भारतातील मुस्लीम हे हिंदू कसे?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
  

 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ’’भारतातील मुसलमान हे हिंदूच आहेत,’’ असं विधान केलं होतं. त्यावर दै. ’मुंबई तरूण भारत’च्या ’वाचकालय’ सदरात एका वाचकाने वरील मथळ्याचे पत्र लिहून विचारले होते की, ’’छागला, कलाम, साबीर शेख यांच्यासारख्या राष्ट्रीय वृत्तीच्या मुसलमानांबद्दल आदर आहे. तसेच आजचे भारतातले मुसलमान हे त्यांचे पूर्वज जबरदस्तीने बाटल्यामुळेच परधर्मात गेलेले आहेत. पण, क्रिकेट सामन्यात पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणारे आजचे मुसलमान हे हिंदूच कसे?’’ इत्यादी...
 
१९७७ सालची गोष्ट आहे. काँग्रेसचा संपूर्ण पराभव करून जनता पार्टी सत्ताधारी झाली होती. या विजयाला आणीबाणीची पार्श्वभूमी होती. १९७५ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निवडणुकीत हेराफेरी केली असल्याचा निकाल दिला. त्यावर इंदिरा गांधींनी राजीनामा देण्याऐवजी आणीबाणी घोषित करून संपूर्ण लोकशाही प्रक्रियाच थांबवली. सर्व विरोधी पक्षीय नेत्यांना तुरूंगात टाकण्यातं आलं. आता आपल्याला कोणीही विरोधक नाही, अशा मानसिकतेतून काँग्रेसवाले मोकाट सुटले. इंदिरापुत्र संजय गांधी यांनी तर कहरच केला. भारताची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी अक्षरक्षः मिळेल तो पुरूष पकडून त्याची नसबंदी करण्यात आली. दिल्लीच्या तुर्कमान गेट परिसारात असलेल्या मुस्लीम वस्तीतही अशीच जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली. याची अत्यंत तीव्र प्रतिक्रिया देशभराच्या मुस्लीम समाजात उमटली. काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला मुस्लीमसमाज काँग्रेसच्या संपूर्ण विरोधात गेला. दिल्लीच्या ऐतिहासिक जामा मशिदीचे इमामसय्यद अब्दुल्ला बुखारी हे या कालखंडात मुस्लिमांच्या काँग्रेस विरोधाचे प्रतीक बनून समोर आले. जनता पार्टी जिंकून सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी इमामबुखारींना उपराष्ट्रपतीपद देऊ केलं होतं. पण, त्यांनी त्याला साभार नकार दिला.
 
परंतु, एकंदरीत त्या कालखंडात ‘काँग्रेस विरोध’ या मुद्द्यावरून मुस्लीम नेते हिंदूंच्या बरेच जवळ आले होते आणि नेहमीच प्रचारकी, विखारी, फुटीर बडबड न करता समजुतदारपणे बोलत होते. अशा त्या कालखंडात इमामबुखारी हे हज यात्रा करून आले. त्यांना तिथे आलेला अनुभव त्यांनीच स्वतः प्रामाणिकपणे सांगितला आणि म्हणून तो सर्वांना माहित झाला.
 
मक्केला गेल्यावर हज यात्रेचे ठराविक विधी पार पाडल्यावर इमामबुखारींनी काबाच्या मुख्य इमामांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्याप्रमाणे भेट होताच काबाच्या मुख्य इमामांनी बुखारींना प्रश्न केला की, ‘‘तुम्ही हिंदू आहात ना?’’ इमामबुखारी आश्चर्याने थक्क झाले. त्यांनी मग आपल्या घराण्याचा सगळा इतिहास त्या मुख्य इमामाला ऐकवला. ‘‘मुघल पातशाह शहाजहान याने इ. स. १६५६ साली दिल्लीत, लाल किल्ल्याच्या समोरच ‘जामा मस्जिद’ नावाची टोलेजंग मशीद बांधली. त्या मशिदीचा इमामम्हणून त्याने उझबेकिस्तानातल्या बुखारा इथून एका विद्वान मौलवीला बोलावलं. याचं कारण शहाजहान म्हणजेच मुघल हे मुळचे उझबेक तुर्क आणि त्या इमामबुखारीचा मी सातवा वंशज आहे. मुघल पातशाही हीच भारतातील सर्वात मोठी आणि प्रबळ मुसलमानी सल्तनत असल्यामुळे एका दृष्टीने मीच भारतातल्या सर्व मुसलमानांचा मुख्य इमामआहे. असं असताना तुम्ही मला हिंदू कसा म्हणता?’’ असा इमामबुखारींच्या म्हणण्याचा एकंदर आशय होतो.
 
काबाच्या त्या मुख्य इमामाने जगभरातले सर्व मुसलमान ज्या मशिदीला सर्वाधिक पवित्र पूज्य मानतात, त्या मक्केतल्या काबा मशिदीच्या मुख्य इमामाने इमामबुखारींचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि म्हटलं, ‘‘इराणहून आलेल्या मुसलमानाला आम्ही ‘इराणी’ म्हणतो. इजिप्तहून आलेल्या मुसलमानांना आम्ही ‘इजिप्शियन’ म्हणतो. तसे तुम्ही हिंदुस्थानहून आलात, म्हणून आम्ही तुम्हाला ‘हिंदू’ म्हटलं. सगळ्याच हिंदुस्थानी लोकांना इथे ‘हिंदू’ म्हटलं जातं.’’
 
म्हणजेच काबाचा मुख्य इमामभारतातल्या मुसलमानांना त्यांचा उपासना संप्रदाय, त्यांची प्रार्थना पद्धती यावरून मोजत नसून त्यांच्या नागरिकत्वावरून मोजतोय. तुम्ही भले किती का पक्के मुसलमान असा ना, तुम्ही हिंदुस्थानचे नागरिक म्हणजे तुम्ही हिंदूच; इतका हा एका परीने साधा-सरळ मामला आहे. मात्र, त्याचा सगळा विचका प्रथम इंग्रजांनी केला आणि नंतर आपणच, म्हणजे उदारमतवादी हिंदूंनीच केलेला आहे.
 
एकेकाळी मॅकेडोनियन ग्रीकांनी कुशाण, शक आणि हूणांनी भारतावर स्वार्‍या करून बर्‍यापैकी यश मिळवलं होतं. शक लोक तर संपूर्ण उत्तर हिंदुस्थान जिंकून नर्मदा ओलांडून गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत आले होते. पण, आज कुठायत ते? प्रथमसमुद्रगुप्त, चंद्रगुप्त, स्कंदगुप्त, यशोधर्मा आदि पराक्रमी राजांनी त्या आक्रमकांचा लष्करी आणि राजकीय पराभव केला आणि मग भारतीय म्हणजेच हिंदू समाजातल्या तत्कालीन ऋषिमुनी, साधुसंत, महंत यांनी त्यांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन हिंदू धर्माचाच भाग बनवलं. म्हणजे, राजकीय आणि लष्करी आक्रमणाला प्रति आक्रमणाने, प्रत्याघाताने उत्तर आणि आक्रमक प्रवृत्तींचा साफ मोड झाल्यावर क्षमाशीलपणे त्यांना आपल्यातच सामावून घेणं, हे तत्कालीन हिंदूंनी केलं. आक्रमकांच्या पराभवानंतर त्यांची समूळ कत्तल उडवीत त्यांच्या मुंडक्यांचे मनोरे रचण्यात आनंद मानण्याची विकृती त्यांनी दाखवली नाही. कारण, आपण हिंदू आहोत, ‘नाठाळाच्या माथा हाणू काठी’ आणि त्याला नरम आणून मगच ‘देऊ कासेची लंगोटी’ ही त्यांची धारणा त्यांच्या मनाशी पक्की होती.
 
आधुनिक काळात भारतीय म्हणजेच हिंदू समाजाचं बौद्धिक नेतृत्व हे ऋषिमुनी, साधुसंत यांच्याकडून इंग्रजी विद्या शिकलेल्या नव्या सुशिक्षितांकडे गेलं. त्यांच्यावर त्याकाळी युरोपात लोकप्रिय असलेल्या भूमिनिष्ठ राष्ट्रवादाचा फार प्रभाव पडला. ब्रिटन हा ब्रिटिशांचा, फ्रान्स हा फ्रेचांचा, जर्मनी हा जर्मनांचा, इटली हा इटालियनांचा, मग भारत हा कोणाचा? या वर इंग्रज राज्यकर्ते म्हणत होते की, ‘‘भारत हा कधी एक राष्ट्र नव्हताच मुळी. तो अनेक राष्ट्रांचा समूह होता.’’ याला उत्तर देताना आधुनिक भारतासाठी पहिली राजकीय संस्था जी काँग्रेस, तिने ‘हिंदी राष्ट्रवादा’चा स्विकार करुन हिंदुत्वाला सोडून दिलं. १८८५ साली झालेल्या काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनातच न्यायमूर्ती रानडे म्हणाले की, ‘‘उद्याच्या हिंदी राष्ट्रात कोणत्याही प्रकारच्या वंश, धर्म वा वर्णभेदाला स्थान राहणार नाही आम्ही सर्व स्वत:ला प्रथम‘हिंदी’ समजतो आणि चिरकाळ असेच समजणार.’’
 
कल्पना छानच होती. काँग्रेस पक्षाने आणि त्यांच्या अनुयायांनी म्हणजेच बहुसंख्य हिंदू समाजाने तिचा सहजपणे स्विकार केला आणि ‘आपण हिंदू आहोत’ ही धारणा सोडून ते ‘हिंदी’ झाले. पण, मुसलमानांनी ‘आपण मुसलमान नसून हिंदी आहोत,’ हे कधीही मान्य केलं नाही. तीनच वर्षात म्हणजे १८८८ साली अलिगड विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद यांनी ‘‘हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्रे आहेत,’’ असे प्रतिपादन केले.
 
असा सगळा इतिहास असूनही ‘भारतातले मुसलमान हे हिंदूच आहेत,’ असं फक्त सरसंघचालकच नव्हे, तर सगळेच संघ प्रचारक, स्वयंसेवक वेळोवेळी म्हणत असतात आणि म्हणत राहतील. याचं मुख्य कारण म्हणजे, मुळात, हिंदी किंवा निधर्मी किंवा सेक्युलर बनलेल्या बहुसंख्य हिंदूंना आपण हिंदू आहोत, हा आपला हिंदूंचा देश आहे, त्यांचं भवितव्य आपणा हिंदूंच्या हातात आहे, अन्य कुणाच्या नव्हे हे भान यावं. इंग्रजी विद्येमुळे आजचा हिंदू भले आधुनिक झालाय, पण त्याच विद्येमुळे त्याच्या डोक्यात निधर्मी उदारमतवादाचा बराच गोंधळ झालाय. ‘आपण हिंदू आहोत, हा आपला देश आहे आणि आपण हिंदू आहोत,’ असं म्हटल्यामुळे आपल्या आधुनिकपणाला, उदारमतवादाला कोणतीही बाधा येत नाही, ही त्याची धारणा पक्की व्हायला हवी आहे.
 
उजेड ज्या प्रमाणात वाढतो, त्या प्रमाणात अंधार आपोआपच कमी होतो. तशी हिंदू समाजाची आपल्या स्वत्वाबद्दलची धारणा जसजशी पक्की होईल, तसे स्वत:ला ‘अ-हिंदू’ समजणारे समाज आपसूक स्वत:ची धारणा बदलू लागतील. जे बदलाला नकार देतील त्यांचं काय करायचं, ते तो पक्क्या धारणेचा समाजच ठरवेल. परंतु, तोपर्यंत हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच आहेत, हे पुन:पुन्हा सांगितलंच पाहिजे.
 
 
 
- मल्हार कृष्ण गोखले
 
 
@@AUTHORINFO_V1@@