बंगाली-जनजातीय संघर्षाच्या उंबरठ्यावर त्रिपुरा?

    27-Sep-2017   
Total Views |
 

 
 
त्रिपुरात पत्रकार शांतनू भौमिकची हत्या होण्याच्या काही दिवस आधीच कर्नाटकात पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाली होती. लंकेश यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी त्रिपुरात डाव्यांनी निषेध मोर्चाही काढला होता. त्यापेक्षाही भव्य मोर्चा भौमिकच्या हत्येनंतर काढण्यात आला होता. फरक एवढाच की, पहिल्या मोर्चात मुख्यमंत्री माणिक सरकार सामील झाले होते. मात्र, दुसर्‍या मोर्चाकडे त्यांनी सपशेल पाठ फिरवली होती. शांतनूच्या हत्येनंतर बंगाली आणि जनजातीयांमध्येही तेढ वाढविण्याचे प्रयत्न पद्धतशीपणे सुरू झाले आहेत.
 
 
’दिन-रात’ या स्थानिक चॅनलचा पत्रकार असलेल्या शांतनूची हत्या वाटते तितकी सरळ नाही. घटस्थापनेच्या एक दिवस आधी ही हत्या झाली. कोलकात्याप्रमाणे त्रिपुरातही दुर्गापूजेचा सोहळा मोठा असतो. त्यामुळे विजयादशमीच्या आधी हाणामार्‍या सुरू होणार नाहीत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. डाव्यांना रक्तपाताचे वावडे नाही आणि त्रिपुराचे राजकारण सध्या दारूच्या कोठारावर विराजमान आहे. भडका उडायला इथे एक ठिणगीही पुरेशी असते. त्यामुळे त्यांचे परंपरागत विरोधकही तयारीतच आहेत.
 
 
त्रिपुरात जनजातीय क्षेत्रात बर्‍यापैकी आधार असलेल्या ‘आयपीएफटी’ आणि डाव्या पक्षांत उभा दावा आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष तापला आहे. त्रिपुरात जनजातीयांसाठी राखीव असलेल्या २० जागांवर डाव्यांचा कब्जा आहे. राज्यातल्या एकूण जागांच्या तुलनेत ही संख्या एक तृतीयांश आहे. त्रिपुरात सत्ता स्थापन करणारा कोणताही पक्ष या जागांचे महत्त्व नजरेआड करू शकत नाही. या जागांवर आगामी निवडणुकांमध्ये ‘आयपीएफटी’ आणि भाजपमध्ये आघाडी किंवा ‘समझौता’ झाला, तर मुळातच डळमळीत झालेल्या डाव्यांच्या सत्तेला सुरुंग लागण्याची शक्यता आहे. एकमेकांच्या राजकीय कार्यक्रमात हिंसाचार आणि दगडफेक ही तशी तिथली रोजचीच बाब. या संघर्षातच शांतनू भौमिकचा बळी गेला. ही हत्या होण्याआधी मंडईत माकपाची रॅली निघाली होती. त्या रॅलीवर दगडफेक झाली. ही दगडफेक ‘आयपीएफटी’च्या कार्यकर्त्यांनी केली, असा आरोप डाव्यांनी केला होता. दुसर्‍या दिवशी आयपीएफटीची रॅली निघाली. त्या रॅलीचा बंदोबस्त करण्यासाठी माकपाचे टोळके पोहोचले. वचपा काढण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट होता. याची पुरेपूर कल्पना असल्याने पोलीसही तयारीत होते. ‘आयपीएफटी’चे लोकही तयारीत होते. मंडई बाजार येथे दोन्ही गटात राडा झाला. या राड्यात शांतनूचा बळी गेला. घटनास्थळी हजर असलेल्या पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. शांतनू हा डाव्या पक्षाचा कडवा कार्यकर्ता होता. तो ‘आयपीएफटी’च्या रॅलीत पत्रकाराच्या भूमिकेतून आला होता की कार्यकर्त्याच्या भूमिकेतून, हा तपासाचा विषय आहे. या हत्याला अनेक पदर आहे. त्रिपुराचे राजकारण बंगाली आणि जनजातीयांमध्ये विभागलेले आहे. पूर्व पाकिस्तानात होणार्‍या अत्याचारांमुळे पलायन करणार्‍या लाखो हिंदूंनी त्रिपुराचा आश्रय घेतला. त्यामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडला, अशी जनजातीय बांधवांची भावना आहे. बंगाली आणि जनजातीय बांधवांमध्ये १९८० साली मोठी दंगल झाली होती. त्यानंतर दोन्ही समाज एकत्र नांदले. संस्कृतीचा धागा समान असल्यामुळे जनजातीय बांधव दुर्गापूजेतही सामील होतात. शांतनूची हत्या नेमकी दुर्गा पूजा सुरू होण्याआधी करण्यात आली. त्यामागे बंगाली आणि जनजातीयांमध्ये संपुष्टात आलेली तेढ पुन्हा पेटविण्याचा प्रयत्न असावा, अशी दाट शक्यता आहे.
 
 
पत्रकार शांतनू भौमिकच्या हत्येचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे. शांतनू बंगाली भाषिक होता. ही हत्या जनजातीयांनी केली, असा प्रचार डाव्यांनी बांगला भाषिक वस्त्यांमध्ये सुरू केला आहे. दुसर्‍या बाजूला जनजातीय भागात शांतनूच्या हत्येचे भांडवल करून ‘आयपीएफटी’ला चेपण्याचा माणिक सरकारचा प्रयत्न आहे. त्रिपुरामध्ये कायदा- सुव्यवस्थेचा किती बोजवारा उडाला आहे, हे शांतनूच्या हत्येमुळे पुन्हा एकदा उघड झाले. हत्या दिवसाढवळ्या झाली आणि ती कोणी केली, हे लपून राहिलेले नाही. परंतु, तरीही या प्रकरणात भाजपला खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘आयपीएफटी’ आणि भाजपचा संबंध जोडून पुड्या सोडण्याचा कार्यक्रममाकपच्या कार्यकर्त्यांनी सुरू केला आहे.
 
 
शांतनूच्या हत्येनंतर जनजातीय बांधव बंगाल्यांच्या दुर्गापूजेत सामील होऊ नयेत असा प्रयत्न सुरू आहे. राजकीय लाभासाठी हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्रिपुराच्या राजकारणाची सूत्रे आज बंगाल्यांच्या हाती आहेत. माकपाने त्रिपुराच्या राजकारणाची सुरुवात जनजातीय क्षेत्रांतूनच केली, परंतु जनजातीय क्षेत्रात डाव्यांची पकड असली तरी आज त्यांना सर्वात मोठे आव्हान ‘आयपीएफटी’चे आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बंगाली आणि जनजातीय मतांमध्ये ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरुण वयात एखाद्या पत्रकाराची हत्या होणं ही अत्यंत दु:खद घटना आहे. माणिक सरकारच्या कारकिर्दीत त्रिपुरात हजारो हत्या झाल्या. यात राजकारण्यांबरोबरच पत्रकारांची संख्याही खूप मोठी आहे. शांतनू हा ऐन विशीतला पत्रकार, पण माणिक सरकारच्या कारकिर्दीतील अराजकाने त्याचा बळी घेतला. गौरी लंकेशच्या हत्येचा निषेध करणारे माणिक सरकार डाव्या पक्षाचा कार्यकर्ता असलेल्या शांतनूच्या हत्येनंतर काढलेल्या मोर्चातून गायब होते, ही घटना बोलकी आहे. लंकेश यांच्या हत्येचे राजकारण करून भाजपला झोडण्याचा प्रयत्न इतक्या कमी काळात बुमरँग होईल याची त्यांनाही कल्पना नसावी. त्रिपुरातील डाव्यांच्या सत्तेबद्दल विरोधकांमध्येच नाही, तर डाव्यांमध्येही प्रचंड असंतोष आहे. शांतनूच्या हत्येमुळे ही खदखद वाढते आहे. त्याच्या दुर्दैवी हत्येचे खापर दुसर्‍याच्या डोक्यावर फोडून राजकारण करण्याचा डाव डाव्यांच्या अंगलट येण्याची शक्यता त्यामुळेच जास्त आहे.
 
 
- दिनेश कानजी

दिनेश कानजी

गेली १७ वर्षे पत्रकारितेचा व्यापक अनुभव, महाराष्ट्र भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘मनोगत’मधून कारकिर्दीची सुरुवात. त्यानंतर दै. ‘सामना’, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, दै. ‘पुढारी’मध्ये कामाचा दांडगा अनुभव. नोकरीचा राजीनामा देऊन सध्या स्वतंत्रपणे लिखाण. पत्रकारिता करताना सिनेमा, महापालिका, गुन्हेगारी, राजकारण अशा विविध बीटचे काम. ‘शोध पत्रकारिता’ हा त्यांचा पिंड. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार’ या पुस्तकातून त्रिपुरातील कम्युनिस्ट सरकारच्या कारभाराची पोलखोल.