२९ ऑगस्ट, मंगळवार रोजी मुंबई - नागपूर दुरांतो एक्सप्रेसचा अपघात झाला. आसनगाव नजीक गाडीचे तब्बल ९ डबे रुळावरून घसरले. मात्र यात कुणाचीही जीवितहानी झाली नाही. यामागचे नेमके कारण काय? भारतीय रेल्वेने एल.एच.बी.(लिंक हॉफमन बश्च) कोच दुरांतो एक्सप्रेसमध्ये बसविल्यामुळे हे शक्य झाले आहे.
काय आहे एल.एच.बी. कोच?
एल.एच.बी. अर्थात लिंक हॉफमन बश्च कोचचा भारतीय रेल्वे नवीन रेल्वे प्रणालीसाठी उपयोग करत आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी या वर्षभरात सर्व रेल्वे गाड्यांमध्ये या कोचचा वापर करावा असे निर्देश दिले आहेत. लिंक हॉफमन बश्च नामक जर्मन कंपनीद्वारे हे कोच विकसित केले गेले आहेत. याचे उत्पादन भारतीय रेल्वे कोच फॅक्टरी कपुरथला येथे केले जाते.
याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे रेल्वेगाडी रुळावरून घसरल्यास अथवा दोन रेल्वेगाडीची टक्कर झाल्यास एल.एच.बी. कोच कधीही घसरत नाहीत, अथवा त्यास मोठे नुकसान होत नाही. परिणामी प्रवाशांचा जीव वाचत असतो. मुंबई-नागपूर दुरांतो गाडी रुळावरून घसरली होती, मात्र गाडीचे डबे जमिनीवर पडले नाहीत, त्यामुळे प्रवाशांचा जीव बचावला.
एल.एच.बी. कोचचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे डबे इतर रेल्वे डब्यापेक्षा वजनाने अधिक हलके आहेत, त्यामुळे गाडीचा वेग देखील वाढायला मदत होते. इतर रेल्वे डबे हे लोखंड आणि पोलादपासून बनत असतात, मात्र एल.एच.बी. कोच हे बाहेरून स्टेनलेस स्टील आणि आतून अॅल्युमिनियमपासून तयार केल्यामुळे हे तुलनेने जास्त हलके आहेत. यामुळे १६० किमी प्रती तास गाडीचा वेग २०० किमी प्रतितास एवढा होत असतो.
यामुळे ध्वनी प्रदूषणला देखील आळा बसत असतो. वातानुकुलीत एल.एच.बी. कोचमध्ये एक विशिष्ट प्रकारचे मायक्रोप्रोसेसर बसवलेले असते. ज्यामुळे प्रवाशांना हिवाळा आणि उन्हाळ्याच्या दरम्यान अधिक आराम मिळत असतो, त्याच बरोबर सामान्य रेल्वे कोच पेक्षा याची ध्वनी पातळी ६० डेसिबल एवढी असते.
इतर सुविधांच्या दृष्टीने देखील एल.एच.बी. प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर ठरत आहे. याची लांबी २३.५४ मीटर असून रुंदी ३.२४ मीटर एवढी आहे. याची डिझाईन देखील सुविधायुक्त आहे. यातील प्रकश पद्धती, खिडक्या, समान ठेवण्याची रचना देखील सामान्य रेल्वे डब्यापेक्षा अधिक उत्तम आहे. यातील 'अॅडव्हांस न्युमॅटीक डिस्क ब्रेक सिस्टीम' मुळे जलद गतीने ब्रेक लावता येते, त्यामुळे रेल्वे गाडीचा तोल देखील सुटत नाही.
स्वच्छतागृह
यात 'कंट्रोल डीसचार्ज टॉयलेट सिस्टीम' तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे गाडी ३० किमी प्रती तास वेगाने धावत असल्यास शौचालय प्रणाली कार्यरत असते. या प्रणालीमुळे रेल्वे स्थानकावरील रुळावर अस्वच्छता माजणार नाही. त्याचबरोबर 'जैव-शौचालय' देखील यात विकसित करण्याची प्रक्रिया रेल्वे विभागाने डीआरडीओच्या मदतीने पूर्ण केली आहे. परिणामी रेल्वेगाड्या या संपूर्णपणे सुरक्षित तसेच संपूर्णपणे स्वच्छ देखील राहायला मदत होईल.
एल.एच.बी. कोचचा वापर
भारत सरकारमध्ये या रेल्वेकोच ला २००० साली मान्यता मिळाली. त्यावेळी २४ कोच शताब्दी एक्सप्रेससाठी जर्मनीहून मागविण्यात आले होते. मात्र त्यानंतर भारतीय रेल्वे कोच फॅक्टरी कपुरथला येथे हे निर्माण करण्याची सुरुवात करण्यात आली. आत्तापर्यंत हे डबे केवळ मोठ्या रेल्वे गाड्यांमध्ये वापरले जात असत. मात्र रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी २०१७-१८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सर्व रेल्वेगाड्यांमध्ये याचा समावेश करण्याचा चंग बांधला आहे. यामुळे रेल्वे अपघातातील जीवितहानी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, दुरांतो एक्सप्रेस, अंत्योदय एक्सप्रेस, हमसफर एक्सप्रेस, डबल डेकर एक्सप्रेस यांसारख्या लांबच्या आणि मोठ्या गाड्यामध्ये याचा वापर केला जात आहे. त्याच बरोबर इतर ७८ रेल्वे गाड्यांमध्ये याचा वापर करण्यात येत आहे. हा वापर २०१७ च्या शेवट पर्यंत सर्व रेल्वेत करावा असा संकल्प आहे. गेल्या आठवड्यात उत्कल आणि कैफियत एक्सप्रेस दरम्यान झालेल्या अपघातात अनेक नागरिकांचा जीव गेला, एल.एच.बी. कोचच्या प्रभावी वापरामुळे ते यापुढे टाळता येईल.
- हर्षल कंसारा