शेतकऱ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी वनवासी महिलेचा पुढाकार

    09-Jun-2017   
Total Views | 10

दुर्गा गावित यांना पुणे मराठी ग्रंथालयाचा 'मातृ स्मृती पुरस्कार'


 

शेती आणि शेतकरी हा ग्रामीण महाराष्ट्राचा नेहमीपासूनच जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. अर्थातच त्या आधारावर तर भारतीय अर्थ व्यवस्थेचा मुख्य भाग अवलंबून आहे. मात्र सगळ्या जगाचा पोशिंद्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. त्यातून मुक्ती मिळविण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहे. मात्र केवळ कर्जमाफीतून शेतकरी समृद्ध होईल का? की शेतकऱ्याला यासाठी काहीतरी वेगळे करण्याची आवश्यकता आहे? याचा संपूर्ण महाराष्ट्रातील तज्ज्ञ विचार करत आहेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील वनवासी समाजातून पुढे आलेल्या सौ. दुर्गा राजेंद्र गावित यांनी हे तंत्र शेतकऱ्यांना पटवून दिले आहे, आणि कर्जबाजारीपणा पासून ते स्वावलंबनाकडे नवापूर तालुक्यातील ११ गावांतील शेतकरी वाटचाल करीत आहेत.

८ जून २०१७ रोजी सौ. दुर्गा गावित यांना पुणे मराठी ग्रंथालयातर्फे 'मातृस्मृती पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कामाचा घेतलेला हा आढावा -

दुर्गा गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील सावरट या लहानशा वनवासी गावापासून ग्राम विकासाचे काम करायला सुरुवात केली. गेल्या १५ वर्षांपासून विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून गावाच्या विकासाकरिता त्या निरंतर काम करत आहेत. यात त्यांनी सेंद्रिय शेतीचा नेहमीच आग्रह धरला आहे.

महा तरुण भारत सोबट संवाद साधत असताना त्यांनी सध्या चाललेल्या शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. त्या म्हणाल्या की, रासायनिक शेतीमुळे आजचा शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. तसेच शेतीची पद्धती परावलंबी होत आहे. बाहेरून आणलेलं बियाणामुळे शेतीतील खर्च दुपटीने वाढतो, त्याच बरोबर इतर रसायनी फवारणी देखील शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढवत असते. या उलट सेंद्रिय शेतीत बियाणं घरीच तयार करू शकल्यामुळे होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचवता येतो. त्याच बरोबर गोमुत्र, जीवामृत, शेणखत, गांडूळ खत यांच्या माध्यमातून शेतीला पूरक रसायन निर्मिती घरीच करता येते, त्यामुळे शेतकरी स्वावलंबी बनत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा सल्ला देत शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणा पासून दूर राहण्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

आम्ही ११ गावांमध्ये सेंद्रिय शेतीचे प्रयोग गेल्या २ वर्षांपासून चालू केले आहेत. त्याचा येणारा परिणाम आणि त्यातून मिळणारे उत्पन्न चांगल्या दर्जाचे असल्यामुळे आता प्रत्येक गावात प्रत्येकी २-३ शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत. तसा आमचा आग्रह देखील आहे, असे त्यांनी सांगितले.

गावातील महिलांना रोजगार

दुर्गा गावित यांच्या पुढाकाराने नवापूर तालुक्यात ११ गावी तसेच जिल्हाभरात इतर ६ ठिकाणी ग्राम विकास समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे गावाच्या विकासासाठी विविध योजना या समिती मार्फत राबविल्या जातात. यात मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश आहे. त्यातील मुख्य भाग म्हणजे शेती व्यतिरिक्त महिलांसाठी रोजगाराची निर्मिती करणे हा होता. गेल्या वर्षभरात या गावांत एकूण ३५० महिलांना शिवण प्रशिक्षण दिले गेले. ज्यातून १०० महिला पुढे स्वयंरोजगाराच्या दिशेने वळल्या. त्याच बरोबर शासनाच्या योजनेतून १५० शिवण यंत्र मिळवून दिले आहेत. या सर्व अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील आहेत.

या बरोबरच गृह उद्योगाच्या दिशेने महिलांनी पुढे येऊन वनवासी समाजातून महिला उद्योजक निर्माण व्हावे या विचाराने पापड उद्योग, सरबत तयार करण्याचे प्रशिक्षण ४ गावांतील महिलांना दिले गेले. त्यातून ३ महिलांनी आपला स्वत:चा पापड उद्योग देखील सुरु केला आहे. नवनवीन उद्योग धंद्यासोबतच पारंपारिक वनवासी संस्कृती टिकून राहावी म्हणून देखील सौ. गावित यांनी पुढाकार घेतला आहे. त्यात महिलांना एकत्रित करून पारंपारिक वनवासी गाणे, वेशभूषा, कार्यक्रम साजरे केले जात असतात.

स्वच्छतेचा आग्रह

दर महिन्याला ग्राम स्वच्छतेचा आग्रह या १७ गावांमध्ये केला जात असतो. त्यासाठी ग्राम विकास समिती पुढाकार घेत असून, महिन्याच्या ठरलेल्या तारखेला गावातील सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करत केली जाते. सुरुवातीला एक दोघेच जण यात सहभागी होतात. मात्र एकाला दुसरा जोडत जात हळूहळू २० ते ३० जणांचा गट तयार होतो आणि गावाची स्वच्छता देखील होत असते. गावित यांच्या घराच्या जवळ असलेला गावाच्या मुख्य रस्त्यावर काही लोक शौचास बसत असत. मात्र सौ. गावित यांच्या स्वच्छतेच्या आग्रहाला गावकऱ्यांनी साथ दिली आहे. आणि आता सावरट गावाचा मुख्य रस्ता हागणदारी मुक्त झाला आहे. मात्र संपूर्ण गाव हागणदारी मुक्त करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत.

शेतकरी व त्याचे कुटुंब स्वावलंबी बनणे हेच आजच्या शेतकऱ्यापुढील मोठे आव्हान आहे, त्यावर केवळ आंदोलन हा उपाय असू शकत नाही, खरे तर प्रत्यक्ष समस्येवर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि प्रत्यक्ष काम करून त्याचे परिणाम जाणवून येतात, हेच दुर्गा गावित यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखविले आहे.

- हर्षल कंसारा

हर्षल कंसारा

माहिती तंत्रज्ञानातून अभियांत्रिकी पदवीधर, वेब अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट क्षेत्रात कामाचा अनुभव, सॉफ्टवेअर बरोबरच लेखनात ही विशेष आवड, ब्लॉग लेखन, चालू घडामोडी, राजकारण, सामाजिक आणि तरुणाईशी संबंधित विषयांवर लिखाणाची आवड, मराठी बरोबरच गुजराती आणि इंग्रजी साहित्यात देखील रुची, रा.स्व. संघाचे स्वयंसेवक.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121