने धावांची गती मंदावली. क्विंटन डि कॉक व वेर्नोन फायलँडर यांना तर धावसंख्येचा साधा भोपळाही फोडता आला नाही.
भारतीय गोलंदाजांनी आज चमकदार कामगिरी केली. भारताच्या रविचंद्रन अश्विन याने ३१ षटकांत ९० धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले तर इशांत शर्मा याने १६ षटकांत ३२ धावा देत १ बळी घेतला.