दुर्ग भ्रमंती - हरिश्चंद्र गड

    06-Jul-2017   
Total Views |



 

पश्चिम घाटातील सह्य पर्वत रांगेतील भौगोलिक तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला म्हणजे हरिश्चंद्रगड. हरिश्चंद्रगड! या किल्ल्याचा इतिहास हा ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन घटनांची आठवण करून देणारा आहे, तर  या परिसरातील भूगोल हा ऊन, पाऊस, वारा आणि थंडी यांचा सतत अनुभव देणारा आहे. हरिश्चंद्रगड हा पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. सह्याद्री पर्वताच्या माळशेज घाटाजवळ उभा असणारा हरिश्चंद्र गडाचा उंच डोंगर अभ्यासण्यासारखा आहे. हरिश्चंद्र गडाची समुद्रसपाटीपासून उंची १४२४ मीटर आहे.

 

वर्षातील इतर ऋतूंपेक्षा पावसाळ्यात या गडाच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य खुप जास्त मनमोहक दिसते. त्यामुळेच पावसाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. या गडाच्या सर्वात उंच ठिकाणावरून परिसरातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक खास गर्दी करतात. तारामती या गडावरील सर्वोच्च शिखरावरून परिसरातील नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाईची खिंड, आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड पर्यंतचा निसर्ग पाहता येतो.


हरिश्चंद्र गडाचा डोंगर फार मोठा असल्यामुळे गडावर जाण्यासाठी जास्त रस्ते आहेत.


खिरेश्वरकडील वाट : मुंबई - जुन्नर हा रस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटातून खुबीफाटा येथून खिरेश्वरकडे जाण्यासाठी वाट आहे. पुण्याहून आळे फाटामार्गे किंवा कल्याणहून मुरबाड - माळशेज घाटमार्गे खुबीफाट्यास उतारल्यानंतर खिरेश्वरकडे जाता येते. पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस आहेत. हरिश्चंद्र गडावर जाताना खिरेश्वर गावात खिरेश्वराचे प्राचीन शिव मंदिर आहे. अकराव्या शतकातील हे यादव कालीन शिव मंदिर आहे. या मंदिरास ‘नागेश्वराचे मंदिर' असे देखील म्हणतात. खिरेश्वर गावातून दोन वाटा गडावर जातात. एक वाट तोलार खिंडीतून जाते, तर दुसरी वाट गडावरील जुन्नर दरवाजाकडे जाते. खिरेश्वरकडील वाट सोपी असल्याने लोक हरिश्चंद्रगडावर जाण्यासाठी या वाटेने जातात.

 

नळीची वाट : सर्वात अवघड आणि चित्त थरारक दुर्ग भ्रमंती करण्यासाठी योग्य असणारी अशी ही वाट आहे. नळीची वाट बेलपाड्यातून हरिशचंद्रगडावर जाते. ठाणे जिल्ह्याच्या बाजूने असणाऱ्या या वाटेने गडावर येण्यासाठी जास्त कठीण वाट आहे. सावर्णे - बेलपाडा असा घाटमार्ग चढून गडाकडे यावे लागते. या मार्गे येण्यासाठी कल्याण - मुरबाडमार्गे माळशेजघाट चालू होण्यापूर्वी, सावर्णे गावातून ‘बेलपाडा' या कोकणकड्याच्या पायथ्याच्या गावात यावे लागते. येथून कड्यातून असलेल्या साधले घाटाच्या साहाय्याने कोकणकड्याच्या पठारावर येता येते. या वाटेला ‘नळीची वाट' म्हणतात.


पाचनईकडील वाट : हरिश्चंद्रगडावर जाण्याची एक वाट पाचनईमार्गे अहमदनगर जिल्ह्याच्या बाजूने आहे. यासाठी मुंबई -नाशिक रस्त्यावरील घोटी या गावी उतरावे. तिथून संगमनेर मार्गावरील राजूर या गावी आल्यानन्तर, राजुर -पाचनई अशी बस आहे. पाचनई हे गडाच्या पायथ्याचे गाव असून येथून गडाकडे जाणारी वाट फार सोपी आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इतर किल्यांप्रमाणे हा किल्ला देखील आदिवासी कोळी महादेव समाजाकडेच होता. त्यामुळे आजही महादेव कोळी समाजाचे आदिवासी लोक या परिसरात दिसून येतात.

 

हरिश्चंद्र गडाचा इतिहास : हरिश्चंद्र गडाला पौराणिक इतिहास आहे. तसेच मुघल आणि मराठ्यांच्या समकालीन इतिहास देखील आहे. साडे तीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या हरिश्चंद्र गडाचा उल्लेख प्राचीन अग्नि पुराणात आणि मत्स्य पुराणात आहे. मोगल आणि कोळी महादेव यांच्या संघर्षात आदिवासी कोळी महादेव समाजाकडून हा किल्ला मोगलांनी घेतला आणि त्यानंतर इ. स. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला. आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.


हरिश्चंद्र, तारामती आणि रोहिदास अशी येथील शिखरांची नावे असल्यामुळे या किल्ल्याचा संदर्भ राजा हरिश्चंद्रापर्यंत स्थानिक दंतकथांनी जोडला आहे. हरिश्चंद्र गडावरील लेण्यांत चांगदेवांनी तपश्चर्या केली होती, असे ही काही दंत कथानुसार सांगण्यात येते.

 

हरिश्चंद्र गडाचे ऐतिहासिक महत्त्वसह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत हरिश्चंद्रगड हा वेगळा आहे. इतर किल्ल्यांप्रमाणे येथे तटबंदी नाहीत. परंतू या अजस्त्र डोंगरावर काही प्राचीन लेणी आहेत.तसेच शालिवाहन काळातील शिव मंदिर आहे.

 

हरिश्चंद्र गडावरून जुन्नरच्या दिशेस शिवनेरी, हडसर, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र आणि सिद्धगड हे किल्ले दिसतात. या गडावर किल्ल्याचे केवळ अवशेष आहेत. काही मंदिरे आहेत. लेण्या आहेत. पाण्याचे टाके आहेत. परंतु या परिसरातील निसर्गाचे सौंदर्यच आपले मन प्रसन्न करते.

 


हरिश्चंद्र गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे :

तोलार खिंड : हरिश्चंद्रगडाचा डोंगरमाथा विस्तीर्ण असल्यामुळे तो पायथ्यापासून भव्य दिसतो. त्याच्या पूर्व बाजूस इंग्रजी 'यू' आकाराची एक खिंड आहे. ही खिंड म्हणजेच प्रसिद्ध तोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या मध्यावर आहे.

 
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर : तारामती शिखराच्या उत्तर बाजूस लेणी कोरलेली आहे. याठिकाणी हे मंदिर आहे. मंदिर परिसरात चार खांब आहेत. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. मंदिराच्या समोर नंदी आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या एका बाजूस पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. ही केदारेश्वर लेणी म्हणजे महादेवाची पिंड. येथे खूप मोठी पिंड आहे.

 
कोकणकडा : हरिश्चंद्र गडावरील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे गडाच्या एका बाजूस असलेला कोकणकडा होय. कोकण कड्याच्या परिसरात वातावरण स्वच्छ असेल, तर येथून कल्याणच्या खाडीपर्यंतचा प्रदेश दिसतो.


तारामती शिखर : तारामती शिखर हे हरिश्चंद्र गडावरील सर्वात उंच शिखर आहे. या शिखराच्या खाली कोरीव लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची मूर्ती आहे. या गणेश गुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. गणेश गुहेकडून शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. तसेच शिखराच्या माथ्यावर शिवलिंगे आहेत.

 

डोंगराच्या कपारीत कोरलेल्या विविध लेण्या, काही उभारलेल्या लेण्या, मंदिरे तसेच चित्तथरारक गडाची वाट यामुळे एकूणच हरिश्चंद्र गडाची दुर्गभ्रमंती आपल्या कायम लक्षात राहते. परतीच्या प्रवासाला येताना गडावरील निसर्ग सौंदर्य आणि प्रवासातील चित्त थरारक चढणीचे अनुभव घेवून आपण खाली उतरतो. त्यावेळचा आनंद आपण खूप काही वेगळं केलं आहे, अशा आशयाचा असतो. त्यामुळे चित्तथरारक दुर्गभ्रमंतीचा अनुभव घ्यायचा असेल तर हरिश्चंद्र गडाची भ्रमंती नक्की करावी.

 

- नागेश कुलकर्णी

नागेश कुलकर्णी

इंजिनियरिंग (E&TC ) शिक्षण पूर्ण. एम.सी.जे चा डिप्लोमा. चालू घडामोडींवर लिखाण, विशेष  करून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर सविस्तर लिखाण. चाणक्य मंडल परिवारच्या साप्ताहिक स्वतंत्र नागरिक आणि मासिकासाठी लिखाण केलेले आहे.
तसेच उत्तम कवि, फोटोग्राफर, दुर्ग पर्यटक आणि अभ्यासक.