
श्री गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालं आहे आणि अनेक घरांमध्ये आता गौरींचीही स्थापना झाली आहे.
गणपती पूजनाची पद्धत ही सर्वसाधारणपणे सारखीच असली तरी, गौरींच्या पूजनाची पद्धत अनेक ठिकाणी वेगवेगळी असते. खड्यांच्या गौरी, मुखवट्यांच्या गौरी, तेरड्याच्या गौरी ही गौरींची परिचित रूपं आहेत. मात्र ह्यासोबत मूर्त स्वरूपात गौरींची पूजा पालघर, डहाणू, विरार, वसई ते पेण पनवेल ह्या भागात केली जाते. आगरी, कोळी, भंडारी इत्यादी समाजात ह्या प्रकारच्या पुजेची पद्धत प्रचलित आहे.
सर्वसाधारणपणे सिंहासनारूढ असलेल्या गौरींच्या मूर्ती जितक्या सुंदर दिसतात तितक्याच त्या वाहन म्हणून असलेल्या मासा, हंस, चिंबोरी, कोंबडा, फुलांची परडी, मोर, सिंह ह्यावर मनमोहक दिसतात. ह्याचबरोबर ही गौरीची मूर्ती अगदी लाकडी खुर्चीत देखील असते.
गौरी आवाहनाच्या दिवशी अत्यंत उत्साहात 'गौराई माते'ला आवाहन केलं जातं. सवाष्णी तिची पूजा करतात. तिला बांगड्या, वेणी, मंगळसूत्र, हार, कानातले, इत्यादी दागिन्यांनी सजवलं जातं.
वेगवेगळ्या रंगांच्या साड्यांनी नटलेल्या गौरी फार फार सुंदर दिसतात. गम्मत म्हणजे ज्या रंगाची गौरीची साडी असेल त्याच रंगाच्या आणि नक्षीच्या साड्या मंडळातल्या किंवा घरातल्या स्त्रिया नेसून येतात.
ह्या गौरींबरोबर असणारं बाळ ही एक अनोखी प्रथा इथे बघायला मिळते. संतानप्राप्तीसाठी गौरीला नवस केला जातो. जिचा नवस असतो तिला संतान प्राप्त झाली की गौरीच्याही मांडीवर बाळ बसवलं जातं. ही बाळाचीसुद्धा मूर्तीच असते.
गणपती चित्रशाळांमधून गौरींच्या मूर्ती घरी न्यायची जवाबदारी स्त्रियांनी आनंदाने स्वीकारलेली असते. गौरींची पारंपरिक गाणी म्हंटली जातात. तिच्याभोवती रिंगण करून स्त्रिया पारंपारिक नाच करतात. गौर घरी नेताना वाजतगाजत नेली जाते. बऱ्याचदा ह्या दोनअडीच फूट मूर्ती डोक्यावर उचलून नाचतगात नेल्या जातात.
गौर पूजनाच्या दिवशी गौरीला मांसाहाराचा नैवेद्य असतो. शेजारी गणपतीची स्थापना झालेली असेल तर गणपती बाप्पाला मात्र शाकाहारच असतो. गौर आणि गणपती ह्यांच्यात पडदा बांधून मग नैवेद्य दाखवला जातो. रात्रभर जागरण केलं जातं. दिवसभर अक्षरशः धमाल असते. अनेक ठिकाणी गणपतीपेक्षा गौरीच्या सणाचं जास्त महत्त्व असतं.
घरोघरी जशी ह्याप्रकारचं गौरीपूजन होतं तसंच अनेक मंडळांमध्येसुद्धा सार्वजनिक गौरीची पूजा केली जाते.
विसर्जनाच्या दिवशी तितक्याच उत्साहाने विसर्जनाची मिरवणूक निघते. ह्याही दिवशी स्त्रिया डोक्यावर गौराई मातेची मूर्ती घेऊन नाचतात. मिरवणुकीतच मूर्ती एकीच्या डोक्यावरून दुसरीच्या डोक्यावर दिली जाते. तासनतास ही विसर्जनाची मिरवणूक चालते. अपरंपार उत्साहात गौरींचा सण साजरा केला जातो.
आपल्या धर्मातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचं अनोखं दर्शन आपल्या वेगवेगळ्या सणांमध्ये होतं. सण साजरे करायची पद्धत बदलली असली तरी आपल्या आराध्यासाठीचं प्रेम मात्र पिढ्यानपिढ्या तेच राहतं. गौरींचा सण हाही असाच उत्साहाचा, प्रेमाने साजरा करायचा!
- सारंग लेले