विनाशाचे भोई

    26-Jul-2017   
Total Views |
 

 
 
पावसाळ्यात आसाममध्ये दरवर्षी पूर येतो. अपरिमित हानी होते. ईशान्य भारताचा भूगोल आणि अतिवृष्टी याला कारणीभूत आहेतच, पण गेल्या काही दशकातले मानवी कर्तृत्वही यास तितकेच जबाबदार आहे. ज्या फांदीवर बसलोय तिच्यावरच घाव घालण्याची वृत्ती दरवर्षी होणार्‍या भीषण विनाशाला कारणीभूत ठरते. दुर्दैवाने हे रोखण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न फुटकळ म्हणावे इतपतही नाहीत.
 
आसाममध्ये पुराचे थैमान सुरू आहे. गेल्या काही वर्षांतला हा सगळ्यात भीषण पूर असल्याचे आकडेवारी सांगते. राज्याच्या ३२ पैकी २६ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. १७ लाख लोक प्रभावित झाले आहेत. बळींचा आकडा ७६ सांगितला जात असला तरी प्रत्यक्षात किती जण प्राणाला मुकले याची निश्चित संख्या सांगणे अशक्यच आहे. पूर ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात साथीचे रोग पसरतात. त्यातही हजारो दुर्दैवी जीव भरडले जाणार आहेत. निसर्गाचे हे तांडव आसामला नवे नाही. दरवर्षी ते रौद्र रूपात प्रकटते. हा पूर मानवनिर्मित नाही, पण दरवर्षी वाढणार्‍या पुराच्या भीषणतेचे श्रेय मात्र निश्चितपणे मानवी हव्यासालाच द्यावे लागेल.
 
अरुणाचल आणि नागालँडमध्ये पडलेला प्रचंड पाऊस हे यंदा आसाममध्ये आलेल्या पुराचे महत्त्वाचे कारण आहे. संपूर्ण ईशान्य भारत हा पर्वतीय प्रदेशात वसलेला. मेघालय, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही राज्ये पहाडी आहेत. तुलनेने आसाममध्ये मोठ्या प्रमाणात सखल मैदाने आहेत. जेव्हा शेजारच्या पहाडी राज्यात प्रचंड पाऊस पडतो, तेव्हा ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्या पावसात दुथडी भरून वाहू लागतात. पाण्याचे लोट प्रचंड वेगाने आसाममध्ये शिरतात. या पाण्याचा निचरा करण्यासाठी निसर्गाने बर्‍याच तरतुदी करून ठेवल्या आहेत. पण आसाममध्ये पाण्याच्या निचर्‍यासाठी अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाने पाचर मारून ठेवली असल्यामुळे पुराची समस्या बिकट होते.
 
विकासाच्या नावाखाली ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात मोठ्या प्रमाणात अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे करण्यात आली. दलदलीच्या जमिनींवरही अतिक्रमण झाले. दलदलींमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेण्याची क्षमता असते. दलदलीत भराव टाकल्यामुळे स्वाभाविकच जमिनीत पाणी जिरण्याची प्रक्रिया बंद झाली. वाहत्या पाण्याला अडथळे निर्माण झाल्यामुळे पुराची समस्या अधिक गंभीर झाली. रेल्वेमार्ग आणि रस्त्यांवरील पर्जन्यवाहिन्यांचा अभाव, नियोजनशून्य बंधारे आणि धरणे अशी अनेक कारणे या पुराला तितकीच जबाबदार आहेत. गेल्या काही वर्षांत ईशान्य भारतात झालेल्या जंगलतोडीमुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे. जंगलतोडीमुळे मातीचे छत्र हिरावले. त्यामुळे पूरपरिस्थितीत मातीचा कसदार थर पाण्यासोबत वाहून जातो. ही माती नदीच्या पात्रात साचल्यामुळे नदीचे पात्र विस्तारत चालले आहे. ईशान्य भारतात गेल्या काही दशकात झालेल्या या जंगलतोडीचे वर्णन ‘क्रूर’ आणि ‘अमानवी’ असेच होऊ शकते. त्यातच जंगले साफ करण्याची ही प्रक्रिया नियोजनशून्य विकासामुळे अधिक वेगवान झाली आहे.
 
तशी जंगलतोडीची कारणे बरीच आहेत. आसाममध्ये नॉर्थ काचार हिल्स आणि कार्बी अलॉंग हे दोन वनवासी जिल्हे आहेत. या जिल्ह्यात राहणारे वनवासी बांधव गेली कित्येक दशके फिरती शेती करतात. स्थानिक भाषेत या पिढीजात शेतीला ’झूमशेती’ म्हणतात. जंगलतोड करून जमीन साफ करायची. सपाटीकरण करून तिथे शेती करायची. एका पट्ट्यावर २० ते २५ वर्षे शेती केल्यानंतर पुढे सरकायचे, नवे जंगल साफ करायचे. वाढती लोकसंख्या आणि जमिनीचा खालावलेला कस या कारणांमुळे अलीकडे जमिनीचा पट्टा बदलण्याची प्रक्रिया चार ते पाच वर्षांतच केली जाते. त्यामुळे जंगलतोडीचे प्रमाण वाढले आहे. सुदैवाने निसर्गाची ही हानी मोजण्यासाठी सध्या उपग्रहांचा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे आपण निसर्गाची किती हानी केली आणि मानवजातीसाठी किती खोल खड्डा खणला, याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. ‘आसामरिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर’ने सॅटेलाईट मॅपिंग तंत्राचा वापर करून केलेल्या सर्वेक्षणात कार्बी अलॉंग जिल्ह्यातील ४ लाख २३ हजार ८८५ हेक्टर जमिनीपैकी ६,८४४ हेक्टर आणि नॉर्थ काचार हिल्समधील २ लाख, ९२ हजार, ३०३ हेक्टर जमिनीपैकी ७,९३८ हेक्टर जमीन फिरत्या शेतीमुळे साफ झाल्याचे उघड झाले आहे. कार्बी अलॉंग जिल्ह्यातील कोळसा खाणींचा चोरटा व्यवसाय, सिमेंट कारखान्यांसाठी लागणार्‍या चुनखडीचे उत्खनन हे देखील जंगलाच्या मुळावर आलेले आहे. पेपर मिल्सना कच्चा माल पुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड करून बांबूची लागवड सुरू आहे. त्रिपुरामध्ये जशी रबराची लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगले साफ करण्यात आली, तसाच हा प्रकार.
 
लाकूडतोड आणि प्लायवूडच्या कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू आहे. यामुळे १९७५ ते १९८२ या काळात ईशान्य भारतातील ६.४ कोटी हेक्टर जमिनीवरील जंगल नष्ट करण्यात आल्याचे ‘आसामरिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर’चा अहवाल सांगतो. चहाच्या मळ्यांच्या विस्तारासाठी बेसुमार जंगलतोड केली जाते. नवे रस्ते, कारखाने यांच्यासाठी जागा निर्माण करण्याच्या नादात जंगलेच्या जंगले उद्ध्वस्त केली जातात. परंतु, तोडलेले जंगल नव्याने निर्माण करण्यासाठी मात्र कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. आसामच्या नागालँड, मेघालय, अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असून १२ टक्क्यांपर्यंत हे प्रमाण गेल्याचे आकडेवारी सांगते. आसाममध्ये डोंगरांचे कातळ कणखर नाहीत. उत्तराखंडसारखे ते ठिसूळ आहेत. ही जमीन धरून ठेवण्याचे कामवृक्ष करतात. परंतु, मातीचे हे कवच गेल्या काही दशकात वेगाने नष्ट होते आहे. जंगलांचा नाश झाल्यामुळे ब्रह्मपुत्रेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ जमा होतो. त्यामुळे ब्रह्मपुत्रेचे पात्र दरवर्षी विस्तारत जाते. परिणामी, आसामची पूरपरिस्थिती वर्षागणिक अधिक भीषण रुप धारण करत असल्याचे दुदैवी चित्र पाहायला मिळते. कधी नव्हे ते यंदा लखीमपूर येथे पुराचे चार फूट पाणी साचले आणि दरवर्षी पुराचे पाणी अशी नवनवी जमीन पादाक्रांत करते आहे. ब्रह्मपुत्रेच्या प्रलयात आसाममध्ये होत असलेले मृत्यूचे तांडव काळजाला चटका लावणारे आहे. आसाममध्ये येणारे हे पूर थांबवता येणार नाहीत कदाचित; पण ते विनाशकारी होणार नाहीत याची काळजी घेणे शक्य आहे. त्यामुळे धडा घेण्यासाठी प्रत्येक वेळा विध्वंस होण्याची प्रतीक्षा आपण का करायची?
 
- दिनेश कानजी
 
 

दिनेश कानजी

गेली १७ वर्षे पत्रकारितेचा व्यापक अनुभव, महाराष्ट्र भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘मनोगत’मधून कारकिर्दीची सुरुवात. त्यानंतर दै. ‘सामना’, दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’, दै. ‘पुढारी’मध्ये कामाचा दांडगा अनुभव. नोकरीचा राजीनामा देऊन सध्या स्वतंत्रपणे लिखाण. पत्रकारिता करताना सिनेमा, महापालिका, गुन्हेगारी, राजकारण अशा विविध बीटचे काम. ‘शोध पत्रकारिता’ हा त्यांचा पिंड. नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘त्रिपुरातील अराजकाचा लाल चेहरा- माणिक सरकार’ या पुस्तकातून त्रिपुरातील कम्युनिस्ट सरकारच्या कारभाराची पोलखोल.