प्रसंग विश्लेषण – एक सत्र आणि सवय

Total Views |

 


विद्यार्थी दशेत असतात परीक्षा संपल्या कि हमखास विविध प्रकारची शिबिरे योजली जात असत. व्यक्तिमत्व विकास, छंदवर्ग, श्रमानुभव शिबीर असे विविध प्रकार! थोडा अधिक फरक असे कार्यक्रमांमध्ये, पण खूप ओळखी होत, विविध विषयांवर वेगवेगळे विचार ऐकायला मिळत आणि वादविवादही रंगत.

अशाच एका शिबिरामध्ये मी ‘प्रसंगविश्लेषण’ नावाचं सत्र ऐकलं होतं. ते दीर्घकालपर्यंत माझ्या लक्षात राहिलं इतकं मनाला भावलं होतं. या सत्रात सूत्रसंचालक एक काल्पनिक प्रसंग सांगतो आणि त्याच्यावर प्रत्येकाने आपला विचार सांगायचा असतो. सरांनी ते सत्र चालवलं होतं. त्यांनी घेतलेला प्रसंग होता – चार मित्र, अ, ब, क, ड शिक्षणासाठी शहरात आले आहेत. एका रूमवर एकत्र राहात आहेत. त्यातला अ च्या घरची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. ब आर्थिकदृष्ट्या चांगल्या घरातला आहे. क आणि ड मध्यम परिस्थिती मधले आहेत. एके दिवशी सकाळी ब च्या लक्षात येतं कि आपलं घड्याळ सापडत नाहीये. तसं तो मित्रांना बोलून दाखवतो – इथे सरांनी प्रसंग संपवला आणि विविध -शक्यता आम्हाला विचारल्या. आमच्या कडून आलेल्या विविध शक्यता अशा होत्या ( मधे मधे सर प्रश्न विचारून आमच्या कडून उत्तरे काढून घेत होते.)

अ ची आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्यामुळे त्याने आपली फी भरण्यासाठी ब चे घड्याळ घेतलेले असू शकते. 

गरीब मुलेच नेहमी असं काही करतात हा समज बरोबर नाही. क किंवा ड सुद्धा आपली अन्य काही गरज किंवा व्यसन वगैरे साठी असे करू शकतात.

ब खरं कशावरून बोलत असेल? त्यानेच घरच्यांपासून आपले अन्य छान-छौकीचे खर्च लपवलेले असतील आणि ते भागवण्यासाठी आपलेच घड्याळ विकले असेल.

सर – तुम्ही घड्याळ चोरीला गेलय ही एकच शक्यता विचारात घेताय!
सरांनी असं म्हणल्यावर आम्ही वेगळ्या शक्यतांचा विचार करू लागलो –

ब कडून घड्याळ हरवलं असेल आणि ते घरच्यांपासून लपवायला तो ते हरवलं असं सांगत असेल.

ब कुठेतरी ते घड्याळ काढून ठेऊन विसरला असेल.

घड्याळ घरातच कुठेतरी नजरेआड झालेलं असू शकेल. नीट शोधलं तर सापडेल.

नंतर कितीतरी वेळ विश्लेषण सुरु राहिले. सत्राची वेळ संपली पण एखाद्या घटनेचा सर्व बाजूंनी विचार कसा करावा? याची आयुष्यभराची शिकवण ते सत्र देऊन गेलं.

 

माझ्या मैत्रिणीने जेंव्हा मुलांच्या एका शिबिरात मला एक सत्र घ्यायला सांगितलं तेंव्हा मी ‘प्रसंग विश्लेषण’ घेण्याचे नक्की केलं. प्रसंग कोणता घ्यावा या विषयी सुनेशी चर्चा करायची ठरवली. तिला घड्याळाच्या प्रसंग विश्लेषणाबद्दल माहिती मी दिलेली होती. शालेय विद्यार्थांचे शिबीर होते त्यामुळे सोपा पण संस्कारक्षम प्रसंग निवडावा असे आमचे दोघींचे मत पडले. प्रसंग घेतला तो असा – आपला एक वर्ग मित्र वाईट मुलांच्या संगतीला लागला असावा असा तुम्हाला संशय आहे. तुम्ही एक दोन वेळा त्याला पानपट्टीच्या दुकानाजवळ आणि शाळेजवळच्या सिनेमागृहाबाहेर पाहिले आहे. तुम्ही त्याला, शाळेत एखाद्या तासाला तो गैरहजर असण्याबद्दल विचारले तर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत आणि आता तो वर्गात खूप गप्प गप्प असतो. मुलांनी असे वेगवेगळे मुद्दे मांडले –

तो खरच वाईट संगतीला लागला असेल तर तसे वर्गशिक्षकांना सांगितले पाहिजे. म्हणजे ते त्याच्या आईवडिलांशी बोलतील.

एकदम आईवडिलांपाशी विषय गेला तर त्याला कदाचित कडक शिक्षा करतील घरचे. त्यापेक्षा मी आधी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करेन.

आधी तो कोणत्या मुलांच्या संगतीला लागला आहे ते शोधून काढेन. त्याच्या गैरहजेरीचे खरे कारण तेच आहे का? याची खात्री केल्याशिवाय तो वाईट संगतीला लागला आहे असे ठरवणे योग्य नाही.

तो वर्गात गप्प गप्प असतो त्यामुळे कदाचित त्याला त्यांची सांगत सोडायची असेल पण ती मुले त्याला धमकावत असतील. म्हणून त्याच्याशी, त्याला विश्वासात घेऊन बोलले पाहिजे.

तो घरात नसताना त्याच्या आईवडिलांशी बोलेन. ते नक्की काहीतरी मार्ग काढतील.

माझ्या एका मित्राचे वडील पोलिसात आहेत त्यांची मदत घेईन.

तो नेमका किती दिवस त्या मुलांबरोबर आहे हे माहिती करून घेतले पाहिजे. काही छोट्या मोठ्या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असू शकतो. असे असेल तर पोलिसांना कळवल्यास त्याला रिमांड होम मधे पाठवू शकतात.

आणखीही बर्याच शक्यता मुलांच्या चर्चेमध्ये आल्या. मुलांच्या वयाच्या मानाने आणि त्यांच्या अनुभवाच्या मानाने खूपच परिपक्व आणि सर्वांगीण विचार मुलांनी मांडले.


मला असं वाटत कि सत्राची खरी यशस्विता, सत्रा नंतर मुले आपापसात त्याच विषयावर बोलत रेंगाळतात का?, याच्यावर असते. ह्या सत्रानंतर सुद्धा मुले बराच वेळ एकमेकांशी बोलत थांबली होती.

सत्र संपवून शाळेबाहेर पडले तर गेट पाशी एक मुलगा थोडासा भेदरलेला, मन खाली घालून उभा होता. 

“ काही बोलायचे आहे का? “

“ madam, खरच पोलीस रिमांड होम मध्ये पाठवतात अशा मुलांना?”

“अरे नुसत्या संशयावरून नाही पाठवत. त्यांनी काही गुन्हा केला असेल तर पाठवतात. तू का विचारतो आहेस पण? “

“आता माझे मित्र माझ्या घरी सांगतील का?”

योगायोगाने, मी चर्चेसाठी घेतलेली घटना वास्तवातील होती याची मला कल्पना आली.

मुलांनी मांडलेल्या विविध शक्यता आपल्या बाबतीत घडू शकतात याची जाणीव झाल्यामुळे तो मुलगा अस्वस्थ झाला होता.

नंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कानावर मी झाला प्रकार घातला त्यांनी वर्गशिक्षकांच्या मदतीने लक्ष घालण्याचे ठरवल्याचे माझ्या लक्षात आले.
एखाद्या घटनेचा, प्रसंगाचा, समस्येचा किती विविध बाजूंनी विचार करता येतो याचे प्रशिक्षणच या प्रकारच्या सत्रातून मिळते. जीवनात प्रत्यक्ष जेंव्हा अशा परिस्थितीशी सामना करण्याची वेळ येते तेंव्हा याची उपयुक्तता लक्षात येते.

अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बहुपर्यायी प्रश्न असतात.वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून पाहिले तरी त्यातील एकही पर्याय योग्य येत नाही तेंव्हा एखादा विद्यार्थी, आपली पद्धत चुकीची असावी असा विचार करेल पण ज्याला सर्व बाजूंनी विचार करण्याची सवय असेल तो आत्मविश्वासाने हे सांगू शकेल कि एकतर योग्य पर्याय दिलेला नाही किंवा प्रश्नच चुकीचा आहे.

जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या समस्या, घ्यावे लागणारे छोटे मोठे निर्णय, बर्या - वाईट घटनांचे होणारे परिणाम ह्या सर्वांना सामोरे जाताना, ह्या ‘प्रसंग –विश्लेषणाने’ मला खूपच मदत केली आहे. एकच करायचं, प्रसंग बदलायचा आणि सत्र घ्यायचं, आपणच आपलं!

विचित्र वाटतंय? एकदा करून तर पहा!

 

- शुभांगी पुरोहित

 

 

 

 

 

शुभांगी पुरोहित

M. Sc. B. Ed., शाळेसाठी पथनाट्य लेखन, कविता स्पर्धांमध्ये सहभाग. ललित लेखन. माणसांच्या भावभावनांशी निगडित विषय लिहायला आवडतात. रत्नागिरीत आयोजित ' राम का गुणगान करिये ' ह्या रामाबद्दलच्या विविध गीतांवर आधारित २ तासांच्या कार्यक्रमाच्या संपूर्ण निवेदनाचे लेखन आणि सादरीकरण केलेले आहे.