Don't judge a book by its cover अशी एक १९४४ च्या सुमारास प्रसिद्ध झालेली म्हण आहे. म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीचे मत फक्त बाह्य दर्शनावर नव्हे तर प्रत्यक्ष अनुभव घेऊनच बनवावे.
खरं तर माझं कम्युनिस्ट विचारांविषयी सखोल वाचन नाही. वरवर पाहता अतिशय आकर्षक ध्येयवाक्ये असलेल्या कम्युनिस्ट संघटना आणि गरीब, कामगारांसाठी त्यांनी कळवळून केलेली भाषणे थोडीफार वाचली, ऐकली आहेत. जो कोणी ही भाषणे ऐकतो, तो प्रचंड प्रभावित होतो, आपल्यावर अन्याय होतोय या भावनेने पेटून उठतो आणि तथाकथित अन्याय करणाऱ्या वर्गाविरुद्ध रस्त्यावर उतरतो. पण त्या विचारांचा लोकांवर आणि त्या भागावर झालेला प्रत्यक्ष परिणाम पाहून त्या विचारसरणी विषयी माझं मत बनलंय की ही विचारसरणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या समाजासाठी चांगली नाही. त्यांनी कामगारांना हक्काची जाणीव दिली परंतु कर्तव्याची जाणीव दिलेली नाही.
नव्वदच्या दशकाचा उत्तरार्ध. नवीनच नोकरीला लागलो होतो. कंपनी छोटीच होती. ४-५ महिन्यांनी कोलकाता येथे जायचे ठरले. महाराष्ट्रापासून एवढ्या लांबच्या राज्यात जाण्याची पहिलीच वेळ. व्यावहारिक जगात अजून पाऊल ठेवलेले नव्हते. त्यामुळे सगळे पुस्तकी संदर्भ मनात घोळू लागले. कोलकाता म्हणजे स्वामी विवेकानंदांची कर्मभूमी. विवेकानंदांविषयी वाचनातून, रामकृष्णांच्या चरित्रातून दक्षिणेश्वर आणि कालीघाट याठिकाणी अनेकदा भेट दिलेली. स्वातंत्र्य लढ्यातील अनेक बंगाली सशस्त्र क्रांतिकारकांविषयी वाचनातून बंगाल विषयी एक वेगळीच आदराची भावना मनात होती. वंदे मातरम् आणि जन गण मन ज्या प्रांतात गायले गेले, नेताजींसारखे महान व्यक्तिमत्व ज्या भागाने भारताला दिले, ते राज्य, तिथले लोक अनुभवण्याची संधी मिळाल्याचा आनंद होता. कोलकात्याची मेट्रो ट्रेन आणि हावडा ब्रिज पुस्तक आणि सिनेमातून पाहिलेले. वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचे शोध वाचून बंगाली लोक कमालीचे हुशार असतात अशीही भावना होती. त्याचबरोबर तिथे वर्षानुवर्षे सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट सरकार आणि संघटनांविषयी सुद्धा एक कुतूहल होते.
ट्रेनच्या फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंटमध्ये मी आणि आमच्या कंपनीचे मालक दोघेच होतो. तीसेक तासांच्या प्रवासानंतर एकदाचे हावडा स्टेशन आले. नकळत बोलून गेलो, आपण विवेकानंदांच्या भूमीवर पाय ठेवत आहोत. माझा अजून व्यावहारिक जगाशी संबंध आलेला नव्हता आणि मालक सरावलेले होते, त्यामुळे त्यांनी नुसते स्मित हास्य केले.
स्टेशनच्या बाहेर माणसांच्या गर्दीतून अक्षरशः चालणे कठीण होते. तिथून हल्दीया येथे जायचे असल्याने स्टेशनच्या बाहेर येऊन टॅक्सी केली. थोडे अंतर कापल्यावर गाडी हावडा ब्रिज वरून जाऊ लागली. हुगळी नदीवरील हा प्रचंड मोठा पूल सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र कशामुळे आहे माहितीये ? जवळजवळ पाऊण किलोमीटर लांबीच्या या पुलाला नदीपात्रात कुठेही आधार दिलेला नाही. फक्त दोन किनाऱ्यांवर असलेल्या आधाराने हा पूल १९४३ सालापासून गेली कित्येक दशके दिमाखात उभा आहे. रहदारीने कायम गजबजलेला हा पूल मी दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत डोळे भरून पाहून घेत होतो. कामाच्या रगाड्यात पुन्हा येणे शक्य होईल की नाही माहिती नाही.
कोलकातापासून १२५ किमी अंतरावर असलेल्या हल्दिया येथे हल्दिया पेट्रोकेमिकल्स या प्रकल्पामध्ये आमचे काम होते. वाटेत जाताना दोन्ही बाजूला प. बंगालच्या भातशेतीचे दर्शन घडत होते. कुठेही रिकामी जमीन दिसत नव्हती. एक लक्षात आले की प्रत्येक ठिकाणी घरांची वस्ती ही तळ्याच्या आजूबाजूला होती. हे तळे लोकांना पाणी आणि मासे दोन्हीचा पुरवठा करते. मुख्य अन्न मासे आणि भात. जेवणात मांसाहाराचा यथेछ वापर होतो. माछ-भात आणि रोशोगुल्ला ( रसगुल्ला) शिवाय ही मंडळी जगूच शकत नाहीत.
बंगाली भाषा अतिशय गोड. भाषा शिकण्याची आवड असल्यामुळे तिथे पहिल्याच दिवशी बंगाली शिकण्यासाठी एक पुस्तक घेतले. बंगाली भाषेतील काही शब्द ठरवून बोलू लागलो. मला दुकानांवरच्या पाट्या वाचा येऊ लागल्या, पेपर मधील बातम्या वाचता येऊ लागल्या. त्यामुळे स्थानिक घडामोडी कळू लागल्या.
ग्रामीण भागात आणि हल्दियामध्ये सायकल रिक्षा होत्या. पुढे एक चाक व सीटच्या मागे दोन चाके. त्या दोन चाकांवर लोकांना बसण्यासाठी एक लाकडी चौरस आकाराची फळी. एका सायकल रिक्षात ५-६ माणसे बसायची. ५-६ माणसांना ओढत नेणे काही सोपे काम नव्हते. पण या रिक्षाचालकांना त्याची सवय होती. मी काही लोकांना विचारले सुद्धा कि या भागात लोक ऑटो रिक्षा का घेत नाहीत? त्यावर उत्तर मिळाले कि ऑटो रिक्षा मुळे सायकल रिक्षाचालकांचा रोजगार जाईल त्यामुळे या लोकांचा ऑटोरिक्षाला विरोध आहे, आणि येथे कामगार संघटना प्रचंड प्रभावी आहेत.
बहुतेक ठिकाणी दिसणारी गोष्ट म्हणजे कम्युनिस्ट पक्षांचे झेंडे. जिकडे पाहावे तिकडे लाल बावटा. पहिल्या आठवड्यातच लाल बावट्याचा प्रभाव दिसू लागला. दर दोन दिवसांनी सकाळी, संध्याकाळी मधेच केव्हातरी लाल बावटे घेऊन लोकांचा जमाव घोषणा देत जाताना दिसायचा. मग जमावातीलच कोणीतरी त्यांच्यापुढे भाषण देत असे. कशाबद्दल, काय साध्य करण्यासाठी काही कळत नव्हते.
साईट वरच्या आमच्या कामाला सुरुवात झाली होती. आमचे सर्व कामगार मुंबईचे असल्यामुळे आमचे काम पटापट पुढे सरकू लागले. आजूबाजूचे कामगार कसे काम करतात हेही काही दिवसात कळू लागले. त्यांची कामाची पद्धत पाहून मी हैराण झालो होतो. कामगार कायद्याप्रमाणे सकाळी ९ ते ५ चे आठ तासांचे वेळापत्रक. बहुतेक कामगार ९ ला आल्यानंतर हळूहळू कामाला लागत. १०:३० ला चहाची वेळ. पंधरा मिनिटात संपणारा चहा बऱ्याच लोकांसाठी अर्धा ते एक तास झाला तरी संपत नसे. मग थोडा वेळ काम करून १२ वाजता जेवणाची सुटटी. एक तास हक्काची असलेली सुट्टी बऱ्याच लोकांसाठी २ तास चालत असे. १ तास जेवण आणि १ तास झोप. ह्या वेळात त्यांच्याशी काही कामाविषयी बोलणे हा कामगारांवरील अन्याय असल्याची त्यांची भावना होती. पुन्हा दुपारी ३:३० ला चहा ची वेळ. साईटवर चहा घेऊन टेम्पो येत असे. चहाबरोबर मुडी (म्हणजे चुरमुरे) हा आवडता प्रकार. मुडी संपायला वेळ लागायचा, साधारण अर्धा ते पाऊण तास. त्यानंतर थोडा वेळ नाईलाजाने काम करून बरोबर ५ वाजता सगळे काम आवरून सुपरवायजर पुढे गोळा होत. काही दिवस या सगळ्या प्रकारचे निरीक्षण करून मी न राहवून एका सुपरवायजर ला विचारलेच, हे अशा पद्धतीने काम कसा होतं ब्वा ? तो सुपरवायजर प. बंगाल बाहेरील होता. कोणी ऐकत नाही याची खात्री करून म्हणाला, "इथे लोकांची काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. दिवसभरात खूप कमी काम करून सुद्धा संध्याकाळी जाताना माझ्याकडून २ तसंच ओव्हरटाईम केला असा खोटंच लिहून घेतात. मी जर नाही म्हटले तर मला मार खावा लागेल. इथे कामगार संघटना प्रचंड प्रभावी आहेत. "

लवकरच त्या संघटनांचा फटका मला सुद्धा बसला. मुंबईहुन पाठवलेले आमचे काही सामान तिथे गोडाउन मध्ये येऊन पडले होते. ते क्रेन ने उचलून बाहेर काढायचे होते. आम्ही गोडाउन मध्ये जाऊन क्रेन ड्रायव्हर ला घेतले आणि ते सामान काढण्यासाठी काही गोडाउन चे कामगार मिळतात का ते पहिले. तेथे कोणीच नसल्यामुळे आम्हीच ते सामान बाहेर काढले. सामान बाहेर काढून झाले मात्र अचानक काही लोक तेथे प्रगट झाले, "हजार रुपये द्या तरच सामान बाहेर काढू देऊ." कशाचे पैसे ? " गोडाउन मधले काम आमचे असते. तुम्ही येथे बाहेरचे कामगार आणू शकत नाही. त्यामुळे इथल्या कामाच्या पैशावर आमचा हक्क आहे." अरे पण तुम्ही लोक येथे नव्हता, म्हणून आम्ही आमचे लोक वापरले, मग तुम्हाला पैसे का म्हणून द्यायचे? " हे पहा, गुपचूप आमच्या हक्काचे पैसे द्या नाहीतर सामान बाहेर घेऊन जात येणार नाही." आता आमचा नाईलाज झाला. पैसे देऊन आमचे सामान बाहेर काढले. नंतर एकाने सांगितले कि इथल्या लोकांचा हाच धंदा आहे. कामाच्या वेळेस गैरहजर राहायचे आणि काम झाल्यावर पैसे घ्यायला हजर व्हायचे, ही सगळी कामगार संघटनांची गुंडगिरी आहे.

माझ्या साडेतीन महिन्यांच्या तेथील वास्तव्यात ४ दिवस बंद पाळला गेला. दोनदा स्थानिक बंद, एकदा राज्यव्यापी बंद, एकदा देशव्यापी बंद. देशव्यापी बंदच्या काही दिवस आधी कम्युनिस्ट पक्षांनी सरकारच्या कुठल्यातरी धोरणाच्या विरुद्ध सह्यांची मोहीम राबवली होती. त्याप्रमाणे रस्त्यात, ऑफिसेस च्या बाहेर, कारखान्यांच्या बाहेर कार्यकर्ते मंडळी टेबल खुर्ची टाकून बसली होती. हे लोक येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला जबरदस्तीने त्या कागदावर सही करायला भाग पाडत होते. कोणी तयार नसेल तर दोन जण त्याच्या पाठीमागे उभे राहून त्याचा हात धरत आणि सही करायला भाग पाडत.
शेवटच्या काही दिवसांत सुप्रसिद्ध काली मंदिर, रामकृष्ण मठ ह्या ठिकाणी भेट दिली. चालत चालत सहज चढता उतरता येईल अशा ट्राम मध्ये बसण्याचा आनंद घेतला. साडी मार्केटमध्ये पूर्वी फक्त ऐकलेली अतिशय तलम साडी प्रत्यक्षात पाहायला मिळाली. दुकानदाराने पूर्ण साडी एका अंगठीतून सर्र्र्कन पार करून दाखवली. बंगाली विणकरांच्या हातानी केलेली जादू पाहून मी अवाक होऊन पाहत राहिलो.
कोलकात्याहून परतताना मात्र मी ज्या गोष्टी पाहून अस्वस्थ झालो होतो त्यात होते तेथील गरिबांचे लोंढे, कम्युनिस्टांनी नष्ट केलेली तेथील लोकांची काम करण्याची वृत्ती, कालीघाटावर जाताना रस्त्यात असलेली मिशनरीज ऑफ चॅरिटी ची इमारत आणि ह्या सगळ्यात हरवलेला रामकृष्णांचा, विवेकानंदांचा, नेताजींचा, क्रांतिकारकांचा, वैज्ञानिकांचा बंगाल. जे अनुभव मी कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात घेतले त्यामुळे माझी खात्री झाली कि ह्या संघटना गरिबाला नेहमी गरीबच ठेवतात आणि वर्ग संघर्ष घडवून देशाला अराजकतेकडे नेतात.
- भुषण मेंडकी