केनियातल्या 'मासाई कम्युनिटी' चे अनोखे क्रिकेट पहाच...
31-Aug-2017
Total Views |
क्रिकेट हा खेळ आज जगभरात इतका नावाजला गेला आहे कि करोडो लोकांची पसंती आज या खेळाने मिळवली आहे. पैसा, नाव, देशाभिमान अशा अनेक गोष्टी अनेकांना आजपर्यंत या खेळाने मिळवून दिल्यात. पण या खेळाच्या माध्यमातून एका कम्युनिटीमध्येच (समुदाय) अमुलाग्र बदल करण्याचे शिवधनुष्य केनियामधील काही लोक एकत्र येऊन पेलत आहेत. 'मासाई' असं या कम्युनिटीचं नाव आहे.
मासाई क्रिकेट वॉरियर्स या नावाचा एक संघ गेल्या अनेक वर्षांपासून केनिया मधल्या लाइकिपिया भागात कार्यरत आहे. केनियातील मासाई समाजामध्ये क्रिकेटद्वारे युवकांचे सबलीकरण करणे, समाजाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढविणे, त्यांना निरोगी, उत्पादक व समाजकरीत्या समृद्ध सदस्य बनण्यास अनुमती देणे हि या समाजाची ध्येय आहेत. 'मासाई क्रिकेट वॉरियर्स'चे काही छायाचित्र 'आयसिसी'ने ट्विटरवर प्रसिद्ध केले आहेत. हा संघ स्थापन झाल्यापासून त्यांनी स्थानिक तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक क्रिकेटचे सामने खेळले आहेत.
मासाई समाजाचा हा प्रयत्न अनेक वर्षांपासून चालू असला तरी गेल्या काही दिवसातच त्यांचे हे कार्य सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशझोतात आले आहेत. युवकांना शिक्षण आणि त्यांचे सबलीकरण या उद्देशाशिवाय या समाजातील महिलांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी क्रिकेटच्या माध्यमातून लढा दिला जात आहे. महिलांना दिले जाणारे दुय्यम स्थान आणि लहान वयात केले जाणारे त्यांचे लग्न यावर उपाय काढण्याचा या क्रिकेट संघाच्या वतीने प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी या संघात महिलांना देखील स्थान देण्यात आले आहे.
'मासाई क्रिकेट वॉरियर्स'चे सदस्य
'मासाई क्रिकेट वॉरियर्स'तर्फे समाजसुधारणेसाठी खालील महत्वाच्या मुद्द्यांचाही विचार केला जात आहे :
- युवकांमध्ये एचआयव्ही / एड्सची जाणीव
- लैंगिक भेदभाव सोडवणे
- मादक पदार्थांचे सेवन कमी करणे
- पर्यावरणीय आणि संवर्धन समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करणे
- शांततेत सुधारणा करण्याच्या प्रयत्न आणि स्थानिक विकासाचे योगदान
सिडनी क्रिकेट मैदानावर 'मासाई क्रिकेट वॉरियर्स'चा कप्तान