संवाद – एक पूल की .....

Total Views |


प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात एकतरी कविता करतोच असं म्हणतात. कवितेचे मला माहित नाही स्वतः शी संवाद मात्र प्रत्येकाचा होत असावा. किती प्रकार असतील ना या संवादाचे! माणसाचा जसा व्यवसाय, जसा स्वभाव, जशी वृत्ती तसा त्याचा स्वतः शी संवाद. मग काही जण स्वतः च्या चुकांची कबुली मनातल्या मनात देत असतील तर काही खरच स्वतः ची चूक असूनही स्वतः शी सुद्धा कबूल करत नसतील. शेवटी प्रत्येक माणूस स्वतः चा वकील असतो.

 

या संवादाची गम्मत अशी की असा संवाद घडण्याची प्रत्येकाची वेगळी जागा असते. काही जण प्रवासात तर काही अंथरुणावर पडल्यावर, काही ऑफिसच्या केबिनमध्ये एकटे असताना, तर काही जॉगिंग करताना, जितक्या व्यक्ती तितके प्रकार. एकांत मात्र आवश्यक. कधी कधी चार चौघात असताना पण स्वतः ची तंद्री लागते पण ती कोणीतरी मोडतच.

 

माझा स्व-संवाद स्वयंपाक करताना जसा होतो तसा कुठेच होत नाही. एकतर नेहमीच्या सवयीने हात भराभर काम उरकत असतात आणि व्यत्ययही नाही कोणाचा! पण आजची गोष्ट वेगळी होती. कारण सुट्टीचा दिवस. त्यामुळे सर्व वेळापत्रक विस्कटलेलं. नाश्त्याच्या वेळेला पहिला चहा, जेवणाच्या वेळेला नाश्ता आणि मग दुपारच्या चहाच्या वेळेला जेवण असा सर्व मामला. पण एरवी घड्याळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या या पिढीला एक तरी दिवस घड्याळाला झुगारून द्यायला मिळायलाच हवा. अजून एक गोष्ट होती जिच्यामुळे माझा माझ्याशी संवाद सुरूच झाला नाही. आज एक नवीन शब्द ऐकला. चहाच्या टेबल वर मुलाच्या आणि सुनेच्या गप्पा सुरु होत्या. ऑफिसशी संबंधित काही विषय होते त्यातले काही समजणे शक्यच नव्हते. मला खेचून घेतले ‘loop completion’ या शब्दाने.

 

साधारण समजले ते असे की, आपल्याला एखादी सूचना कोणी केली आणि आपण ती अमलात आणली तर आपण समोरच्याला ते कळीत करायला हवे की आपण त्याने दिलेल्या सूचनेनुसार काम केले आहे. नाहीतर ते काम पूर्ण होईल तेंव्हाच त्याला हे कळेल. त्या आधीच त्याला आपल्या कडून ते समजणे म्हणजे loop completion.

 

मन एकदम संस्थेच्या कार्यालयात जाऊन पोचलं होतं. कामाला नुकतीच सुरुवात केली होती. कॉलेज करून वेळ मिळाला की कार्यालयात जाऊन यायचं. बऱ्याच वेळा सर भेटायचे. कोणी ना कोणीतरी सारखं भेटायला यायचं त्यांना. त्या दिवशी सीमा होती बरोबर माझ्या. दोन मिनिटाचे काम आहे सरांकडे असे म्हणाली होती मला. माझ्या पेक्षा थोडी आधीपासून कामात होती. त्यामुळे कार्यालयात बऱ्याचदा काहीतरी काम असायचं तिचं. आम्ही गेलो तेंव्हा सर यायचे होते. आज घरी जायला उशीर झाला तर काही खरं नाही त्यामुळे आपण आधीच निघावं असा विचार सुरु असतानाच सर आले. आता तर निघूनही जाता येणार नव्हतं त्यामुळे तिथेच थांबले. सर सीमाला म्हणाले, ”सीमाबाई, काल भेट झाली बरं का मितालीची. उद्या तुम्ही भेटा तिला.” सीमा नुसती हसली, सर त्यांच्या दुसऱ्या कामाला लागले आणि आम्ही कार्यालयाच्या बाहेर पडलो.” चला circuit पूर्ण झालं.“ सीमा हळूच पुटपुटली. मला काहीच कळलं नाही पण सीमाशी माझी एव्हढी घसट नव्हती त्यामुळे काहीच विचारले नाही तिला. हळू हळू माझा कामात सहभाग वाढत होता. काही व्यक्तिगत अडचणी येत होत्या. सीमा बरोबर मैत्री झाली होती. तिला शक्य होईल तेव्हढी मदत ती करायचे. काही तात्विक शंका पडायला लागल्या तसे तिने सरांची भेट घ्यायला सुचवले. नेहमीप्रमाणे सर कार्यालयात भेटले. त्यांची भेट कशी मागावी सुचत नव्हते. इतक्यात सर मला म्हणाले, “उद्या वेळ आहे मला संध्याकाळी, कॉलेजमध्ये भेटू शकतो. तुमची सोयीची वेळ सांगा.” मी माझी वेळ सांगितली. भेट ठरली आणि मी अचानक सीमाकडे पाहिलं. माझ्या नजरेतला प्रश्न तिला समजला आणि मला उत्तरही मिळालं. यावेळी सीमाने circuit पूर्ण केलं होतं.

 

काही वर्ष कामाचा अनुभव मिळाल्यावर आता नवीन आलेल्या कार्यकर्ता मुला – मुलींच्या छोट्या छोट्या शंकांची उत्तरे मलाही देता यायला लागली. एकदा कार्यालयात एक नवीन कार्यकर्ता आला मला भेटायला. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या तयारीची गडबड चालली होती. “ उद्या तू काय करतीयेस? “ त्याने विचारले. मनात उत्तर तयार झालं – सकाळी college, दुपारी क्लास, संध्याकाळी कार्यक्रम – तेव्हड्यात सर आठवले. “lunch break ला college मध्ये येशील का? एकत्र डबा खाऊया. “ मी त्याला म्हणाले. अरे हिला कसं कळल मला काहीतरी बोलायचं आहे ते - असा भाव त्याच्या नजरेत अगदी स्पष्ट दिसला होता मला. संवादाचा खरं अर्थ तुम्ही एकमेकांशी किती वाक्य बोलता, किती वेळ बोलता, यावर अवलंबून नसतो.

 

शब्दांचा शब्दशः अर्थ ध्यानात घेऊन होतात ती प्रश्नोत्तरे किंवा मुलाखत. खरा संवाद घडतो समोरच्याच्या शब्दांमधला भावार्थ लक्षात आल्यावर. प्रत्येक संवादाला circuit पूर्ण करण्याची गरज असेलच असं काही नाही. पण जिथे असेल तिथे त्याच्या शिवाय संवादाला पूर्णत्व येणार नाही.

 

हे circuit पूर्ण होणं म्हणजेच loop complition नाही का? कंपनी मध्ये कामकाज नीट चालावं म्हणून कदाचित संवादाची गरज असेल पण जिथे जिथे माणसांचा संबंध येतो तिथे तिथे संवाद गरजेचा असतोच. माणूस समाजप्रिय प्राणी आहे असं शाळेत आपण शिकतो. त्याच चालीवर असं म्हणावसं वाटत की माणूस हा संवादप्रिय प्राणी आहे.

 

दोन माणसांमधला संवाद जेंव्हा भावार्थ लक्षात न घेता शब्दार्थ लक्षात घेऊन होतो तेंव्हा बहुदा तो वादाचं रूप घेतो. त्यामुळेच “मला असं म्हणायचं नव्हतं, पण ....” अशी वाक्य नंतर दोन्हीकडून ऐकायला मिळतात. अशा संवादामुळे दोघांमधे  पुलाऐवजी भिंती उभ्या राहण्याचीच शक्यता जास्त असते.

 

पुलाचे काम करणाऱ्या संवादासाठी गरज आहे समोरच्याला माणूस म्हणून समजून घेण्याची. समोरच्याला जितके चांगले ओळखू तितक्या कमी शब्दात संवाद घडू शकतो आणि एक वेळ अशीही येते की शब्दांशिवाय संवाद घडतो. यालाच मनकवडेपण म्हणतात. संवादाच्या उत्कृष्टतेची परमावधी ती हीच असावी.

 

मुलाच्या आणि सुनेच्या गप्पा ऐकता ऐकता माझा स्व - संवाद  घडला आणि मी तो त्यांना सांगायचा ठरवला कारण सध्या घरा - घरात अशा संवादाची खूप गरज आहे आणि एकमेकांना समजून घेण्याची, ओळखण्याची सुद्धा. आजच्या धावपळीच्या काळात कमीतकमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी एकमेकांपर्यंत पोचवणे ही आजच्या काळाची गरज, प्रभावशाली संवाद पद्धतीच पूर्ण करू शकते, नाही का ?

 

- शुभांगी पुरोहित

शुभांगी पुरोहित

M. Sc. B. Ed., शाळेसाठी पथनाट्य लेखन, कविता स्पर्धांमध्ये सहभाग. ललित लेखन. माणसांच्या भावभावनांशी निगडित विषय लिहायला आवडतात. रत्नागिरीत आयोजित ' राम का गुणगान करिये ' ह्या रामाबद्दलच्या विविध गीतांवर आधारित २ तासांच्या कार्यक्रमाच्या संपूर्ण निवेदनाचे लेखन आणि सादरीकरण केलेले आहे.