ही तर वैचारिक पराभवाची कबूली

    25-Jun-2017
Total Views | 8

 

महाराष्ट्राचे जाणते नेते शरद पवार यांनी नुकताच पुण्यात पुन्हा एकदा जातीय विद्वेषाचा राग आळवला. अफझल खानाचा वध शिवाजी महाराजांनी तो मुस्लिम होता म्हणून नाही तर स्वराज्याचा शत्रू होता म्हणून केला, शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हतेच, आम्हाला आंबेडकर आणि फुल्यांचा इतिहास मान्य आहे असे म्हणत पुन्हा एकदा हिंदुद्वेषाच्या आणि ब्राह्मणद्वेषाच्या शिळ्या कढीला त्यांनी ऊत आणण्याचा प्रयत्न केला आणि राज्यातले सामाजिक जीवन ढवळून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण यावेळी त्यांच्या या प्रयत्नाला फारसं यश आलं नाही कारण आता राज्यातल्या जनतेला हे कळून चुकले आहे की सध्या शरद पवारांकडे कोणताही वैचारिक विरोधाचा मुद्दा राहिलेला नाही की ज्या आधारे ते सरकारला कोंडित पकडू शकतील. म्हणूनच त्यांना असल्या तद्दन टाकाऊ कल्पना सुचतात आणि मग ते असे काही तरी बरळतात. एकमेव शेतकरी कर्जमाफी हा विषय त्यांच्या सुप्त पाठिंब्याने राज्यात पेटलाही मात्र तोही फारशी हानी न होता निकालात काढण्यात सरकारला यश आल्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतूनच त्यांनी असे वक्तव्य केले असावे हे उघड आहे.

 

वास्तविक शरद पवारांसारख्या जुन्या जाणत्या नेत्याकडून महाराष्ट्राला ही अपेक्षा कधीच नव्हती. काही दिवसांपूर्वी पवारांचेच एक पट्टशिष्य जितेंद्र आव्हाड यांनीही एका वृत्तवाहिनीवर अशाच आशयाची विधाने करून आपल्या अल्पबुद्धीचे प्रदर्शन केले होते. पण आव्हाड यांच्याकडून साधारण संबंद्ध उद्गारांची अपेक्षा मराठी मानसाला कधीच नव्हती. म्हणूनच त्यांच्या त्या विधानावर साधी प्रतिक्रियाही देण्याची तसदी कोणी घेतली नाही. पण आता दस्तुरखुद्द पवारांनाच अशा प्रकारची विधाने करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावे लागत आहे याइतके त्यांचे दुर्दैव ते कोणते. खरंतर ही पवारांच्या राजकीय आणि वैचारिक पराभवाची कबूलीच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासा संदर्भातील वैचारिक वाद खरं म्हणजे कधीच मिटले आहेत. मुळात हे वाद कधी नव्हतेच. काही विघ्नसंतोषी माणसांनी छिद्रान्वेषी वृत्तीच्या पायी असे वाद उकरून काढलेही, पण ते सत्याच्या आणि इतिहासाच्या कसोटीवर अजिबात टिकले नाहीत. मात्र तेवढ्याने पवारांचे समाधान झाले नाही. देशाच्या राजकारणात सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या या नेत्याला आजही त्याच त्या जातीय विद्वेषाच्या राजकारणाचा आधार घ्यावा लागत आहे हे केवढे मोठे दुर्भाग्य. जातीय अस्मितेसाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करायला लागणे यातंच स्वतःच्या राजकारणाचे अपयश दडले आहे हे ही पवारांच्या लक्षात येऊ नये हीच खरी शोकांतिका आहे.

 

साधारणपणे १९९५ च्या आसपास भाजप आणि शिवसेनेच्या युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. १९९२ मधील बाबरी ढाच्याच्या पतनानंतर देशभरातील वातावरण हळूहलू बदलू लागले व देशभरातील तरुण भारतीय जनता पक्षाकडे आणि एकंदरच राष्ट्रीय विचारांकडे आकर्षित होऊ लागले. १९९३ मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर उसळलेल्या दंगलीत शिवसेनेने मुंबईतील हिंदूंचे केलेले रक्षण आणि बाळासाहेब ठाकरेंचे नेतृत्व यामुळे शिवसेनेचा राज्यात बोलबाला वाढला. या सर्व वातावरणाचीच परिणती म्हणून युती सरकार राज्यात आणि केंद्रात सत्तेत आले. देशात आणि राज्यात काँग्रेस आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांचा आधार असलेला तरुण मतदार आता भाजप आणि शिवसेनेकडे वळत होता. इतकेच काय राज्यातील मराठा तरुण देखील या हिंदुत्त्वाच्या विचारांकडे आकर्षित होत होते. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून भाजप आणि शिवसेनेने तेच प्रतीक आपल्या राजकीय मांडणीसाठी घेतले. स्वाभाविकच शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्त्व हे समीकरण पक्के झाले. मात्र हा तरुणांचा प्रवाह तिकडे वळवण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न न करते तर ते पवार कसले. महाराष्ट्रात राजकारण करायचे तर शिवाजी महाराजांना टाळता येणार नाही हे जाणण्याइतके पवार चाणाक्ष नक्कीच होते. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातील जातीय समीकरणांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. याआधीही पवारांचे सर्व राजकारण हे जातीय आधारावर होते. मात्र आता ते अधिक तीव्र करण्याची गरज त्यांना भासू लागली. शिवाजी महाराज म्हणजे हिंदुत्त्व नव्हे तर मराठा हे नवे समीकरण त्यांना समाजात रुजवायचे होते. त्यातूनच मराठावादाचा अतिरेक करणाऱ्या घृणास्पद राजकारणाला सुरुवात झाली. युती सरकारच्या शेवटच्या दोन वर्षांत ही चळवळ त्यांनी अधिक तीव्र केली. एकीकडे राष्ट्रीय राजकारणात सोनिया गांधींना विरोध चालू असतानाच इकडे महाराष्ट्रात मात्र वेगळीच राजकीय गणिते त्यांनी मांडायला सुरुवात केली.

 

१९९९ मध्ये त्यांनी आपल्या नव्या पक्षाचा पायाच या जातीय समीकरणावर रचला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना सुरुवातीच्या निवडणूकांत राजकीय यशही मिळाले. मात्र संपूर्ण सत्ता कधीच हातात आली नाही. सत्तेच्या १५ वर्षांच्या काळातही कधी काँग्रेसला मात देण्यासाठी किंवा कधी आपल्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी सामाजिक वातावरण ढवळून काढण्याकरिता त्यांनी या जातीय गणितांचा मोठ्या खूबीने वापर केला. वेळोवेळी ब्राह्मण विरूद्ध मराठा असा संघर्ष उभा केला आणि त्या तव्यावर आपली मराठा समाजाची एकगठ्ठा मतं खाण्याची पोळी भाजून खाल्ली. पारंपरीक मराठा मतं मिळवण्यासाठी ही धडपड चालू असतानाचा एकगठ्ठा मुस्लिम मतं हातची जाऊ नयेत यासाठी शिवाजी महाराज मुस्लिमांच्या विरोधात कधीच नव्हते असाही विकृत इतिहास मांडायला सुरुवात केली. त्यासाठी भाडोत्री इतिहास संशोधक पोसले आणि त्यांच्याकडून आपल्याला हवा तसा इतिहास लिहून घेतला. एकीकडे सिंचन घोटाळा आणि आदर्श गृहनिर्माण संस्थेसारखी भ्रष्टाचाराची प्रकरणे बेमालूमपणे सुरु असताना माध्यमं आणि राज्यातील जनतेला त्यांनी या संघर्षात व्यस्त ठेवले. आपल्या मराठा आणि मुस्लिम मतांची बेगमी करण्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे याचेही भान त्यांना राहिले नाही. सर्वसामान्य मराठा तरुण ज्याला या कशाचीच कल्पना नाही त्याच्या मनात जाती आणि धर्मद्वेषाचे विष कालवले गेले. परिणामी ठिकठिकाणी जातीय संघर्षाला सुरुवात झाली आणि वातावरण चिघळत गेले.

 

तब्बल १५ वर्षांच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळानंतरही पुढच्या निवडणूकांच्या प्रचारासाठी विकासकामांवर नव्हे तर जातीय अस्मितेच्या राजकारणावरच पवारांना अवलंबून राहावे लागले. २०१४ च्या मोदी लाटेत केंद्रात आणि राज्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना जबर फटका बसला. त्यातून योग्य तो धडा घेऊन नावात राष्ट्रवादी असलेल्या या पक्षाच्या प्रमुखाकडून किमान एका विशिष्ट उंचीच्या राजकारणाची अपेक्षा काहीजण बाळगून होते. मात्र वयाच्या पंच्याहत्तरीनंतर आणि इतकी मोठी पदे भूषवल्यानंतरही शरद पवारांना आजही ब्राह्मणद्वेषाचा आणि हिंदुद्वेषाचाच राग आळवावा लागतो यातंच त्यांच्या राजकीय व वैचारिक पराभावाची कबूली त्यांनी दिली आहे. आज एकीकडे राज्यातील मराठा समाजातील तरूण आरक्षण मिळत नाही, नोकऱ्या नाहीत, शिक्षण नाही, न्याय नाही म्हणून अस्वस्थ आहेत. त्यासाठी ते राज्यभर मूक मोर्चे काढत आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजाचे नेते म्हणवणारे पवारांसारखे राजकारणी १७ व्या शतकात शिवाजी महाराजांच्या आणि अफझल खानाच्या वकीलाची जात शोधण्यात धन्यता मानत आहेत यापरते दुर्दैव कोणते. खरंतर महाराष्ट्रातला मराठा समाज आता इतका प्रगल्भ झाला आहे की तो या जातीच्या राजकारणात इथून पुढे अडकणार नाही. आज मराठा समाजासमोरील समस्या वेगळ्याच आहेत. त्यांची उत्तरे शोधून देणाऱ्या नेत्याच्या ते शोधात आहेत. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूकांमध्ये हा समाज काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पाठ फिरवताना सर्व राज्याने पाहिला. आणि म्हणूनच बावचळून जाऊन पुन्हा एकदा जातीय अस्मितेच्या राजकारणाला हात घालण्याशिवाय पर्याय नाही असं वाटून या अजाणत्या राजाने जातीय तेढ निर्माण करण्याचा अनेकदा चावून चोथा झालेला हा प्रयोग पुन्हा एकदा केला आहे. आपल्याकडे आता अन्य कोणताही नवीन विचार शिल्लक नाही आणि एकंदरीतच वैचारिक पातळीवर झालेल्या आपल्या पराभवाची ही एका अर्थाने पवारांनी दिलेली कबूलीच आहे.

 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121