
कालच्या दिवशीची संध्याकाळ म्हणजेच १० जुलै २०१७ रोजी तमाम भारतीयांचे लक्ष सकाळपासूनच ‘बीसीसीआय’च्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाकडे लागून राहीले होते. अनेक वृत्तवाहिन्या किंवा वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर या घटनेसंदर्भाने घडणार्या अगदी घडामोडींचे ‘मिनिट टू मिनिट’ वार्तांकन केले जात होते. अखेर तो क्षण आला, सौरभ गांगुली अर्थातच क्रिकेटमधला ‘दादा’, व्ही. व्ही. एस लक्ष्मण आणि ‘बीसीसीआय’चे आणखी दोन पदाधिकारी भरगच्च अशा पत्रकार परिषदेस संबोधण्यात स्थानपन्न झाले. दादा काय बोलणार याचा साधारण अंदाज होताच पण औत्सुक्य होत ते केवळ औपचारिक घोषणेचं. पण नेमकं या उलटच झालं. दादाने अनपेक्षितरित्या उपस्थित पत्रकारांना आणि तमाम भारतीयांना आणखी थोडं ताणत, ‘बीसीसीआय’ला सध्या परिक्षक निवडीची कोणतीही घाई नाही. हा निर्णय दूरदृष्टीने घ्यावा लागणार आहे व त्यासाठी कर्णधार विराट कोहलीशी चर्चा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आता साधारण या घटनेला २४ तासांचा अवधी उलटून गेल्यावर असं अचानक काय घडलं की काल घाई नसणार्या ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट सल्लागार मंडळाने तडक रवी शास्त्री यांना प्रशिक्षक पदी नेमले असल्याचे जाहीर केले?
UPDATE: @RaviShastriOfc appointed as the Head Coach of the Indian Cricket Team till ICC World Cup 2019 pic.twitter.com/DwjEjRdFMd
— BCCI (@BCCI) July 11, 2017
या प्रश्नाचं उत्तर खरच दादाला देण्याची वेळ आली तर तो एवढच म्हणेल की, “काही गोष्टींचा थेट उलगडा करणे आम्हाला शक्य नसते. ‘बीसीसीआय’ने हा निर्णय घेतला आहे. यावर मी अधिक काहीही बोलू शकत नाही.’’ पण दादा भारतीय जनता किंवा थोडफार क्रिकेट जाणणार्या मंडळींसाठी यामागच सगळं राजकारण आणि भारतीय टीमचा भविष्याचा तुम्ही केलेला विचार या गोष्टी लपून राहण्यासारख्या नाहीत. या प्रकरणाचे खरे धागेदोरे मे २०१६ मध्ये आपल्याला सापडतात. त्यामुळे या प्रकरणावर प्रकाश टाकायचा असेल तर थोडं मागे जाऊन अभ्यास करायला लागेल.
नियुक्ती जम्बोची
अनिल कुंबळे. भारतीय क्रिकेटमधील एक यशस्वी नाव. कुंबळेने त्याच्या कारकिर्दित देशाला अभिमान वाटेल अशी खेळी केली. शिवाय तो त्याच्या छायाचित्रणासाठी देखील प्रसिद्ध आहे. ऑगस्ट २०१४ ते एप्रिल २०१६ या कालावधीत भारतीय संघातील माजी खेळाडू रवी शास्त्री यांनी संघाच्या ‘सीईओ’ पदाची जबाबदारी पार पाडली होती. त्यानंतर मे महिन्यात संघासाठी पूर्ण वेळ प्रशिक्षक नेमण्याच्या प्रक्रियेला वेग आला. अर्थातच त्यावेळी रवी शास्त्रीचे नाव अग्रस्थानी होते व विराटबरोबरच धोनीसोबतही त्याचे चांगले संबंध होते. पण याच काळात सौरभ गांगुली आणि शास्त्रीचे खटके उडाल्याने किंवा काही कारणास्तव तो या पदासाठी सक्षम नसल्याचे सांगुन क्रिकेट नियामक मंडळाने अनिल कुंबळेची प्रशिक्षक पदी निवड केली. या निवडीनंतर काही काळ हा वाद शमला असं वाटत होतं. सुरूवातीच्या काळात कुंबळे व टीममधील खेळाडूंविषयी चांगल्या बातम्या येत होत्या. परंतु अचानक काही महिन्यानंतर कुंबळे व कोहलीमधील वादाला तोंड फुटले. छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वाढत गेलेला हा वाद शिगेला पोहचला व अखेर चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर त्याचा विस्फोट झाला. हे कधी ना कधी होणारच होतं, पण ते अशा पद्धतीने पुढे येईल असं कधीही वाटल नव्हतं. विशेष म्हणजे विराट कोहली सोडल्यास आजपर्यंत ‘बीसीसीआय’मधल्या एकाही अधिकार्याने अनिल कुंबळेच्या आरोपांवर चकार शब्दही उच्चारला नाही, हे खरतरं क्रिकेट विश्वाचं दुर्देवच म्हणाव लागेल.
Thank you! pic.twitter.com/eF5qVzdBRj
— Anil Kumble (@anilkumble1074) June 20, 2017

‘विराट’हट्टापाई शास्त्रीबुवांचे पुनरागमन...
अनेक वर्षांपासून आपला पारंपारिक शत्रू असणार्या पाकिस्तानने यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा दारूण पराभव केला आणि संपूर्ण देशात एक शोकाकूल वातावरण पसरल. बर हे दु:ख पचवतोय न पचवतोय तोच कुंबळेच्या राजीनाम्याचे प्रकरण गाजू लागले. ‘हार्डकोर’ क्रिकेट चाहत्यांसाठी ही घटना खरोखरीच न रूचणारी होती. विराट कोहली हा एक खेळाडू म्हणून सर्वोत्कृष्ट असला तरी ज्या पद्धतीने त्याची सध्याची वागणूक आहे ती बर्याचदा खटकते. मैदानावरील त्याचा आक्रमकपणा, प्रतिस्पर्धांना तोंड वेडावून दाखवणे किंवा आताताईपणाने निर्णय घेणे या सगळ्या गोष्टी तो कॅमेरासमोर करतो तर ड्रेसिंगरूममध्ये त्याचा ‘अवतार’ काय असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी. म्हणजे कुंबळेची शिस्त पटली नाही म्हणून त्याला डावलणं आणि शास्त्रीचे स्वातंत्र्य हवेहवेसे वाटते म्हणून त्याची निवड करणं हे भविष्याच्या दृष्टीने तितकसं लाभदायक ठरणार नाही. बरं खरच कुंबळे म्हणतो तसं विराट ड्रेसिंगरूममध्ये वागला नसेल तर त्याने कुंबळेचं म्हणणं खोडून काढावं ना... त्यावर कोणी कुठल्याही प्रकारे भाष्य करीत नाही आणि थेट तुम्ही नवीन प्रशिक्षक नेमणूकीची प्रक्रिया सुरू करता, हे सौरभ, सचिन किंवा लक्ष्मण सारख्या माणसांकडून तरी भारतीय जनतेला अपेक्षित नाही.
निवड पूर्वनियोजितच होती...
अनिल कुंबळेनी राजीनामा दिल्यानंतरच्या सर्व घडामोडी पुन्हा एकदा कागदावर मांडल्या तर दादाने काल केलेल्या वक्तव्याला काहीच अर्थ उरत नाही. त्याच सगळ्यात महत्त्वाच कारण हे की, यंदाच्या प्रशिक्षक पदाच्या शर्यतीत कुंबळे राजीनामा देऊ पर्यंत शास्त्रीचं नाव कुठेही नव्हतं. विरेंद्र सेहवाग, टॉम मूडी व लालचंद राजपूत ही नाव अग्रस्थानी होती. कुंबळेनी राजीनामा दिल्यानंतर अचानक ‘बीसीसीआय’ने या पदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून घेतली व शास्त्रीबुवांनी ही संधी चांगल्या प्रकारे हेरली. आता ‘बीसीसीआय’ने केलेली मुदत वाढ इथपासूनच हे सगळ पूर्वनियोजित असल्याचे लक्षात येते. त्यानंतर शास्त्रीने अर्ज करणं, मग त्यांच्या मुलाखती होणं आणि एकंदरीत शास्त्रीच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार करणं हे सगळच ठरवून केलेलं होतं. याचा एकच आणि स्पष्ट अर्थ निघतो की, “आक्रमकतेपुढे शिस्तीचा पराजय झाला व इतिहासातील अद्वितीय खेळीपेक्षा बीसीसीआयला टीमचे भविष्य अधिक महत्त्वाचे वाटू लागले.’’

अर्थातच शास्त्रीमध्ये प्रशिक्षक होण्याची क्षमता नाही असं म्हणणं चुकीचं ठरेल, पण हे प्रशिक्षक पद बहाल करताना त्याच्या आजपर्यंतच्या खेळाचा, अनुभवाचा विचार कमी केला गेला असेल आणि त्याला विराट किंवा इतर खेळाडूंची असणारी पसंती ही अधिक प्रभावी ठरली असेल. अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील वाद अतिशय खालच्या थराला गेले असल्याने ‘बीसीसीआय’ला त्यातून ‘सेफ’ मार्ग काढण्यासाठी या निर्णयाचा अवलंब करावा लागला. आता शास्त्रीबुवांची झालेली ही निवड पुढील दोन वर्षांसाठी असून त्यांच्यापुढे २०१९ च्या विश्वचषकाचं मोठं आव्हान आहे. सध्याच्या भारतीय टीममधील सर्वच खेळाडू शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांचा खेळही उत्तम होत आहे, परंतु मैदानाबाहेरील अशा घडामोडींमुळे त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचे वेळोवेळी दिसून येत होते. शास्त्रींच्या पुनरागमनामुळे कदाचित खेळाडूंचे मानसिक स्वास्थ पुन्हा एकदा सकारात्मक दिशेने वळेल अशी आशा करू. आपल्या भारतीय संघाचा खेळ आत्तापेक्षा अधिक सुधारेल व पुन्हा एकदा विश्वचषकावर आपले नाव कोरले जाईल, हीच यानिमित्ताने ‘विराट’ अपेक्षा!
कुंबळेला फक्त एवढचं सांगण आहे की, शास्त्रींची निवड हा तुझा पराजय नसून हा सत्तेचा विजय आहे. ज्यांच्या हातात सत्ता असते ते अगदी सहजरित्या असे निर्णय घेण्यास भाग पाडतात आणि सध्या ‘बीसीसीआय’च्या सत्तेवर विराट कोहली नावाचा प्रभावी तारा बसला आहे. तो म्हणेल ती पूर्व दिशा या उक्तीप्रमाणे सध्या ‘बीसीसीआय’ला निर्णय घेण्याशिवाय गत्यंतर नाही कारण त्याच्याशिवाय चांगला पर्यायही टीमकडे सध्या उपलब्ध नाही. दोन्ही बाजू त्या-त्या ठिकाणी योग्य असल्या तरी काही गोष्टी मनाला न पटणार्या आहेत. तरीसुद्धा आपण सर्वांनीच त्याचा स्वीकार केला पाहिजे.
- प्रथमेश नारविलकर