रोहिंग्या मुस्लिमांना भारतात आश्रय देण्याच्या विषयावरून सध्या देशभरात खूप गदारोळ सुरु आहे. खूप मोठ्या प्रमाणावर वादविवाद सुरु आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या विषयाकडे पाहात आहे. अचानकच अनेकांना आपल्या उच्च आध्यात्मिक मूल्यांचे स्मरण झाले आहे. इतर वेळेला काँग्रेसचे कार्यकर्ते केरळमध्ये हिंदूंना पूज्य असलेली गाय कापत फिरत असतात पण आता मात्र त्यांनाच अतिथी देवो भव या प्राचीन हिंदू संस्काराची आठवण झाली आहे. ज्यांना गेल्या दोन दशकांत काश्मिरी पंडितांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याची तसदीही घ्यावीशी वाटली नाही ते असदुद्दीन ओवेसी 'रोहिंग्यांकडे मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे त्यांच्याकडे मुस्लिम म्हणून पाहता कामा नये' असे सांगत आहेत. 'निर्दोष महिला आणि मुलांचा याच्याशी काय संबंध, सर्वजण अतिरेकी नसतात' असे मणिशंकर अय्यर यांना वाटते मात्र काश्मीरमध्ये रोहिंग्यांची संख्या आणखी वाढल्यास तिथूनच सर्वाधिक अतिरेकी तयार होतील याची चिंता नसते. एकूणच रोहिंग्या मुस्लिम या विषयाला काँग्रेस आणि तमाम पुरोगामी मंडळींनी नेहमीप्रमाणे हिंदूविरोधाचा आणखी एक मुद्दा बनवला आहे. थोडक्यात या सर्वच जणांनी रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश द्यावा अशी भूमिका मांडली आहे.
रोहिंग्या मुस्लिम समस्येचा खरा इतिहास व वास्तव –
रोहिंग्या मुस्लिम हे मूळचे कुठले यावरच मुळात बरीच मतमतांतरे आहेत. खुद्द रोहिंग्या मुस्लिमांचे म्हणणे आहे की ते मूळचे म्यानमारमधीलच आराकान पर्वतातील म्हणजे आताच्या राखाईन प्रांतातले आहेत. मधल्या मुस्लिम आक्रमणाच्या काळात त्यांना आपली उपासना पद्धती बळजबरीने बदलायला भाग पाडले गेले आणि ते मुस्लिम झाले इतकेच. मात्र वांशिक दृष्ट्या ते म्यानमारमधीलच असल्याचा त्यांचा दावा आहे. तर दुसरीकरडे म्यानमार सरकार आणि बहुसंख्य बौद्ध नागरिकांचे म्हणणे आहे की रोहिंग्या मुस्लिम हे म्यानमारमधील नाहीतच. इंग्रजांच्या शासनकाळात ते बांग्लादेशातून आले आणि येथेच वसले अशी त्यांची मान्यता आहे. त्यामुळे म्यानमारमधील ज्या १३५ वंशांना नागरिकत्व देण्यात आले त्यात रोहिंग्या मुस्लिमांचा समावेश नाही. त्याचा परिणाम म्हणून रोहिंग्या मुस्लिमांना आपल्याला कायमच दुय्यम वागणूक दिली जात असल्याचे वाटत आले आहे. साहजिकच त्यामुळे तेथील मुस्लिमांच्याही मनात स्थानिक बौद्धांविषयी आकस निर्माण झाला आणि त्याची परिणती त्यांच्या वर्तनात झाली.
म्यानमारला १९४८ साली स्वातंत्र्य मिळाले. मात्र त्यानंतर लगेचच १९६२ पासून तेथे लष्करी राजवट सुरु झाली. ही राजवट आताआतापर्यंत म्हणजे १९९० पर्यंत लष्करी हुकुमशाही होती. मात्र त्यानंतर तेथे लोकशाही अस्तित्वात आली पण ती ही लष्कराच्या आधीन राहिली. २०११ नंतर खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वात आली. तसे पाहायला गेले तर या संपूर्ण कालखंडात बहुसंख्य बौद्ध समाजाचेच नेतृत्व म्यानमारमध्ये होते. लष्करी राजवट असूनही या काळात हिंसक घटना घडत नव्हत्या. रोहिंग्या मुस्लिम समुदायही या काळात शांत होता. अर्थात अन्य देशांप्रमाणेच आपले विस्तारवादी धोरण त्यांचे या काळातही चालूच होते. फक्त ते छुप्या स्वरुपात होते. म्यानमारमध्ये लोकशाही आल्यानंतर मात्र रोहिंग्यांचे विस्तारवादी धोरण बळावले आणि उघडपणे इस्लाम प्रसाराचे काम सुरु झाले. दहशतवादी संघटनांशी संधान साधून देशात घातपात घडवून आणणे, लव जिहाद व अन्य मार्गांनी धर्मपरिवर्तन करणे, लोकसंख्येच्या बळावर स्थानिकांच्या धार्मिक श्रद्धांची पायमल्ली करणे असे अनेक प्रकार सुरु झाले. त्याला स्वाभाविकच स्थानिक बौद्धांनी विरोध केला. मुळात बौद्ध समाज हा शांतताप्रिय म्हणून ओळखला जातो. मात्र असे असतानाही आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागले. मात्र अखेर या संघर्षाला हिंसेचे गालबोट लागले. कधी नव्हे ते बौद्धांना हातात शस्त्र धारण करावे लागले. दरम्यानच्या काळात रोहिंग्या मुस्लिमांनाही पुरेशी रसद शेजारी मुस्लिम राष्ट्रांकडून मिळाली होती. रोहिंग्यांपैकी काहींनी अतिरेकी कारवायांना सुरुवात केली होती. या कारवायांमध्ये काही बौद्ध भिख्खूंचाही जीव गेला आणि तेथूनच खरी आग भडकायला सुरुवात झाली. त्यातच काही महिन्यांपूर्वी राखाईन प्रांतातील म्यानमारच्या लष्करातील १२ जवांनांना रोहिंग्या अतिरेक्यांनी मारल्यामुळे या आगीत तेल ओतले गेले. या घटनेनंतर म्यानमारमधील बौद्धांचा उरला सुरला संयमही सुटला आणि सुरु झाला प्रचंड नरसंहार.
शेजारी देशांपुढे रोहिंग्यांना आश्रय देण्याचे धर्मसंकट -
शांततावादी बौद्ध इतके ऊग्र होऊ शकतील याची सुतराम कल्पना नसलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना अखेर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. म्यानमारपुरता प्रश्न सुटला पण जगातील अन्य राष्ट्रांपुढे वेगळाच प्रश्न उभा राहिला. कारण हे रोहिंग्या मुस्लिम मग शेजारी देशांमध्ये म्हणजे बांग्लादेश, इंडोनेशिया, भारत, श्रीलंका यांच्या तीरावर आश्रयाची याचना करण्यासाठी गेले. संयुक्त राष्ट्रांच्या संकेतांप्रमाणे निर्वासितांना आश्रय देणे बंधनकारक असते मात्र असा आश्रय दिल्यामुळे लोकसंख्येचा समतोल बिघडू शकतो याची कल्पना सर्वच देशांना होती. म्हणूनच स्वतःला इस्लामी राष्ट्र म्हणवून घेणाऱ्यांनीही या रोहिंग्यांना आश्रय दिला नाही. अगदी सख्खा शेजारी असणाऱ्या बांग्लादेशनेही एका ठराविक संख्येपलिकडे त्यांना आश्रय दिला नाही. भारतात मात्र त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. जणू काही आपले भाऊबंद खूप मोठी लढाई जिंकून परत आले आहेत अशा थाटात त्यांना राहण्यासाठी जागा दिली गेली. त्यांची पुरेशी चौकशीही झाली नाही. इतकेच नव्हे तर ही मंडळी देशांतर्गत प्रवास करुन जम्मू पर्यंत पोहोचली तरी देखील आपल्या प्रशासनाला जाग आली नाही. आणि आता त्यांची संख्या हळूहळू वाढल्यानंतर मग सरकारला जाग आली आहे. त्यामुळेच सरकारने त्यांना बाहेर काढण्याविषयी ठोस पावले उचलायला सुरुवात केली आहेत.
सरकारच्या या घोषणेनंतर इतके दिवस शांत बसलेल्या कथित पुरोगामी मंडळींनी लगेच आक्रोश करायला सुरुवात केली. विविध माध्यमांमधून त्यांच्याविषयी सहानुभूतीपर लेख लिहून येऊ लागले. स्वतःला धर्मनिरपेक्षतावादी म्हणवून घेणारे सगळेच पक्ष मग या आखाड्यात उतरले आणि रोहिंग्यांना भारतात ठेऊन घेणे हाच कसा भारताचा शेजार’धर्म’ आहे हे सांगायला लागले. रोहिंग्यांनी दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतला आहे हे देखील ते विसरले. आज रोहिंग्यांना भारतात आश्रय दिला तर उद्या ते भारत ही आमचीच भूमी आहे असा दावा करून वेगळा देश मागतील याचेही भान त्यांना राहिले नाही. त्यातच भर म्हणून मुस्लिम संघटनांनी देखील याला पाठिंबा दिला आणि रोहिंग्या आपले भाऊबंद आहेत असा नारा दिला. हे कमी होते म्हणूनच की काय दलाई लामांसारख्यांनीही भारताने रोहिंग्यांना आश्रय दिला पाहिजे असा सल्ला दिला. एकंदरीतच भारताला मानवतावाद शिकवायला सर्वच जण पुढे सरसावले. आणि भारतातीलही हिंदुत्त्ववादी संघटना रोहिंग्यांना विरोध करू लागल्या. रोहिंग्या भारतात येण्याने हिंदुत्त्व धोक्यात येईल या भितीने त्यांनीही विरोध करायला सुरुवात केली. परंतु या सर्व गदारोळात भारतातील एका घटकाकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. त्यांची या संदर्भात नेमकी भूमिका काय हे कोणीच विचारले नाही. तो घटक म्हणजे भारतीय बौद्ध.
रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय दिल्यामुळे भारतीय बौद्ध असुरक्षित ?
रोहिंग्या मुस्लिमांचे मूळ भांडण हे म्यानमारमधील बौद्धांशी आहे. रोहिंग्यांनी बौद्ध भिख्खूंना मारले आहे, हिंदू समाजातील अन्य संप्रदायातील संतांना नाही. त्यामुळे रोहिंग्या भारतात आले तर त्याचा सर्वाधिक धोका हा येथील बौद्ध समाजाला होणार आहे. भारत ही तर भगवान गौतम बुद्धाची भूमी आहे. जगभरात बुद्धाचे तत्त्वज्ञान भारतातूनच गेले आहे. म्यानमारमध्ये बौद्ध संप्रदाय बहुसंख्येने असला तरीही त्यांची सर्व श्रद्धास्थाने भारतातच आहेत. केवळ म्यानमारच नाही तर जगभरातील सर्वच बौद्धांसाठी भारत ही पुण्यभू आहे. त्यामुळे रोहिंग्या मुस्लिमांना भारतात आश्रय देणे हे एतद्देशीय बौद्ध समाजाला धोक्यात घालण्यासारखे तर आहेच आहे पण जगभरातून भारतात येणाऱ्या अन्य बौद्धांनाही त्यामुळे धोका उत्पन्न होणार आहे. कारण सुरुवातीचे काही दिवस भारताचा पाहुणचार घेतल्यानंतर आपला मूळ बौद्धविरोधाचा सूर रोहिंग्या येथेही आळवणार यात शंका नाही. त्यात त्यांना स्थानिक अतिरेकी संघटना व कट्टर राजकीय पक्ष सर्वतोपरी सहाय्य करणार हे सांगायलाही कोणा ज्योतिषाची गरज नाही.
बौद्ध – मुस्लिम संघर्षाचा इतिहास –
वास्तविक मुस्लिम आणि बौद्ध यांच्यातील संघर्ष हा आजचा नाही. यापूर्वीही अनेकवेळा हे दोन्ही समाज एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. अफगाणिस्तानातील बामियान येथील बुद्ध मूर्ती फोडणे असो, किंवा श्रीलंकेतील स्थानिक बौद्धांसोबत झालेला संघर्ष असो, किंवा अगदी आत्ता आत्ता आलिकडे झालेला म्यानमारमधील संघर्ष असो मुस्लिम समाजाने कायमच शांतताप्रिय बौद्ध समाजाची खोड काढल्याचे दिसते. भारतातही अनेक वेळा हा संघर्ष विविध कालखंडात पाहायला मिळाला आहे. मात्र भारतात मुस्लिम समुदायाचे प्राथमिक लक्ष्य अन्य हिंदू संप्रदाय असल्यामुळे त्या तुलनेत बौद्धांवर आक्रमण कमी प्रमाणात झाले. मात्र या संघर्षाला रक्तरंजित इतिहास नक्कीच आहे. खरंतर जगभरात मुस्लिम समाजाचे सर्व मुस्लिमेतर समाजांशी रक्तरंजित संघर्ष झाल्याचे इतिहास सांगतो. मग ते ख्रिस्ती आसोत, यहुदी असोत, पारशी असोत, आफ्रिकेतील निसर्गोपासक धर्म असोत, बौद्ध असोत किंवा हिंदू धर्मातील अन्यान्य संप्रदाय असोत सर्वांशीच मुस्लिमांचे कोणत्या ना कोणत्या कारणाने वैर आहे. इतकेच नव्हे तर मुस्लिमांमध्ये धर्मांतर्गतही पोटजातींमध्ये रंक्तरंजित संघर्ष चालत आलेला आहे याचे सर्व जगच साक्षीदार आहे. त्याच पद्धतीने म्यानमारमधील समस्येकडे पाहिल्यास असे लक्षात येईल की हा संघर्ष मुस्लिम आणि बौद्ध यांच्यातील आहे. त्यामुळे भारतातही त्याच दृष्टीने त्याकडे पाहायला हवे. त्यामुळे भारतात रोहिंग्या मुस्लिम वसतीस आल्यास त्यापासून सर्वात मोठा धोका हा भारतीय बौद्धांना आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
भारतीय बौद्ध संघटनांची नेमकी भूमिका काय ?
दुर्दैवाने या सर्व चर्चेत भारतातील बौद्धांचे कोणीच ऐकून घेताना दिसत नाही. भारतातील बौद्ध संस्था व संघटना यांना याबाबत काय म्हणायचे आहे याचा कोणीच विचार केला नाही. त्यांची यासंदर्भात नेमकी भूमिका काय हे विचारण्याचीही तसदी कोणी घेतली नाही. दुसरीकडे भारतीय बौद्ध संघटनांनीही आपली भूमिका पुढे येऊन स्पष्ट केली नाही. म्यानमारमध्ये आपल्याच बांधवांना मारणारे रोहिंग्या मुस्लिम भारतात आले तर चालतील अथवा नाही याविषयी बौद्ध संघटनांनीही मौन बाळगले आहे. त्यामुळे याविषयी अधिक संभ्रम निर्माण झाला आहे. खरंतर रोहिंग्या मुस्लिम भारतात येण्याला भारतीय बौद्धांनी कडाडून विरोध करायला हवा होता. रस्त्यावर उतरून आंदोलन करून म्यानमारमधील बौद्ध बांधवांना आपला पाठिंबा दर्शवायला हवा होता. मात्र तसे काहीच घडले नाही त्यामुळे माध्यमांमधील स्वयंघोषित न्यायाधीश स्वतःच आपल्याला हवी ती भूमिका घेऊ लागले आहेत. बर स्वतःला बौद्धांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या राजकीय पक्षांनीही या प्रश्नावर मूग गिळून गप्प बसणेच पसंत केले आहे.
भारतीय बौद्धांची सुरक्षा हवी का परकीय मुस्लिमांची मते?
एकदा भारतात रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय मिळाला की काही आठवड्यांच्या कालावधीत त्यांना इथले रेशन कार्ड, आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र मिळायला वेळ लागणार नाही. कारण यापूर्वीही बांग्लादेशी घुसखोरांच्या बाबतीत आपल्या देशात हेच अनुभवायला मिळाले आहे. आज पश्चिम बंगालमधील कित्येक आमदार हे याच अवैध बांग्लादेशी नागरीकांच्या मतांवर निवडून आले आहेत. याचीच परिणती मग मुस्लिमांच्या लांगुलचालनात होते ज्याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यातील दुर्गापूजेवर घातलेली बंदी. त्यामुळे आता या परकीय रोहिंग्या मुस्लिमांची अशी मते महत्त्वाची आहेत की येथील शांतताप्रिय बौद्धांची सुरक्षा याचा निर्णय सरकारला घ्यायचा आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवून घेणारे प्रशांत भूषण यांनी याबाबत सरकारविरोधात आणि रोहिंग्यांच्या बाजूने यावर न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालय यावर योग्य तो निर्णय घेईलच. मात्र तरीही रोहिंग्या मुस्लिमांमुळे भारतीय बौद्धांच्या आणि एकूणच सर्व भारतीयांच्या सुरक्षेची हेळसांड होऊ नये एवढीच अपेक्षा आहे.