रायगड भाजपमध्ये विजिगीषू वृत्ती वाढते आहे

    18-Jul-2017   
Total Views | 12
 

 
 
नव्याने स्थापन केलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या पहिल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक असे स्पष्ट बहुमत मिळवत विजय नोंदवला. या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे पनवेलचे आमदार व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष प्रशांत ठाकूर यांची दै. ’मुंबई तरुण भारत’चे विशेष प्रतिनिधी निमेश वहाळकर यांनी घेतलेली ही विशेष मुलाखत.
 
 
 
पनवेलच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक यश संपादन केले. या पालिकेतील भाजपच्या पहिल्या महापौर डॉ. कविता चौतमल यांची निवड पक्षाने नेमक्या कोणत्या आधारावर आणि हेतूने केली आहे?
 
पनवेलच्या पहिल्या महापौर डॉ. कविता चौतमल व्यवसायाने डॉक्टर आहेत. आज ज्या पद्धतीने या शहराचा विस्तार होतो आहे ते पाहता पालिकेच्या पहिल्या अडीच वर्षांमध्ये महापालिकेला अनेक आव्हानांना सामोरे जायचे आहे. या काळात नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी महापालिकेने स्वतःहून प्रयत्न करणे, ते प्रयत्न सिडको किंवा अन्य विभागांशी उत्तमसमन्वयाने करून घेणे यासाठी सुशिक्षित, व्यावसायिक अनुभव असलेल्या महापौरांना समंजसपणे कामकरता येईल, असे मला वाटते. जास्तीत जास्त वेळ त्या या कामाला देऊ शकतील व नागरिकांच्या अपेक्षा त्यांना पूर्ण करता येतील, या हेतूने पक्षाने त्यांची निवड केली. काही दिवसांपूर्वीच त्यांची महापौरपदी निवड झाली आहे. यानंतरच्या कालावधीत त्या सर्व प्रक्रिया समजून घेत आहेत. आता समित्यांच्या निवडणुकाही लवकरात लवकर होणे अपेक्षित आहे.
 
 
पनवेल मतदारसंघाचे तुम्ही आमदार आहात, पालिकेत भाजप बहुमतात सत्तेत आहे आणि केंद्रात व राज्यातही भाजप सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे ’पंचायत टू पार्लमेंट’ भाजपचे धोरण पनवेलमध्ये अंमलात आले आहे. या गोष्टीचा फायदा घेऊन, एकत्रित समन्वयातून पनवेलसाठी कोणत्या नव्या गोष्टी केल्या जाऊ शकतात असे वाटते?
 
   
आम्हा सगळ्यांसाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे की, आज पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी व राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या व्यक्ती कामकरीत आहेत. ही केंद्र व राज्याची ताकद पनवेलच्या नव्या महानगरपालिकेच्या पाठी उभी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. लोकप्रतिनिधींनी कसे कामकेले पाहिजे याचा आदर्श वस्तुपाठ पंतप्रधान व मुख्यमंत्री आज प्रत्येक दिवशी आपल्या आचरणातून आमच्यासमोर ठेवत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे निर्णय घेतात, त्याचा सातत्याने फॉलोअप घेतात व सर्वसामान्य लोकांनाही त्याबाबत विश्वासात घेतात. वेगवेगळ्या पद्धतीने उदा. मुख्यमंत्री मित्रसारख्या कल्पना, मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रम, शासकीय योजनांवर लोकांचे अभिप्राय जाणून घेणारी अनुलोमसारखी संस्था, शिवाय सोशल मीडियावरील जनसंपर्क यातून मुख्यमंत्री जनतेशी जोडलेले आहेत. पनवेल पालिकेच्या नव्या नगरसेवकांना, महापौरांना व इतर सहकार्‍यांना यातून नक्कीच बोध घेता येईल. मुख्यमंत्र्यांनी स्वतः निवडणुकीच्या दरम्यान पनवेलमध्ये येऊन आम्हाला आश्वस्त केले असल्याने नक्कीच पनवेलसमोरील अडचणी सोडविण्यासाठी आम्हाला केंद्र व राज्याचे भक्कमपाठबळ मिळेल, असा आमचा विश्वास आहे. 
 
 
पनवेल शहर व परिसराच्या विस्ताराला आणि नियोजित विकासाला अद्याप संधी आहे, कारण मुंबईचे बकालपण अद्याप पनवेलला आलेले नाही. त्यामुळे पनवेलच्या भविष्यकालीन वाटचालीत पनवेलची काही स्वतंत्र ओळख असू शकेल की, या प्रदेशातल्या इतर शहरांसारखेच मुंबईलगतचे एक निवासी उपनगर एवढीच त्याची ओळख राहील?
 
 हा अतिशय चांगला प्रश्न आहे. पनवेल कर्नाळा अभयारण्याच्या जवळचे शहर आहे. प्रबळगडही जवळच आहे. पांडवकडा धबधब्याचीही ओळख पनवेलमध्ये सांगितली जाते. शिवाय पनवेल हे मुंबई-पुणे व कोकण-गोवा मार्गावरील महत्त्वाचे वाहतूक केंद्र आहे. पनवेल झपाट्याने वाढत असताना या शहराच्या नियोजित विकासासाठी शहराचा डीपी अर्थात विकास आराखडा लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. तो बनवत असताना तुम्ही म्हटल्याप्रमाणे केवळ सिमेंटचे जंगल उभे राहणार नाही ना याचीही खबरदारी घ्यावी लागेल. सर्व राखीव जागांची आरक्षणे पालिकेत नव्याने जोडलेल्या ग्रामीण भागातच जाणार नाहीत, हेही पाहावे लागेल. पनवेलला आता आंतरराष्ट्रीय विमानतळही होत आहे. या सर्व गोष्टींचे भान राखून नियोजन करत असताना दुसरीकडे शहराची स्वतंत्र ओळख निर्माण होणे हे इथल्या पायाभूत सुविधांप्रमाणेच इथे राहत असलेल्या व्यक्तींवरही अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर येथील आम्ही स्थानिक राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कामकरणारे लोक जसे कामकरू तशीच या शहराची ओळख बनत जाईल.
 
 
झोपडपट्टी व अनधिकृत बांधकामांबाबत पनवेलमध्ये काय धोरण असायला हवे असे वाटते?
 
पनवेल मुख्य शहराच्या भागात झोपडपट्‌ट्यांचे प्रमाण जास्त आहे. इतर भागात तुलनेने ते कमी आहे. या वसाहतींचे पुनर्वसन लवकरात लवकर व्हायला हवे आणि नव्या झोपडपट्‌ट्या वसवण्यास बंदी केली पाहिजे. सर्वच राजकीय पक्षांची ही जबाबदारी असून अशा झोपडपट्‌ट्यांना संरक्षण देणे, केवळ मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहणे, त्यांना अनधिकृतरित्या सुविधा पुरवणे आदी प्रकार त्यांनी बंद केले पाहिजेत. भारतीय जनता पक्ष सातत्याने याबाबत आग्रही राहिला असून ज्यावेळी कठोरपणे कारवाया करण्याची वेळ येईल, त्यावेळी आमचा पक्ष प्रशासनाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. अनधिकृत बांधकामांच्या बाबतीतही आमची हीच भूमिका आहे. झोपडपट्टी अनधिकृत बांधकामांच्या बाबतीतही हे कठोर धोरण राबवल्यासच पनवेल शहर अतिक्रमण व अनधिकृत बांधकाममुक्त राहू शकेल. 
 
 
परंतु यामध्ये गुंतलेले विविध आणि सर्वपक्षीय स्थानिक राजकीय हितसंबंध लक्षात घेता अशी कठोर भूमिका भाजप व भाजप सत्तेत असलेली महापालिका घेऊ शकेल काय?
 
जेव्हा शहर नव्याने निर्माण होत असते, त्यावेळेसच असे कठोर निर्णय घेणे अधिक सोपे असते. जसे लहान मुलांच्या बाबतीत त्यांच्या संस्कारक्षमवयात केलेले संस्कार पुढे दीर्घकाळ टिकतात तसेच पनवेलचेही हे संस्कारक्षमवय आहे. आम्हाला आनंद आहे की, डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासारखे अधिकारी महापालिकेला मिळाले आहेत. जे प्रसंगी सुट्टीच्या दिवशीही कामावर येतात, सतत या शहराच्या हिताचाच विचार करत असतात. त्यांच्या मदतीने आम्ही शहराला काही चांगल्या सवयी लावल्या आणि आम्ही स्वतःलाही त्या लावून घेतल्या तर पुढे हा त्रास होणार नाही आणि शहर अतिक्रमणमुक्त बनू शकेल. 
 
 
आपण डॉ. सुधाकर शिंदेंचा उल्लेख केलात. तुमच्या शेजारच्याच नव्या मुंबईच्या महापालिकेतील आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी असा नुकताच झालेला वाद पाहता पनवेलमध्ये याबाबत काय परिस्थिती आहे?
 
डॉ. सुधाकर शिंदे हे नगरविकास खात्यातील अनुभवी अधिकारी आहेत. महापालिकेच्या निर्मितीपासून या सर्व प्रक्रियेत शिंदेंचा सहभाग राहिलेला आहे. त्यामुळे पनवेल शहराविषयी त्यांना आस्था आहे. त्यामुळे मला त्यांच्या सहकार्याविषयी विश्वास वाटतो. कोणत्याही अधिकार्‍याने प्रशासकीय कामात झोकून देणे आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्याचसोबत लोकप्रतिनिधीही लोकशाहीच्या रथाचीच चाके आहेत. हे लक्षात घेऊन त्यांना सोबत घेणे, विश्वासात घेणे, आवश्यक तिथे समज देणे इ. व्हायला हवेच पण हे करत असतानाच त्यांचे महत्त्व कमी न लेखण्याचीही खबरदारी घेतली जायला हवी. डॉ. सुधाकर शिंदे यांचा याबाबतीत आतापर्यंतचा दृष्टिकोन अत्यंत सकारात्मक आहे आणि तो यापुढेही राहील, अशी मला आशा आहे.
 
पनवेलमधील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत आहे. या समस्येबाबत काय उपाययोजना आहेत?
 
 पनवेलच्या विकास आराखड्याप्रमाणेच वाहतूक आराखडा बनायला हवा. विशेषतः आधीच्या नगरपालिकेच्या हद्दीत याची जास्त गरज आहे. तसेच शहरातून बाहेर पडत असतानाही याची गरज आहे. मग यामध्ये काही ठिकाणी सिग्नल्स उभारणे, वन वे करणे, उड्डाणपूल बांधणे आदी कामे होण्याची आवश्यकता आहे. शिवाय याला तंत्रज्ञानाची जोड देऊन, काही वेगळ्या गोष्टी राबवून, पुढील पंचवीस-तीस वर्षांचा विचार करून दीर्घकालीन उपाययोजना केल्यास शहरात आज हे विविध ठिकाणी बनत चाललेले बॉटलनेक्स कमी होऊ शकतील. 
 
 
रायगड जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यातील भाजपचे स्थान याचे जिल्हाध्यक्ष म्हणून कसे विश्लेषण करता? 
 
आज जिल्ह्यात सगळ्या तालुक्यांत भाजपचे अस्तित्व आहे पण ते तितकेसे बळकट नाही. मुळात या जिल्ह्यात पूर्वापार शेतकरी कामगार पक्ष रुजलेला आहे. शिवाय वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीनेही इथे अस्तित्व निर्माण केले आहे. जिल्ह्याच्या दक्षिण भागात कोकणातील चाकरमान्यांमुळे शिवसेनाही थोडीफार रुजली आहे. भाजपही वाढला तरी युतीमुळे शिवसेना युतीत बर्‍याच ठिकाणी प्रमुख पक्ष राहिल्यामुळे निवडणुकाही शिवसेनेने जास्त लढवल्या. दीर्घकाळ निवडणुका न लढविल्याने ठराविक अपवाद वगळता भाजपचा जनाधार व संघटन जिल्ह्यात उभे राहू शकले नाही. आज केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असताना गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ आदी भाजपचे वर्चस्व असलेल्या राज्यांप्रमाणेच आता महाराष्ट्रातही संघटनेच्या जोरावर व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या सक्षमनेतृत्वाखाली भाजप पुढे जातो आहे. प्रत्येक निवडणुकीत यश मिळते आहे. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्येही आता विजिगीषू वृत्ती निर्माण होऊ लागली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीत जरी फार मोठे यश मिळाले नसले तरी आधीपेक्षा चांगली कामगिरी झाली आहे. आम्ही कार्यकर्ते एवढ्यावर समाधानी नसून आणखी मोठ्या यशासाठी आमचा प्रयत्न आहे. आम्ही कुठे कमी पडतोय याचा विचार करतो आहोत. पक्षाने विस्तारक योजना राबवली असून त्यानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात विस्तारक जात आहेत. या सगळ्यातून स्थानिक कार्यकर्त्यांना बळ देऊन पक्षवाढीसाठी जे जे करावे लागेल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
 
 
आपण शेकापचा उल्लेख केलात. रायगड जिल्हा आजही शेकापचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आपणही आधी शेकापमध्ये होतात. शेकापच्या आजच्या जिल्ह्यातील अस्तित्वाविषयी, पक्षाची विचारधारा आणि प्रत्यक्ष वागणूक आणि भविष्य याबाबत काय वाटते?
 
आता ही प्रकट मुलाखत असल्याने शेकाप नेत्यांच्या प्रत्यक्ष वागणुकीबाबत सगळेच सांगणे तसे अवघड आहे, पण मुळात शेकापची वैचारिक चौकट कॉंग्रेसविरोधी आहे, पण मी २०१४ पूर्वी कॉंग्रेसचा आमदार राहिलेला असल्याने मी हे अनेकदा पाहिले आहे की बर्‍याच वेळा शेकाप वरिष्ठ नेत्यांनी कॉंग्रेस नेत्यांशी जुळवून घेतले आहे. स्वतःचे हितसंबंध जोपासण्यासाठी, कामे करवून घेण्यासाठी शेकापने नेहमीच सत्ताधारी कॉंग्रेसशी आतून चांगले संबंध ठेवले. भाजप नेत्यांशीही शेकापची जुनी मैत्री असली तरी आता स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपच्या विरोधात वागले पाहिजे, या भूमिकेतून शेकापची आजची धडपड आहे. मात्र, शेकाप आज जो काही टिकलेला दिसतोय तो शेकापची जि.प., पंचायत समित्यांमध्ये, सहकारी संस्थांमध्ये असलेल्या हुकूमतीच्या आधारे. सहकार एकदा एखाद्याच्या ताब्यात गेला की तो ताबा सोडत नाहीत हे केवळ रायगडमध्येच नाही तर राज्यातील उदाहरण आहे. रायगडमध्ये शेकापच्या आज अशा अनेक सहकारी संस्था ताब्यात आहेत. त्या हातातून जाऊ न देण्याइतपत व्यावहारिक शहाणपण शेकाप नेत्यांकडे आहे. या संस्था काही त्यांची खासगी मालमत्ता नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अशा संस्थांमध्ये शेकाप नेते इतर व्यक्तींना शिरकाव करू देत नसतील तर पर्यायी व्यवस्था उभी करण्याचा भाजपचा मानस आहे आणि आम्ही ती करूदेखील.
 
 
आता एक शेवटचा आणि थोडा वेगळा प्रश्न. २०१४ मध्ये तुम्ही कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलात. तुमच्याशी बोलत असताना तुम्ही कधीकाळी कॉंग्रेसचे आमदार होतात असे मुळीच वाटत नाही. उलट असे वाटते की तुम्ही आमदार होण्यापूर्वी जणू भाजप किंवा संघ परिवारातील संघटनात्मक कामात होतात. तशीच तुमची भाषा, देहबोली, कामकरण्याची पद्धत आहे. यामागचे नेमके रहस्य काय समजावे? 
 
मला कल्पना नाही की, हा असा असला तर तो कॉंग्रेसचा आणि असा असला तर भाजपचा किंवा संघ विचारांचा याबाबतचे नेमके ठोकताळे काय आहेत. संघ विचारांशी माझी अलीकडच्या काळात ओळख होत चालली आहे. मुळात कॉंग्रेसमध्येही मी व माझ्या वडिलांनी २००४ मध्येच प्रवेश केला होता. त्यापूर्वी शेकापच्या सततच्या कॉंग्रेससोबतच्या तडजोडीच्या भूमिकेमुळे मतभेद होऊन आम्ही शेकाप सोडून कॉंग्रेसमध्ये आलो, पण मला जसे माझे सहकारी सांगतात त्याप्रमाणे कदाचित यामागे असे एक कारण असू शकेल की, साधारणतः कॉंग्रेस कार्यकर्ता हा स्वतःचा विचार आधी करतो, मग पक्षसंघटनेचा. याउलट भाजपमध्ये प्रथमराष्ट्र, मग पक्षसंघटना मग सर्वात शेवटी मी स्वतः, अशी वैचारिक बैठक आहे. या विचारधारेवर माझे वडील रामशेठ ठाकूर व मी, आमचा पहिल्यापासूनच विश्वास आहे. याच विचाराने आम्ही आधीही कामकेले आहे व यापुढेही करत राहणार आहोत. त्यामुळे आम्ही संघटनशक्तीवर विश्वास ठेवणारे आहोत आणि भाजपचीही तीच बैठक असल्याने भाजपमध्ये कामकरताना एक वेगळीच मजा आहे आणि त्यामुळेच भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून पक्ष वाढवण्याची जबाबदारी सांभाळत असताना ही पूर्वीपासूनची वैचारिक बैठक मला खूपच उपयोगी पडणार आहे.
 
- निमेश वहाळकर

निमेश वहाळकर

सध्या मुंबई तरूण भारत मंत्रालय प्रतिनिधी म्हणून कार्यरत. मूळचे कोकणातील चिपळूण येथील रहिवासी. सर परशुरामभाऊ कॉलेज पुणे येथून पदवी (राज्यशास्त्र) तर रानडे इन्स्टिट्यूट (सा.फु. पुणे विद्या.) येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121