
पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या परिसरात असे ही काही किल्ले आहेत. ज्यांची नावे देखील आपणास माहीत नाहीत. परंतु या किल्ल्यांवर इतिहासात पराक्रमाच्या गाथा लिहिल्या गेलेल्या आहेत. भोर पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला, परंतु आजही सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रायरेश्वराच्या शेजारी भग्न अवस्थेस्त शांतपणे उभा असलेला किल्ला म्हणजे केंजळ गड होय. येथे किल्ला होता, असे म्हणता येईल एवढे अवशेष देखील या किल्ल्यावर आज अस्तित्वात नाहीत ! परंतु किल्ल्याची मोक्याची जागा आणि परिसरातील हिरवाईने नटलेला महादेव डोंगर पाहून, पूर्वीचा केंजळगड निश्चितच मनमोहक असेल, असे वाटते. त्यामुळेच केंजळगडास मोहनगड असे देखील म्हणतात. तसेच केळंजा असे देखील म्हणतात.
वाई आणि रायरेश्वरच्या दरम्यान असलेल्या महादेव डोंगर रांगेवर एका उंच टेकाडावर केंजळगड उभारलेला आहे. केंजळ गडाच्या पायथ्यापर्यंत रस्ता असल्यामुळे, आपण वाहन घेऊन जावू शकतो. पुणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोर गावी जाण्यासाठी पुण्याच्या स्वारगेटहून बस आहेत. भोरहून कोरले गावी जाण्यासाठी बसने अथवा खाजगी वाहनाने जाता येते. कोरले गावातून एक मार्ग केंजळगडला तर दुसरा रायरेश्वरकडे जातो. भोरहून आंबवडे गाव मार्गे कोरले गावाला जाता येते. कोरले गावातून केंजळ गडाच्या पायथ्यापर्यंत असलेल्या डोंगरातील नागमोडी वाटेने पायथा गाठता येतो.
केंजळ गडाचा इतिहास :
असे म्हणतात की, इ. स. च्या बाराव्या शतकामध्ये भोज राजाने केंजळगड बांधला होता. त्यानंतर इ. स. १६४८ मध्ये केंजळगड अदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला. इ. स. १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी मराठी फौजा केंजळगडाकडे पाठवल्या होत्या. त्यावेळी गंगाजी किर्दत नावाचा किल्लेदार किल्ल्याचा किल्लेदार होता. गंगाजीने मराठीशाहीच्या फौजांना चोख प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु मराठेशीची फौज आणि गंगाजीचे सैनिक यांच्यामध्ये झालेल्या लाधैमध्ये किल्लेदार गंगाजी किर्दत मारला गेला आणि केंजळगड मराठेशाहीच्या अधिपत्याखाली आला. त्यानंतर पुढे मुघलांकडे गेलेला केंजळगड पुन्हा मराठेशाहीत आणण्याचा पराक्रम मराठ्यांनी केला. इ. स. १८१८ मध्ये मराठेशाहीच्या पाडावानंतर इस्ट इंडिया कंपनीने केंजळगडावर वर्चस्व प्रस्थापित केले.
केंजळ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :
भोरहून कोरले गाव मार्गे केंजळगडाच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी आंबवडे गावाच्या पुढे गेल्यानंतर डोंगरावर नागमोडी रस्ता आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात जात असताना पश्चिम घाट (सह्याद्री) च्या पूर्वेकडे असलेला उतार आपणास अनुभवता येतो.
केंजळगडाचा पायथा : केंजळगडाच्या पायथ्याजवळ आठ ते दहा घरांची वस्ती आहे. एक मंदिर आहे. तसेच एक शाळा देखील आहे. या लोक वस्तीच्या मागे केंजळगडाचा उंचच उंच कातळ आणि खडा डोंगर आहे. केंजळ गडाच्या डोंगरावर खुप झाडी झाडी आणि गवत आहे. त्यामुळे गडावर जात असताना काळजी घेणे आवश्यक आहे. आपण वाहन घेऊन गेल्यानंतर पायथ्याशी असलेल्या मंदिराच्या परिसरात वाहन उभे करून झाडाझुडपातून गडाकडे जाणाऱ्या पायवाटेने गडावर जावू शकतो.
केंजळगडच्या पायऱ्या : पायवाटेने रस्ता शोधत केंजळगडाच्या मुख्य द्वाराजवळ गेल्यानंतर कातळात कोरलेल्या भक्कम आणि लांबच लांब पायऱ्या दिसतात. केंजळगड सध्या पूर्णपणे पडलेला आहे. परंतु या पायऱ्या मात्र आज ही सुस्थितीत आहेत. केंजळ गडाच्या या डोंगर शिखरावरील कातळात एकूण पन्नास पेक्षा जास्त उंचच उंच पायर्या तयार केलेल्या आहेत.
गुहा : केंजळगडाचा मूळ इतिहास दुर्लक्षित असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही वास्तूस नामफलक अथवा काही विशिष्ठ खुणा केलेल्या आहेत, असे आढळत नाही. कातळात कोरलेल्या पायऱ्या चढून वर जाण्यापूर्वी आपल्याला एक गुहा दिसते. या गुहेचे वैशिष्ट्य तसे सांगता येणार नाही, परंतु इतिहासात या गुहेचा वापर पाऊस, उन आणि वारा यांपासून बचाव करण्यासाठी होत असावा. डोंगराच्या काळ्या दगडात कोरलेली ही गुहा कपारीसारखी दिसते. आणि जवळ गेल्यानंतरच ती आतमध्ये किती दूरपर्यंत कोरलेली आहे, हे लक्षात येते.
पाण्याचे टाके : गुहेच्या थोडे पुढे पडलेल्या अवस्थेतील पाण्याचे एक टाके आहे. येथून पायऱ्यांकडे जात असताना केवळ गडाचे अवशेष दिसतात. पायऱ्या चढण्यापूर्वी जेथे गडाचा मुख्य दरवाजा असावा, असे अवशेष स्वरूपातील दगड पडलेले दिसतात.
केंजाई देवीचे मंदिर : गडावर एका छोट्याश्या चबुतऱ्यावर केंजाई देवीचे एक मंदिर आहे. उघड्यावर असलेल्या या मंदिरात देवीचे श्रद्धास्थान आहे.
चुन्याचा घाणा : आपण पायऱ्या चढून गडावर गेल्यानंतर पाहिल्यास, वर कोणतीच वास्तू पूर्णपणे सुस्थितीत दिसत नाही. परंतु केवळ चुन्याचा घाणा सुस्थितीत आहे. केंजळ गडावर दोन चुन्याचे घाणे आहेत. त्यामुळे असा अंदाज लावला जावू शकतो की, गडावर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झालेले असावे.

दारूचे कोठार : चुन्याच्या घाण्यापासून पुढे गेल्यानंतर एक इमारत आहे. इमारत पाहिल्यानंतर येथे पूर्वी दारुचे कोठार असावे असा अंदाज बांधता येतो. येथून पुढे रायरेश्वराच्या दिशेने गेल्यानंतर ओसाड आणि वाढलेल्या गवतातील माळरान आहे.
बाराव्या शतकात उभारण्यात आलेल्या केंजळगडाचा परिसर पाहता आणि गडावर गेल्यानंतर तेथील विस्तीर्ण पठार आणि अवशेष पाहता या किल्ल्यावर पूर्वी भरपूर वर्दळ असावी, असे वाटते. परंतु पूर्णपणे भग्न अवस्थेत असलेल्या केंजळगडावर आज केवळ एक पडझड झालेला बुरूज आहे. तसेच गडाच्या एका बाजूस पडलेल्या अवस्थेतील तटबंदी आहे. मात्र आजही केंजळ गडावरून दूरवरचा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येतो.
महाराष्ट्राच्या इतिहासात असे काही दुर्लक्षित झालेले किल्ले आहेत. वेळीच प्रशासनाने आणि इतिहासकारांनी अशा ऐतिहासिक किल्ल्यांच्या जतनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी दिलेला हा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आपण आपल्या भावी पिढ्यांना देवू शकणार नाही.
– नागेश कुलकर्णी