
'जनम जनम का नाता है गाय हमारी माता है' असे अतिशय श्रद्धा भावाने म्हणणाऱ्या हिंदूंच्या आस्थेला आम्ही कवडीची ही किंमत देणार नाही, हे जणू केरळच्या युवा कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शनिवारी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे कॉंग्रेसची वाटचाल नेमकी कोणत्या दिशेने होत आहे, हे गल्लीतील दुधखुळं बाळ देखील सांगू शकेल, त्यासाठी मोठा विचारवंत असण्याची आवश्यकता नाही.
परंतु या सगळ्या बाबी कॉंग्रेस पहिल्यांदाच करते आहे असे देखील नाही. ज्या पक्षाचे नेते हिंदूंच्या आस्थांची पायमल्ली करण्यात धन्यता मानतात, त्यांच्यासाठी हे सगळे काही नवीन आहे, असे मला वाटत नाही. 'मला गाढव म्हणा, पण हिंदू म्हणू नका' इथपासून ते 'तुम्ही स्वत:ला हिंदू म्हणवत असाल तर तुम्ही घोर कम्युनल आहात, जातीयवादी आहात' अशा संज्ञा रुजविण्यात यशस्वी झालेली ही मंडळी आहेत...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदूंच्या प्रतिकांपासून अंतर राखण्याचे राजकारण
स्वातंत्र्यपूर्व काळापासून हिंदूंच्या प्रतिकांपासून स्वत:ला दूर ठेवण्याचेच राजकारण कॉंग्रेसने केले आहे. आणि सर्वधर्म समभावाचा बुरखा चढवून लांगुलाचालानाचे राजकारण केले. भारताशी कुठलाही संबंध नसणाऱ्या खलीफासाठी सुरु केलेल्या खिलाफत चळवळीला दिलेला पाठींबा असो, किंवा केरळ मधील मोपल्यांच्या क्रुरकर्मी बंडाला धर्माचरणाचे दिलेले नाव असो, हे करत असताना देशातील बहुसंख्य हिंदूंना काय वाटेल? या प्रश्नाचा कधीही विचार केला गेला नाही. एव्हाना त्याला पायदळी तुडवीणे महात्मा गांधींसारख्या नेत्याला सुद्धा टाळता आले नाही.
नेहरूंची हिंदूद्वेषी नीती
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला, परंतु कॉंग्रेसच्या लांगुलचालनाच्या राजकारणामुळे, पाकिस्तान नावाची कायमची डोकेदुखी निर्माण झाली. देशातील बहुसंख्य समाजाचे मत विचारात न घेतल्यामुळे आजही त्या विषारी फळांचा परिणाम संपूर्ण भारत भोगत आहे. गांधी युगाच्या अस्तानंतर नेहरूंनी देखील हिंदू आस्थांची पायमल्ली करणारे राजकारण सुरु ठेवले. त्यामुळेच त्यांना सोमनाथ मंदिराच्या निर्माणामुळे देशाचा सर्वधर्म समभाव धोक्यात आल्याचे भासले होते. परंतु सर्वधर्म समभाव तत्वात बहुसंख्य समाजाची आस्था देखील विचारात घेतली पाहिजे याचा साक्षात्कार तेव्हा पासून आजपर्यंत कॉंग्रेसला झालेला नाही. या नितीलाच अनुसरून आजपर्यंत कॉंग्रेस पक्ष देशातील हिंदूंच्या आस्था पायदळी तुडवत आलेला आहे. म्हणूनच रामाचा जन्म खरच झाला होता का? असा प्रश्न कॉंग्रेसी बुजगावण्यांना पडला होता.
मुस्लीमांच्या लांगुलाचानाची कॉंग्रेसी परंपरा
वरील उदाहरणावरून कॉंग्रेसचा हिंदुत्व द्वेष स्पष्ट होत असला तरी देखील त्याचे कारण काय आहे? हे जाणून घेणे महत्वाचे ठरते. केवळ मुस्लिमांना खुश ठेवण्यासाठी त्यांची एकगठ्ठा मतं मिळविण्यासाठी कॉंग्रेसने ही नीती अवलंबली आहे. याशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही.
शहाबानो खटला याचे उत्तम उदाहरण आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी शाहबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा अवमान करत, फक्त मुस्लिमांच्या भावना दुखवू नयेत म्हणून चक्क कायद्यात तरतूद केली होती. शहाबानो नावाच्या मुस्लीम महिलेने पोटगी मिळावी म्हणून केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने तिला पोटगी मान्य केली होती. मात्र हे तथाकथित मुस्लिमांना मान्य नव्हते म्हणून राजीव गांधी यांनी थेट कायदा बदलला. ही लांगुलचालनाची परिसीमा कॉंग्रेसने गाठलेली आहे.
त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हिंदू समाजच्या आस्था कवडी मोल ठरल्या आहेत. म्हणूनच तर गौ रक्षणाचा कायदा बनविण्यास कोणतीही कॉंग्रेस सरकार पुढे सरसावलेली नाही. कारण त्यामुळे 'मुस्लिमांच्या भावना दुखावतील' याचीच काळजी घेण्यात त्यांनी धन्यता मानली. त्याच बरोबर गौ रक्षणाची भाषा करणाऱ्यांना जातीयवादी असा शिक्का देखील कॉंग्रेसी विचारधारेने मारला आहे. त्यास प्रतिगामी म्हणण्यात धन्यता बाळगली आहे.
२०१४ चा दारूण पराभव
मुस्लिमांसाठी पायघड्या घालणारी काँग्रेसी मंडळी असंख्य हिंदूंची आस्था असलेल्या राम सेतूला तोडायला पुढे सरसावली होती, त्यावेळी हिंदूंच्या भावना दुखावतील का? याचा साधा विचार देखील केला गेला नव्हता. कॉंग्रेसच्या या पद्धतीला कंटाळूनच देशाचा बहुसंख्य हिंदू समाज सक्षम पर्यायाच्या शोधात गेली अनेक दशके होता. तो पर्याय नरेंद्र मोदींच्या रूपाने २०१४ साली मिळाला, आणि म्हणूनच की काय एकेकाळी गल्ली ते दिल्ली सर्व राजकीय क्षेत्रे व्यापून टाकलेला कॉंग्रेस पक्ष केवळ औषधाला शिल्लक राहिला. ५१२ पैकी केवळ ४४ जागा जेमतेम जिंकू शकला. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांत सलग पराभवाचा सामना करून आज अस्तित्वाची लढाई लढत आहे. देशावर ६ दशके राज्य करणाऱ्या पक्षाची एवढी केवीलवाणी परिस्थिती होण्याचे मोठे कारण म्हणजे बहुसंख्य समाजाच्या आस्थांची पायमल्ली करणे होय. आजच्या नरेंद्र मोदी सरकारचा मुख्य अजेंडा संपूर्ण देश कॉंग्रेस मुक्त करणे आहे , परंतु नरेंद्र मोदी आणि भाजपपेक्षा देखील स्वत: कॉंग्रेसलाच भारत कॉंग्रेसमुक्त करण्याची घाई झालेली दिसते आहे. म्हणूनच तर कोट्यवधी जनतेच्या आस्थांची भरदिवसा कत्तल करण्याची चेष्टा त्यांनी केली असावी. याला 'विनाश काले, विपरीत बुद्धी' असे म्हणण्यापलीकडे दुसरी उपमा नाही.