
सर्वोच्च न्यायालयाने आज तिहेरी तलाक या कुप्रथेवर बंदी घालण्याचा निर्णय सुनावला, आणि येत्या ६ महिन्यात यावर केंद्र सरकारने कायदा करावा अशी सूचना देखील केली आहे. त्यामुळे मुस्लीम समाजातील स्त्रियांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण आहे. एखाद्या महिलेला पतीने घटस्फोट दिल्यानंतर तो नाकारण्याचा देखील तिच्यापाशी अधिकार नव्हता! सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालामुळे तो त्या महिलेला मिळाला आहे, ही स्वतंत्र आणि विकसनशील भारतातील ऐतिहासिक घटना मानली जाईल.
या घटनेचा दूरगामी परिणाम मुस्लीम महिलांच्या आयुष्यात होणार आहे, तसेच आधुनिक भारतात आजही सेक्युलॅरीझमच्या बुरख्याखाली फोफावणाऱ्या कट्टरतावादी विचारला चाप बसणार आहे. भारतात प्राचीन काळापासून आजतागायत अन्यायकारक प्रथांविरोधात समाजसुधारणा नेहमीच झाल्या आहेत. १९ व्या शतकात अशा अनेक चळवळी सुरु झाल्या होत्या, हिंदू धर्मात असलेल्या कुप्रथा त्या काळात मोडून काढण्याचे जणू सत्रच चालले होते. परिणामत: बाल विवाह, सती प्रथा, महिलांना शिक्षण घेण्याचा हक्क, अस्पृश्यता या मानवतेला काळिमा फासणाऱ्या प्रथांचा हिंदूंनी त्याग केला आणि कालानुरूप आपल्या धर्मात बदल घडवून आणला.
याच काळात मात्र भारतातील मुस्लीम समाज नेमक्या वेगळ्या मन:स्थितीत होता. मुस्लिमांची म्हणून वेगळी भूमी हवी, अशी भावना त्यांच्यात फोफावत होती, त्या मुस्लीम भूमीवर शरियाचा कायदा पाळला जाईल, कुरणात लिहिल्याप्रमाणे तेथील नागरिक वागतील, अश्या भावविश्वात त्या काळात मुस्लीम समाज वावरत होता. परिणामत: पाकिस्तान सारख्या कट्टरपंथीय मुस्लीम राष्ट्राची भारतभूमीतून निर्मिती झाली. त्या कट्टरपंथीय स्वप्नांत वावरलेले सर्व आत्मे पाकिस्तानात जाऊन स्थायिक झालेत. मात्र त्याकाळी असलेले सर्व मुस्लीम यात सामील झाले नाहीत! हा इतिहास आपण सर्वच जाणून आहोत. जे मुस्लीम नागरिक त्याकाळी पाकिस्तान नामक कट्टरपंथीय देशात सामील झाले नाहीत, त्यांनी शरिया नव्हे तर संविधानाचे पालन करावे अशी भारतीयांना अपेक्षा होती. आणि याची संपूर्ण जाणीव या मुस्लिम समाजाला होती म्हणूनच ते या देशात जाणीवपूर्वक राहिले. भारताने स्वातंत्र्योत्तर काळात अंगिकारलेले संविधान हे कोणाच्याही हक्कांची गळचेपी करणारे नाही, त्यामुळे येथील मुस्लीम समाजानेही ते तितक्याच आत्मीयतेने स्वीकारावे अशी रास्त अपेक्षा त्यांच्याकडून आहे. भारत हा उदारमतवादी देश म्हणून ओळखला गेला आहे, येथे सर्वांच्या मताचा आदर केला जातो, आणि प्रत्येक नागरिकाला आपले मत ठामपणे, स्पष्टपणे मांडण्याचा अधिकार दिला जातो, अशी घटना भारताने मान्य केली आहे.
त्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाची भारतीय घटनेवर अपार श्रद्धा आणि विश्वास आहे. मात्र दुर्दैवाने येथे राहिलेला मुस्लीम समाज, आपल्या शरिया सारख्या कालबाह्य प्रथेवरच अडकून राहिला, समाजातील कुप्रथा मोडून काढण्यासाठी कुठलाही पुढाकार मुस्लीम समाजातील लोकांनी घेतल्यास त्याला कट्टरपंथीयांकडून आडकाठीच लावली जाऊ लागली. त्याहून अधिक मोठे दुर्दैव म्हणजेच या कट्टरपंथीय आडमुठेपणाला स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांची राजकीय फूस गेल्या सत्तर वर्षांपासून होती. केवळ मतपेटीचे राजकारण करण्यासाठी आपण देशातील एका महत्वाच्या समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहोत, याची कुठलीही तमा पुरोगामित्वाच्या बुरख्याखाली वावरणाऱ्या राजनेत्यांनी बाळगली नव्हती. त्याचाच परिमाण म्हणून मुस्लीम महिलांना पतीने दिलेल्या तलाक ला नाकार देण्याचा कायदेशीर हक्क मिळण्यासाठी स्वातंत्र्यानंतर देखील ७० वर्षे वाट पहावी लागली.
शाहबानो ते शायराबानो - प्रवासातील बदलती परिस्थिती...
तोंडी तलाक हा एकतर्फी असल्यामुळे मुस्लीम महिलांना नेहमी त्या समाजाच्या पुरुषांकडून पायदळी तुडविले जाते. केवळ पतीची मर्जी सांभाळावी, त्याने आपल्याला 'तलाक' देऊ नये, म्हणून आयुष्यभर त्याने केलेले अत्याचार मुस्लीम महिला मुकाट्याने सहन करत असत. शिवाय महिलेने पुरुषाला घटस्फोट देण्याचे व्यक्तीस्वातंत्र्य आजवर तिच्यापाशी नव्हतेच, पतीला वाटले तेव्हा तो फोनवर, पत्राने, टेलिग्रामच्या माध्यमातून अथवा व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून पत्नीला घटस्फोट द्यायला केव्हाही मोकळा होता. स्वतंत्र भारतात त्याला नाकारण्याची देखील मुस्लीम महिलेला कायदेशीर मुभा आजवर नव्हती हे मोठे दुर्दैव. मात्र याविरोधात मुस्लीम समाजातून वेळोवेळी आवाज उठवला गेला होता.
याची सुरुवात शाहबानो प्रकरणातून झाली. १९७८ साली शाहबानो या ६२ वर्षीय मुस्लीम महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिला. वयाच्या ६२ व्या वर्षी घटस्फोट मिळालेल्या गृहिणी समोर उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला, त्यामुळे पतीकडून पोटगी मिळावी म्हणून तिने प्रयत्न सुरु केला. शरियाच्या कायद्याप्रमाणे अशी कुठलीही तरतूद नसल्यामुळे कट्टरपंथीय मुस्लिमांनी तिची ही मागणी अमान्य केली. मात्र शाहबानोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या एकूण प्रक्रियेप्रमाणे तिची सुनावणी सुरु झाली. ७ वर्षे या सुनावणीला गेल्यानंतर शाहबानोला सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला, आणि आपल्या पतीकडून पोटगी मिळण्यासाठी तिला कायदेशीर परवानगी मिळाली. मात्र त्यावेळेच्या केंद्र सरकारच्या कट्टरपंथीय मुस्लीमांचे लांगुलचालन करण्याच्या वृत्तीमुळे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कट्टरपंथीय मुस्लिमांची मर्जी राखण्यासाठी संसदेतील बहुमताच्या जोरावर चक्क कायद्यात बदल घडवून आणला, आणि शाहबानो सहित सर्व मुस्लीम महिलांना पोटगी नाकारली.
परंतु तेव्हा पासून आज पर्यंत मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर टिप्पणी होत राहिली. तिहेरी तलाकवर सर्वोच्च न्यायालयाने शायराबानो या मुस्लीम महिलेच्या याचिकेमुळे निर्णय दिला आहे. उत्तराखंड येथील शायराबानो या महिलेला तिच्या पतीने २०१५ साली टेलिग्रामच्या माध्यमातून घटस्फोट दिला होता. तिला २ मुलं आहेत, मात्र या तिहेरी तलाक पद्धतीमुळे तिला पतीचे घर सोडून जावे लागले, मुलांना भेटण्याचे देखील नाकारले गेले. या घटनेमुळे शायराबानोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आणि या अत्याचारी तिहेरी तलाक पद्धतीवर बंदी घालण्याची मागणी केली. संविधानानुसार कलम १४ आणि १५ नुसार तिच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणली जात आसल्याचे तिने सांगितले. यावर न्यायालयाची सुनावणी सुरु झाली. सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिमांच्या धार्मिक बाबींमध्ये लुडबुड करू नये, असा कांगावा मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने केला होता. त्यास न्यायालयाने भिक घातली नाही, आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा घालू पाहणाऱ्या या प्रथेचा बिमोड केला. सरकारने देखील यात न्यायालयीन प्रक्रीयेचा मान राखत ही प्रथा मोडकळीस काढावी अशीच भूमिका मांडली. आणि परिणामत: आजचा निकाल आला.
बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीमुळे हे शक्य झाले आहे. आजच्या केंद्र सरकारमध्ये मताच्या राजकारणाखातर कट्टरपंथीय कुप्रथांना चुचकारण्याचे प्रकार केले जात नाहीत, म्हणूनच केंद्र सरकारच्या वतीने या सुनावणी दरम्यान मुस्लीम महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात भूमिका घेतली गेली आहे. येत्या ६ महिन्यात केंद्र सरकार यावर अधिकृतपणे कायदा बनवून स्वतंत्र भारतात सर्व धर्मियांना खऱ्याअर्थाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यासाठी सरकार नेहामीच पाठीशी उभी आहे, याची प्रचीती देईल असा विश्वास आहे. आणि या कायद्यामुळे मुस्लीम समाज एका नव्या पर्वाला सुरुवात करून जुनाट प्रथांचे जाळे मोडून, एका मोकळ्या आकाशाच्या दिशेने पाऊल टाकेल, अशी अशा बाळगू.
- हर्षल कंसारा