पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळा परिसरात काही किल्ले आहेत. त्यामध्ये सह्याद्री पर्वताच्या हिरवाईत वसलेल्या या किल्ल्यांमध्ये खोपोली जवळ राजमाची किल्ला आहे. खोपोली जवळ द्रुतगती मार्गावरून राजमाची सहजरित्या दिसतो. किल्ल्याचे संरक्षण व्हावे या उद्देशाने राजमाची किल्ल्यास महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाचे या किल्ल्याकडे लक्ष असते.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या राजमाचीचे सौंदर्य पावसाळ्यात मनमोहक असते. खास करून रात्रीच्या दुर्गभ्रमंतीसाठी पर्यटक राजमाचीवर येत असतात. कल्याण आणि नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाटमार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग होता. त्यामुळे या मार्गावरून ही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यामध्ये राजमाची किल्ल्याचा समावेश होता. राजमाची किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस मावळ प्रांतातील तुंग, तिकोणा, लोहगड, विसापूर, पेठ (कोथलीगड), भीमाशंकर परिसर, ढाक बहिरी, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी उंदेरी असा सर्व परिसर नजरेस पडतो. त्यामळे इतिहासात हा किल्ला लष्करी दृष्टया एक प्रमुख ठिकाण असले पाहिजे.
तुगांर्ली मार्गे : पुणे किंवा मुंबईहून लोणावळ्यास आल्यानंतर लोणावळ्याहून तुगांर्ली गाव मार्गे राजमाची गावात येता येते. राजमाची गावातून किल्ल्याकडे जाण्यासाठी पायवाट आहे.
कोंदीवडे गाव मार्गे : कर्जतहून कोंदीवडे या गावात येण्यासाठी महामंडळाच्या बस आहेत. कोंदीवडे गावातून खरवंडी मार्गे किल्ल्यावर जाण्यासाठी पाऊल वाट आहे.
दुर्ग भ्रमंतीची ज्या पर्यटकांना आवड आहे. त्यांच्यासाठी राजमाची किल्ला हे एक सुंदर स्थळ आहे. उल्हास नदीच्या खोऱ्यात कोंदीवडे आणि कोंढाणा दरम्यान या किल्ल्याची उभारणी केलेली आहे. त्यामुळे घनदाट हिरवाईत उभारलेल्या राजमाचीच्या सहवासात हवा पालटासाठी खास करून पावसाळयात जाणाऱ्या दुर्ग प्रेमींची संख्या अधिक असते.
राजमाची किल्ल्याचा इतिहास : ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजेच इतिहासानुसार सातवाहन काळाच्या सुरवातीस खोदण्यात आलेल्या कोंढाणे लेण्या किल्ल्याच्या परिसरात आहेत. या बौद्ध कालीन लेण्या पूर्णपणे दगडात कोरलेल्या आहेत. कोंढाणे लेणी हा अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा उत्कृष्ठ नमुना आहे. कोंढाणे लेणी परिसरात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाची किल्ल्यावर सत्तेत असणाऱ्या राजवटीकडून करण्यात आली होती. झाली. त्यानुसार राजमाची किल्ला हा साधारणपणे २५०० वर्षापूर्वीचा असावा असा अंदाज बांधण्यात येतो. इतिहासात पूर्वी राजमाची किल्ल्यास कोकणचा दरवाजा असे म्हणत असतं. त्यांनतर छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५७ साली कल्याणच्या स्वारी नंतर त्याचवर्षी बोरघाट नजीक असलेले राजमाची, लोहगड, तुंग, तिकोना आणि विसापूर हे किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले होते. यामुळे पुण्यापासून ते कल्याण पर्यंतच्या प्रदेशावर मराठ्यांचे वर्चस्व वर्चस्व प्रस्थापित झाले होते. त्यानंतर पुढे छत्रपती संभाजी राजे जिवंत असे पर्यंत म्हणजेच हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते. इ. स. १७१३ मध्ये शाहु महाराजांनी कान्होजी आंग्रे यांना या किल्ल्यावर नियुक्त केले. त्यानंतर राजमाची किल्ला पेशवाईत आला. त्यानंतर इ. स.१८१८ मध्ये किल्ला कंपनी सरकारच्या अधिपथ्या खाली आला.
राजमाची किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे
योधचे स्मारक : लोणवळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाची किल्ल्याकडे येताना वाटेत राजमाची गावाच्या वेशीजवळ एक स्मारक आणि त्या परिसरात अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजा आहे.
उधेवाडी : राजमाची किल्ल्याकडे जात असताना आजुबाजुचा दिसणारा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या जवळ गेल्यानंतर आपल्या नजरेस काही घरे दिसतात. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे. या वस्तीस 'उधेवाडी' असे म्हणतात.
उदय सागर तलाव : किल्ल्याकडे पुढे जात असताना उदय सागर तलाव आहे. पावसाळयामध्ये हा तलाव ओसंडून वाहतो. तलावाच्या समोरील उंच टेकडी उतरून गेल्यानंतर समोर एक मोठे पठार दिसते. राजमाचीवर दोन बालेकिल्ले आहेत. यापुढे जात असताना आपण त्या दिशेने जावू लागतो.
भैरवनाथाचे मंदिर : श्रीवर्धन आणि मनरंजन या बाले किल्ल्यांच्यामध्ये एक सपाट प्रदेश आहे. यावर भैरवनाथाचे मंदिर आहे. भैरवनाथाच्या मंदिरासमोर दिपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडे जाणारी वाट श्रीवर्धन बाले किल्ल्यावर जाते. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन.
मनरंजन (बालेकिल्ला) : मनरंजन हा बालेकिल्ला श्रीवर्धनपेक्षा उंचीने लहान आहे. मनरंजन या बाले किल्ल्यावर जाणरी वाट सोपी आहे.
मनरंजन किल्ल्यावरील किल्लेदाराचा वाडा :
मनरंजन बाले किल्ल्याचा दरवाजा गोमुखी आहे.किल्ल्यावर गेल्यानंतर समोर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाडांचे भग्न अवशेष दिसतात. त्या समोर दगडी बांधकामातील मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाज्यावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे.
श्रीवर्धन (बालेकिल्ला) : राजमाची किल्ल्यावर असणाऱ्या दोन बाले किल्ल्यांपैकी सर्वात उंचावर असलेला श्रीवर्धन किल्ला आहे. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बर्यापैकी सुस्थितीत आहेत. या बाले किल्ल्यास आजच्या स्थितीत भग्न झालेली अनेक ठिकाणी दुहेरी आणि मजबूत तटबंदी दिसते. या बाले किल्ल्याच्या मुख्य दरवाज्याच्या दोन्ही बाजूस पाहरेकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या देवड्या आहेत.
श्रीवर्धन बाले किल्ल्याच्या वाटेवरील कोठार : बाले किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवर एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत .या गुहा म्हणजे दारु गोळ्याचे कोठार आहे. बाले किल्ल्यावर गेल्यानंतर समोर आपणास एक ध्वजस्तंभ दिसतो. या ठिकाणाहून समोरच ढाक बहिरीचा सुळका आणि शिरोटाचा तलाव परिसर दिसतो.
कातळदरा दरी : राजमाची किल्ल्याच्या पूर्व आणि दक्षिण दिशांना खोल दरी आहे. या दरीस “कातळदरा” असे म्हणतात. या दरीतूनच “उल्हास” नदी उगम पावते.
भैरण डोंगर : उल्हास नदीच्या जवळच पावसाळ्यात निसर्गाचा हिरवा शालू नेसलेला एक डोंगर आहे. या डोंगरास 'भैरण डोंगर' असे म्हणतात.
आजच्या दिवशी राजमाची किल्ल्यावर केवळ अवशेष आहेत. पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु पावसाळ्यात पावसाच्या सरींचा अनुभव घ्यायचा असेल, तसेच निसर्ग सौंदर्याने भरलेल्या पश्चिम घाटातील पाऊस अनुभवावयाचा असेल तर राजमाचीवर पावसाळ्यात दुर्ग भ्रमंती नक्की करावी. राजमाची किल्ल्याची दुर्ग भ्रमंती ही दुर्ग प्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणी आहे.
- नागेश कुलकर्णी