गब्बर, शाकाल, मोगँबो अन् आता भल्लाळदेव

Total Views |


फिरोज खानने दिग्दर्शित केलेला ‘धर्मात्मा’ हा चित्रपट 25 जुलै 1975 साली प्रदर्शित झाला आणि त्यानंतर अवघ्या काही आठवड्यातच म्हणजेच 15 ऑगस्ट 1975 रोजी रमेश सिप्पींनी ‘शोले’ प्रदर्शित केला. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर काय कमाल केली हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे, पण या लेखाच्या सुरूवातीलाच या चित्रपटांचा उल्लेख करण्याचं कारण थोडं वेगळ आहे. आजपर्यंत हिंदी चित्रपट सृष्टीत एक आदर्शवत खलनायक म्हणून ज्या व्यक्तिरेखेच नाव प्राधान्याने अग्रस्थानी घेतल जातं ते नाव म्हणजे ‘गब्बर सिंग’. शोले मधल्या याच गब्बर सिंगची व्यक्तिरेखा सर्वप्रथम त्यावेळेसच्या आघाडीचा खलनायक समजल्या जाणार्‍या डॅनी डेंझोंगप्पाकडे चालून आली होती. पण डॅनीने फिरोजचा ‘धर्मात्मा’ अगोदरच सँक्शन केला असल्याने त्याने ही व्यक्तिरेखा नाकारली. आजही डॅनीला मनोमन या निर्णयाची कुठे ना कुठे खंत वाटत असणार यात शंका नाही. पण कितीही काही झाल तरी गब्बरची व्यक्तिरेखा एका उच्च पातळीला नेऊन ठेवण्यात अमजद खानचे मोठे योगदान आहे. ती पातळी डॅनी गाठू शकला असता की नाही हे सांगण थोडं अवघड आहे, पण अमजद खानने ती भूमिका केवळ साकारली नाही तर ती अक्षरश: अनुभवली, जगली आणि पुढच्या कैक वर्षांसाठी आदर्शवत बनवून ठेवली.

हिंदी चित्रपट म्हणला की त्यात नायक-नायिका आणि खलनायक या तीन पात्रांचा प्रामुख्याने समावेश अनिवार्य असतोच. आत्ता सध्या काही चित्रपटांमधून हा ट्रेंड मोडीत निघत आहे, परंतु पुर्वीच्या चित्रपटात मात्र बहुतांश वेळा हा फॉर्म्युला वापरा जातच होता. नायकावर अत्याचार करणारा, नायिकेचा छळ करणारा किंवा या दोघांच्या प्रेमामध्ये आडकाठी घालणार्‍या खलनायकाशिवाय आपल्याकडे चित्रपट बनणे म्हणजे अशक्यच होते. गब्बरची व्यक्तिरेखा लक्षात राहण्याअगोदर ज्यांनी ‘मदर इंडिया’ पाहिला असेलत त्यांना त्यामधला सावकार सुखीलाला अजूनही चांगलाच आठवत असेल. कन्हैयालालने साकारलेली सुखीलालची ही व्यक्तिरेखा आपल्या मनात तिच्या बद्दल प्रचंड चिड निर्माण करून गेली. पण या व्यक्तिरेखेने तितकीशी लोकप्रियता मात्र मिळविली नाही. याच लोकप्रियतेच्या पंक्तित निर्विवादपणे पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे गब्बरचा! खलनायक असूनही ज्यांनी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण करण्यात काही व्यक्तिरेखा यशस्वी झाल्या आहेत. किंबहुना त्या व्यक्तिरेखांमुळेच त्या अभिनेत्यांना अधिक वलय प्राप्त झाले आहे. आजपर्यंत अशा खलनायकांमध्ये गब्बर, शाकाल, मोगँबो यांची नावं प्रामुख्याने घेतली जात होता, आता कदाचित या पुढील काळात भल्लाळदेवचाही या यादीत समावेश होईल अशी दाट शक्यता आहे.

गब्बर, शाकाल किंवा मोगँबो यांच्यानंतर थेट लक्षात राहतो तो भल्लाळदेवच का? तर याच उत्तर नक्कीच नाही अस आहे, आपल्या वेगळ्या अदाकारीमुळे या तीन व्यक्तिरेखांशिवायही अनेक व्यक्तिरेखा उल्लेखनीय ठरल्या जरूर, पण त्या या तिघांएवढ्या लोकप्रिय झाल्या नाहीत हे देखील तितकच खरं. कालिचरण मधला ‘लॉयन’(अजित), बॉबी मधला ‘प्रेम’(प्रेम चोप्रा), अमीर-गरीब मधला ‘रणजीत’(रणजीत), अग्निपथ मधला ‘कांचा चिना’(डॅनी डेंझोंगप्पा), राम और शाम मधला ‘गजेंद्र’ (प्राण), कर्मा मधला ‘डॉ. डांग’ (अनुपम खेर) दुष्मन मधला ‘गोकुळ पंडीत’(आशुतोष राणा), सडक मधला ‘महाराणी’ (सदाशिव अमरापुरकर), घातक मधला ‘काट्या’ (डॅनी) या खलनायिकी व्यक्तिरेखा त्यांच्या सरस अभिनयामुळे लक्षवेधी ठरल्या होत्या. अगदी आत्ता आत्ताच्या काळात ‘आता माझी सटकली’ म्हणत सिंघममध्ये प्रकाश राजने रंगविलेला जयकांत शिर्के सगळ्यांनाच भावला, त्याचबरोबर ‘फोर्स’मधला शारिरीकदृष्ट्या नायकापेक्षाही सरस असणारा ‘विष्णु’ (विद्युत जामवाल) व रमण राघवमधला क्रुर, हिंसाचाराच्या सर्वच परिसिमा पार करणारा ‘रामण्णा’ (नवाझुद्दीन सिद्दिकी) प्रचंड भाव खावून गेला. अर्थात वरील सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नसल्याने काही खलनायकांची नाव देखील बर्‍याच जणांनी माहिती नसतील पण जर आपण पुन्हा एकदा हे चित्रपट पाहिले तर त्यातील या व्यक्तिरेखा नक्कीच तुम्हाला आवडतील. आता बाहुबलीच्या निमित्ताने गब्बर, शाकाल, मोगँबो अन् लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या भल्लाळदेवच्या व्यक्तिरेखांवर टाकलेला हा प्रकाश...

जो डर गया समझो मर गया : गब्बर
शोलेमधल्या जय-विरूला जेवढी लोकप्रियता त्यावेळी मिळाली नसेल तेवढी लोकप्रियता अमजदच्या गब्बर या व्यक्तिरेखेने मिळविली. हा खलनायक असला तरी पुढे जाऊन अनेक लोकं या व्यक्तिरेखेला आदर्श मानून या क्षेत्रातील आपल्या करिअरची वाटचाल करू लागले. ‘जो डर गया समझो मर गया’, ‘अरे ओ सांबा, कितने आदमी थे रे’, ‘ये हात मुझे दे दे ठाकूर’, ‘होली कब है, कब है होली’ हे गब्बरचे संवाद अजूनही विविध ठिकाणी विविध माध्यमातून वापरले जातात. हिंदी चित्रपट सृष्टीतली ही एक तोड नसलेली अजरामर व्यक्तिरेखा आहे.

तुळतुळीत टकल्यावर हात फिरवणारा शाकाल
डोक्यावर एकही केस नाही, तरीदेखील सारखा आपल्याच टकलावर बोटं फिरवणारा ‘शान’ चित्रपटातील कुलभूषण खरबंदाने रंगविलेला शाकाल आजही लक्षात राहीला आहे. ऐंशीच्या दशकात बहुदा तंत्रज्ञानातील एक वेगळा प्रयोग म्हणून या चित्रपटाकडे बघितले गेले, अर्थात हा प्रयोग प्रेक्षकांना तितकासा रूचला नाही. कारण ती पद्धत आपल्याकडे तितकीशी पारंगत नव्हती. नेहमीच्या खलनायकांपेक्षा वेगळा गेटअप, स्वत:च्या एका बेटावर असलेलं काळ साम्राज्य, त्या साम्राज्यातील अद्ययावत गोष्टी हे सगळ नवीन होतं. शाकालच्या निमित्ताने प्रथमच बाँड स्टाईल खलनायक आपल्याला मिळाला असं म्हटल्यास ते अधिकच ठरणार नाही. मल्टिस्टारर चित्रपट असूनही तो चालला नाही पण ‘शाकाल’ची व्यक्तिरेखा मात्र कायम स्वरूपी स्मरणात राहीली.


मोगँबो खुष हुँआ...
‘मिस्टर इंडिया’ लक्षात राहण्याचं महत्त्वाच कारण म्हणजे या चित्रपटातील आमरिष पुरीची मोगँबोची व्यक्तिरेखा. अर्थात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांचे काम यामुळे झाकोळलं जात नाही, पण तरीही मोगँबोची क्रेझ काही औरच होती. त्याच्या कॉच्युमपासून त्याच्या सोबत असणार्‍या सर्व गोष्टींची आणि विशेषत: त्याच्या संवादाची या चित्रपटाच्या निमित्ताने अधिक चर्चा झाली. टेक्निकली या चित्रपटातही ‘शान’सारख्याच काही गोष्टींचा वापर केला गेला होता, पण या चित्रपटाची कथा अधिक रंजन असल्याने याला जास्त लोकप्रियता मिळाली. यानंतरही आमरिष पुरीने अनेक खलनायक रंगविले पण ‘मोगँबो खुष हुँआ’ सारखा ऐतिहासिक संवाद त्याच्या इतर कोणत्याही व्यक्तिरेखेच्या लेखी आला नाही आणि त्या व्यक्तिरेखाही तितक्या लोकप्रिय ठरल्या नाहीत.


क्रूर, कपटी अन् प्रचंड शक्तीशाली भल्लाळदेव
एखाद्या हिंदी चित्रपटाचा सिक्वेल येणं आणि त्यातही पहिल्याच चित्रपटातील खलनायक असणं ही बाब आपल्याकडे अपवादानेच पाहायला मिळते. गेल्या काही वर्षातलं याबाबतच उदाहरण म्हणजे ‘गँग ऑफ वासेपूर’ व ‘गँग ऑफ वासेपूर-2’. या दोन्ही चित्रपटातील रामाधीर सिंग हा खलनायक तिग्मांशू धुलीयाने मस्त पेलला होता. पण या दोन्ही चित्रपटातील मुख्य कलाकारांच्या म्हणजेच मनोज वाजपेयी व नवाझुद्दिन सिद्दिकीच्या भूमिका त्यापेक्षा अधिक सक्षम झाल्याने तिग्मांशू काहीसा मागे पडला. पण आता सिक्वेलमधील खलनायक कायम न ठेवण्याच्या नियमाला अपवाद ठरत ‘बाहुबली : दि बिगिनिंग’ व ‘बाहुबली : दि कंक्ल्युजन’ या दोन्ही चित्रपटात राणा डाग्गुबाटीने भल्लाळदेव भन्नाटरित्या साकारलाय. पिसाळलेल्या रेड्याशी झुंज करून त्याला चित करण्याची अफाट ताकद असणारा भल्लाळदेव, युद्धात शेकडोंना यमसदनी धाडणारा भल्लाळदेव, सिक्स पॅक्स् अ‍ॅबस् असणारा भल्लाळदेव, कपटी राजकारण करून माहेश्मतीच्या सिंहासनावर विराजमान झालेला भल्लाळदेव आणि सत्तेपायी स्वत:च्या आईचा, भावाचाही जीव घेणारा भल्लाळदेव गेल्या पाच वर्षात राणा अक्षरश: जगलाय असच म्हणावं लागेल. राणाच यासाठी विशेष कौतुक करायला हवं की, या दोन्ही चित्रपटात अनेक अ‍ॅक्शन सिन्स् आहेत आणि हा प्रत्येक सीन त्याने इतका सहज आपल्यासमोर मांडलाय की कोणत्याही क्षणी असं जाणवत नाही की, राणाला एका डोळ्याने दिसतच नाही. चित्रपटाचा नायक असणार्‍या प्रभासला तोडीस तोड काम राणाने या चित्रपटात केलं आहे. त्यामुळे ‘भल्लाळदेव’ ही खलनायिकी व्यक्तिरेखाही आता लोकप्रियतेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होऊ पाहात आहे. बाहुबाली हा मुळ तेलगू व तामीळ चित्रपट असला तरी त्याची गणणा सध्या हिंदी चित्रपट म्हणूनच केली जात आहे आणि त्यामुळेच पुढील काळात हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात आणखी एक लोकप्रिय खलनायक म्हणून भल्लाळदेवचा उल्लेख झाल्याशिवाय राहणार नाही, हे देखील तितकच खरं!!!


लक्षात राहिलेल्या मोजक्याच खलनायिका...
ज्याप्रमाणे चित्रपटात खलनायक असतो, तसचं काही चित्रपटात खलनायिका देखील असतात. अगदी जुन्या चित्रपटांपासून आत्ता आत्तापर्यंत अनेक चित्रपटात अशा प्रकारची भूमिका साकारताना नायिका आपल्याला दिसल्या असतील. पण यातही काही मोजक्याच व्यक्तिरेखा आपल्या लक्षात राहिल्या. खलनायिकांच्या बाबतीत असं लक्षात येतं की, त्या चित्रपटातील त्यांची व्यक्तिरेखा स्मरणात राहात नाही तर ती कोणी साकारली आहे ते अधिक जास्त स्मरणात राहतं. ‘गुप्त’ चित्रपटातील आपले प्रेम मिळविण्यासाठी कोणत्याही पातळीला जाणारी काजोल (ईशा दिवाण) आपण कधीच विसरू शकणार नाही. याच धर्तीवर ‘ऐतराज’ चित्रपटात आपल्या शारीरिक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अनैतिक विवाहबाह्य संबंधात नायकाला अडकवू पाहणार्‍या प्रियांका चोप्राने (सोनिया राय) तिच्या करिअर मधला एक वेगळा रोल या चित्रपटात साकारला होता. तिच्या या भूमिकेची त्यावेळी भरपूर प्रशंसाही झाली. याशिवाय उर्मिला मातोंडकरनेही ‘प्यार तुने क्या किया’ या चित्रपटात निगेटीव्ह रोल केला होता, पण तो तितकासा लोकप्रिय होऊ शकला नाही. 

नव नवीन प्रयोगांवर आरूढ होणार्‍या बॉलिवूडच्या येणार्‍या काळात आणखी किती नवे आणि लोकप्रिय खलनायक निर्माण होतील हे पाहणं अधिक औत्सुक्याच ठरणार आहे.
----