दुर्ग भ्रमंती : किल्ले हरिहर

    21-Jul-2017   
Total Views |


 

पायथ्यापासून उंचच उंच दिसणारा कातळकडा आणि पायऱ्या, म्हणजे किल्ले हरिहर. उंच कातळकडा आणि दुर्ग भ्रमंतीचा थरार यांचा अनुभव घ्यायचा असेल तर, किल्ले हरिहर हे भ्रमंती करणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी पर्यायी ठिकाण आहे. किल्ले हरिहरचं वैशिष्ट्य म्हणजे, या किल्ल्यावरजाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.

किल्ले हरिहरच्या पायथ्याशी ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे, त्यामुळे हरिहरगड हा ‘हर्शगड’ या नावाने देखील ओळखला जातो. हरिहरगडाचा आकार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, किल्ल्यावरील गुहा आणि अवशेष हे इतर किल्ल्यांच्या तुलनेत वैविध्य दाखवणारे आहेत. त्यामुळेच किल्ले हरिहरवर भ्रमंतीसाठी येणाऱ्या दुर्ग प्रेमींची संख्या प्रमाणत अधिक असते.

नाशिक जिल्ह्यातील सेलबारी -डोलबारी रांग, अजंठा रांग, त्र्यंबक रांग या डोंगर रांगादरम्यान काही गडकिल्ले आहेत.त्यामध्ये हरिहर हा किल्ला त्र्यंबक रांगेतील प्रमुख किल्ला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी कसारा घाटमार्गे नाशिकला आल्यानंतर खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावरील "निरगुड पाडा" या गावामधून किल्ले हरिहरकडे जाण्यासाठी वाट आहे. निरगुड पाडा हे गाव किल्ले हरिहर आणि भास्करगडच्या पायथ्याशी आहे.

कसारा घाट किंवा नाशिक मार्गे : कसारा घाट किंवा नाशिकमार्गे इगतपूरीला आल्यानंतर, इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. येथून पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी वाट आहे.

इगतपूरी -त्र्यंबकेश्वर -खोडाळामार्गे : निरगुडपाडा गावाच्या  पुढे कासुरली नावाचे गाव आहे. इगतपूरी –त्र्यंबकेश्वर -खोडाळा रस्त्यावरील कासुरली गावापर्यंत पोचण्यासाठी एस. टी. बस आहेत. कासुरली गावातून हर्षेवाडी गावाच्यामार्गे किल्ल्यावर पोहचता येते.

 

किल्ले हरिहरचा इतिहास : इतिहासातील नोंदीनुसार समुद्र किनाऱ्यावरील बंदरांच्या माध्यमातून व्यापार करणारे व्यापारी घाट मार्गांनी नाशिक आणि लगतच्या बाजारपेठेशी व्यापार करत असत. यामध्ये त्र्यंबक डोंगररांगेतून जाणार्‍या गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी किल्ले हरीहर आणि भास्करगडाची उभारणी करण्यात आली होती. 

किल्ले हरिहर प्राचीन काळात बांधलेला किल्ला आहे. काही काळ अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात हा किल्ला होता. परंतु इ. स. १६३६ साली शहाजी राजांनी हा किल्ला जिंकून घेतला. परंतु त्यानंतर या किल्ल्यावर मोगलांनी ताबा मिळवला. इतिहासातील नोंदीनुसार इ. स. १६७०साली मोरोपंत पिंगळे यांनी किल्ले हरिहर जिंकून घेतला. शेवटी इ. स. १८१८ साली किल्ले हरिहर मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.कंपनी सरकारचे इंग्रज अधिकारी किल्ले हरिहरच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळी इंग्रज अधिकारी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या वाटा आणि प्रवेशद्वार यांना तोफा लावून उद्ध्वस्त करत असत. परंतु किल्ले हरिहरच्या पायऱ्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी काहीच इजा केली नाही. यावरून या पायऱ्यांचे महत्व आणि आकर्षण किती जास्त प्रमाणात होते, हे लक्षात येते.

 

किल्ले हरिहर वरील पहाण्यासारखी ठिकाणे :

अनगड देव निरगुडपाडा गावामधून किल्ले हरिहरच्या पायथ्याशी आल्यानंतर, पठारावर अनगड देव आहेत. हा अनामिक देवतांचा दरबार आहे,असे म्हणतात. या ठिकाणी शेंदूर लावून ठेवलेले अनगड देव आहेत. स्थानिक लोकांचे हे श्रद्धास्थान आहे. 

 

किल्ले हरिहरचा कातळ डोंगर : अनगड देवच्या पठारापासून पुढे गेल्यानंतर आपण किल्ले हरिहरच्या कातळ डोंगराच्यापायथ्याशी पोहचतो. किल्ल्याच्या पायथ्यापासून कातळ डोंगराकडे पाहताना तो खूप उंचच उंच दिसतो. उन्हाळ्यामध्ये याठिकाणी दुर्ग भ्रमंती करत असताना थोडीशी काळजी घ्यावी लागते. परंतु पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये वातावरण  किल्ला सर करण्यास अनुकूल असते.

 

किल्ले हरिहरच्या पायऱ्या किल्ले हरिहरच्या पायथ्यापासून किल्ल्याकडे पाहताना काळ्या कातळात एका पाठोपाठ एक कोरलेल्या पाय-यादिसतात. काळ्या दगडी कातळात कोरलेला जिन्याचा हा मार्ग एका वेळी एकच व्यक्ती वर चढू शकेल इतका अरुंद आहे. त्यामुळे एकावेळी एकच व्यक्ती वरती चढत असताना काळजीपूर्वक वाटचाल करावी लागते. शेवटी साधारणत: शंभर पायऱ्या चढल्यानंतर  आपण किल्ले हरिहरच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहचतो.

 

किल्ले हरिहरचे प्रवेशद्वार कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर येत असताना किल्ले हरिहरचे पहिले प्रवेशद्वार आणि त्याच्या दोन्ही बाजूस बुरूजदिसतात. किल्ल्याच्या या प्रवेशद्वाराशेजारी गणपतीची एक मूर्ती आहे.

 

किल्ले हरिहर : प्रवेशद्वारापासून वाट काढत पुढे गेल्यानंतर कातळात कोरलेले दोन दरवाजे दिसतात. या दरवाज्यामधून पुढे गेल्यानंतरपायऱ्यांचा दगडी जिना आहे. या जिन्याच्या दोन्ही बाजूस हाताचा पंजा रुतविण्यासाठी खोबण्या आहेत. या खोबण्यांच्या मदतीने जिना चढूनआपण शेवटी मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहचतो. किल्ले हरिहरचा हा शेवटचा दरवाजा पार करून थोडे पुढे गेल्यानंतर गुहा आणि गडाच्या सदरेचे अवशेष आहेत.

 

तलाव : किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि एक तलाव आहे. पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या या तलावाजवळ मारुतीचे आणि महादेवाचे छोटे मंदिर आहे. 

 

टेकडी : किल्ले हरिहरवर सर्वात उंच अशी एक टेकडी आहे. या टेकडीच्या माथ्यावरून परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. या टेकडीवरून वाघेरा, वैतरणा तलाव आणि त्र्यंबकगड दिसतो.

 

वेताळ मंदिर किल्ले हरिहरवरती एक वेताळ मंदिर आहे. तसेच इतर हि देव देवतांची विविध मंदिरे आहेत. 

 

किल्ला पाहून परतीच्या वाटेला येत असताना आपणास काळजीपूर्वक उतरावे लागते. एकूणच कातळ कड्यामध्ये कोरलेल्या पायऱ्यांच्या भ्रमंतीचा थरार अनुभवून परत येत असताना, किल्ले हरिहरच्या परिसरातील निसर्ग सौंदर्य अनुभवता येते. आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यास इच्छुक असणाऱ्या दुर्ग प्रेमींसाठी किल्ले हरिहर एक प्रकारे पर्वणीच आहे. परंतु दुर्ग प्रेमींनी दुर्ग भ्रमंती करत असताना, ज्या किल्ल्यावर आपण भ्रमंतीसाठी जाणार आहोत, त्या किल्ल्याचा पूर्व इतिहास अभ्यासूनच किल्ल्यावर जाणे सोयीचे आहे. पुर्वोइतिहस माहिती असेल तर, आपण त्या किल्ल्यावर गेल्यानंतरतो अनुभवू शकतो. 

 

 

नागेश कुलकर्णी

इंजिनियरिंग (E&TC ) शिक्षण पूर्ण. एम.सी.जे चा डिप्लोमा. चालू घडामोडींवर लिखाण, विशेष  करून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर सविस्तर लिखाण. चाणक्य मंडल परिवारच्या साप्ताहिक स्वतंत्र नागरिक आणि मासिकासाठी लिखाण केलेले आहे.
तसेच उत्तम कवि, फोटोग्राफर, दुर्ग पर्यटक आणि अभ्यासक.