
किल्ला म्हटलं की, गिरिदुर्ग किंवा जलदुर्ग आपल्या समोर उभे राहतात. परंतु महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये इतर ही काही किल्ले आहेत. जे पठारावरती किंवा सपाट भू भागावरती बांधण्यात आलेले आहेत. त्यामध्ये काही भुईकोट किल्ले तर काही सभोवती खंदक खोदून सपाट भूभागावर बांधलेले आहेत. आजच्या स्थितीत दुर्लक्षित असलेल्या या किल्ल्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, अशाच एका किल्ल्यावर फेरफटका मारून यावा, याकरिता यावेळी दुर्ग भ्रमंतीसाठी धर्मापुरीच्या किल्ल्याची निवड केली. (तसा मी मुळचा अंबेजोगाईचा असल्यामुळे, या किल्ल्यावर खूप वेळा जावून आलेलो आहे.)
मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामधील अंबेजोगाई या शहराचा स्वतः चा असा इतिहास आहे. पूर्वी या शहराचे नाव मोमिनाबाद असे होते. या ठिकाणी कोकणवासीयांचे कुलदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. आद्य कवि मुकुंदराज स्वामी आणि दासोपंत महाराज यांची समाधी आहे. हत्तीखाना या ठिकाणी प्राचीन लेण्या आहेत. काशी विश्वेश्वर मंदिर, बारा खांबी, खोलेश्वर मंदिर, बुट्टेनाथ मंदिर, नागनाथ मंदिर तसेच खोपननाथ मंदिर ही मंदिरे स्थापत्य कलेचा उत्तम नमुना असलेली महादेवाची मंदिरे आहेत. नुकतेच उत्खननात बाराखांबी याठिकाणी काही मुर्त्या सापडलेल्या आहेत. तालुक्याचे ठिकाण असलेल्या याच अंबेजोगाई शहरापासून जवळच धर्मापुरी नावाच एक गाव आहे. या गावामध्ये चालुक्य कालीन केदारेश्वर मंदिर आहे. तसेच एक किल्ला देखील आहे.
पुण्याहून अंबेजोगाईला जाण्यासाठी एस. टी. बस आहेत. त्यापुढे अंबेजोगाईहून धर्मापुरी गावाकडे जाण्यासाठी देखील बस आहेत. धर्मापुरी हे गाव अंबेजोगाई – अहमदपूर या हमरस्त्यावर वसलेले आहे. खाजगी वाहनाने किंवा एस. टी. बसने धर्मापुरी गावापर्यंत पोहचता येते. मुंबई किंवा पुण्याहून रेल्वेमार्गाने लातूरला अथवा परळी या गावी आल्यानंतर या ठिकाणाहून देखील धर्मापुरीस पोहचता येते.
धर्मापुरीच्या किल्ल्याचा इतिहास :
या किल्ल्यास विशिष्ठ असे नाव नाही. हा किल्ला धर्मापुरीचा किल्ला म्हणून ओळखला जातो. धर्मापुरीचा हा किल्ला, या गावामध्ये निजामाच्या राजवटीमध्ये बांधण्यात आला होता. मराठवाड्यातील या परिसरामध्ये हैद्राबादच्या निजामाची सत्ता होती. आणि त्यावेळी अंबेजोगाई परिसरात त्याची काही सत्ता केंद्रे होती. अंबेजोगाई येथे निजामाच्या सत्ता केंद्राचे आज ही काही अवशेष दिसून येतात.
धर्मापुरीचा किल्ला ज्या दगडांपासून बांधण्यात आलेला आहे, त्या दगडांवर कोरीव काम केलेले आहे. परिसरात एक मोठा तलाव देखील आहे. धर्मापुरीच्या किल्ल्याचा आणि येथील मंदिरांचा इतिहास रझाकारांशी जोडलेला आहे. असे म्हणतात की, हैद्राबाद मुक्ती संग्रामावेळी रझाकारांनी या परिसरातील काही मंदिरे उध्वस्त केली होती.

धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरातील पहाण्यासारखी ठिकाणे :
अंबेजोगाईहून धर्मापुरीला आल्यानंतर वाटेवरूनच आपल्याला किल्ला दिसतो. धर्मापुरी गावामधून किल्ल्याच्या मुख्य दरवाज्यापर्यंत वाहन घेवून जाता येते.
किल्ल्याचा उंचवटा आणि तटबंदी : हा किल्ला धर्मापुरी गावामधील एका उंच वट्यावर बांधलेला आहे. हा उंच वटा दुरूनच आपल्याला दिसतो. तसेच पडझड झालेली किल्ल्याची तटबंदी देखील दिसते. किल्ल्याला ऎकेरी तटबंदी आहे. तटबंदी उंचवट्याच्या खालपासून बांधलेली आहे. तटबंदीमध्ये उभारण्यात आलेले अष्टकोणी बुरुज आहेत.
अष्टकोनी बुरुज आणि तटबंदीवरील जंग्या : किल्ल्याच्या तटबंदीवर अष्टकोनी बुरूज आहेत, आणि तटबंदीवरून मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधण्यात आलेल्या आहेत. या जंग्या देखील किल्ल्याच्या बाहेरील बाजूने दिसतात.
किल्ल्याचा मुख्य दरवाजा : किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याजवळ संरक्षक म्हणून कोट बांधलेले आहेत. या कोटाच्या तटबंदीमध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. यापुढे दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या आहेत. तसेच याठिकाणी नक्षीकाम देखील केलेले आहे.
किल्ल्यातील चौकोनी विहिर : किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर समोर अवशेषरूपातील खोल्या आहेत. या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर एक चौकोनी आकाराची विहिर आहे. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या आहेत.
हनुमानाचे मंदिर : विहिरीपासून पुढे गेल्यानंतर तटबंदीतील एका दगडावर कोरण्यात आलेले उड्डाण करणाऱ्या हनुमानाचे शिल्प आहे. याच ठिकाणी तटबंदीखाली एक चोर दरवाजा देखील आहे.
पीर : धर्मापुरीचा हा किल्ला निजामशाही सत्तेच्या कालखंडात बांधण्यात आलेला असल्यामुळे किल्ल्याच्या परिसरात एक पीर आहे. किल्ल्याच्या परिसरातील एका बुरुजावर पिराच हे थडगं आहे.
किल्ल्याच्या परिसरातील तलाव : किल्ल्याच्या बाहेरील बाजूस एक तलाव आहे. धर्मापुरी गावातील लोक या तलावाच्या पाण्याचा वापर करतात. जास्त प्रमाणात सांडपाण्यासाठी या पाण्याचा वापर केला जातो.
केदारेश्वर मंदिर : धर्मापुरी गावाच्या परिसरामध्ये केदारेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या परीसरात काही शिल्प पडलेली आहेत. तसेच मंदिराच्या भिंतींवर देखील शिल्प कोरलेली आहेत. या व्यतिरिक्त धर्मापुरीच्या किल्ल्याच्या परिसरामध्ये काही नागशिल्प आहेत, भवानी देवीचे मंदिर आहे.
गिरिदुर्ग किंवा जलदुर्गांची वगळून महाराष्ट्राच्या पठारावर देखील काही किल्ले आहेत. त्यामध्ये अहमदनगरचा भुईकोट किल्ला, नळदुर्गचा किल्ला, धर्मापुरीचा किल्ला, कंदाहार (नांदेड जिल्हा) चा किल्ला, धारूर आणि औसा येथील किल्ले आहेत. हे काही ज्ञात असलेले किल्ले आहेत. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी अवशेष रूपातील असे काही किल्ले अस्तित्वात आहेत, ज्यांचा इतिहास आपल्याला माहित नाही, अथवा आपल्यापर्यंत पोहचलेला नाही. महाराष्ट्रातील अशा सर्व किल्ल्यांचा इतिहास एकत्र करून, राज्य सरकारने तो सर्वांसमोर आणणे आवश्यक आहे.
– नागेश कुलकर्णी