दुर्ग भ्रमंती - सिंधुरत्न ‘सिंधुदुर्ग’

    26-May-2017   
Total Views |




 

महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या जलदुर्गांच्या रांगेतील सिंधुरत्न म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्ग हा एक महत्वाचा आणि मोक्याच्या ठिकाणी असलेला किल्ला आहे. जंजिरा किल्ल्यासारखाच मराठेशाहीचा ही जलदुर्ग असणे त्यावेळी आवश्यक होते. त्यामुळे समुद्रावर देखील मराठेशाही स्वतःचा अधिकार गाजवू शकणार होती. कोकणातील मालवणच्या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या ‘कुरटे’ बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर दृष्टीतून उभारण्यात आलेला हा जलदुर्ग मोक्याची जागा आणि भक्कम खडक पाहून बांधण्यात आलेला आहे.

मुंबई - पुणे शहरातून परिवहन महामंडळाच्या बसने अथवा खाजगी वाहन घेवून मालवणला जाता येते. तसेच मुंबईहून अथवा गोव्याहून रेल्वेने निघाल्यानंतर सिंधुदुर्ग किंवा कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरुन रिक्षाने किंवा बसने मालवणला जाता येते. त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते. बोटीने या सिंधुरत्नाकडे जात असताना मराठेशाहीत बांधण्यात आलेला जलदुर्ग किती भव्य आणि भक्कम होता, याचे प्रत्यक्ष दर्शन होण्यास सुरुवात होते.  

 

सिंधुदुर्ग किल्ल्याचा इतिहास :

छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवणच्या समुद्र किनार्‍याजवळील मोरयाचा धोंडा या खडकची पूजा करुन, या खडकावर किल्ला बांधण्यास सुरुवात केली. या किल्ल्याचे बांधकाम करण्यासाठी जवळपास ३००० पेक्षा अधिक कारागीर अहोरात्र काम करत होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण होण्यास तीन वर्षांचा कालावधी लागला होता. २९ मार्च १६६७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण झाला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्वत: किल्ल्यावर हजर होते. मराठेशाहीत बांधण्यात आलेल्या जलदुर्गाचा सर्वोत्तम नमुना म्हणून आजही या किल्ल्याकडे पहिले जाते.


इतिहासातील नोंदीनुसार राजाराम महाराजांनंतर कोल्हापूरच्या गादीचा कारभार महाराणी ताराबाई साहेब पाहत होत्या. त्यामुळे त्यावेळी झालेल्या वारणेच्या तहानुसार मालवण परिसराचा ताबा ताराराणींकडे आला. दरम्यान इस्ट इंडिया कंपनीचे कॅप्टन वॉटसन यांनी सिंधुदुर्ग किल्ला कंपनीच्या ताब्यात घेतला, आणि किल्ल्याचे नाव ‘फोर्ट ऑगस्टस’ असे ठेवले. त्यानंतर कोल्हापूरकर छत्रपती आणि कंपनी सरकार यांच्यामध्ये झालेल्या एका करारानुसार सिंधुदुर्ग पुन्हा मराठ्यांच्या अधिपत्याखाली आला. सिंधुदुर्ग किल्ल्यावर इ.स. १६९५ मध्ये राजाराम महाराजांनी शिवराजेश्वर मंदिर बांधले. पुढे इ.स. १९६१ साली महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारच्या मदतीने सिंधुदुर्ग किल्ल्यावर डागडुजी करण्याचे काम हाती घेतले.

 

सिंधुदुर्गाची भव्यता पाहून शिवकालीन बखरकार चित्रगुप्त यांच्या बखरीतील मजकूर आठवतो. (साभार बखर आणि इंटरनेट)

 

सिंधुदुर्ग जंजीराजगी अस्मान तारा |

जैसे मंदिराचे मंडनश्री तुलसी वृंदावन,

राज्याचा भूषण अलंकार |

चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न,

महाराजांस प्राप्त जाहले |”

 

 

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पहाण्यासारखी ठिकाणे :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात सिंधुदुर्ग किल्ल्यास फार महत्त्व प्राप्त झाले होते. जंजिरा किल्ल्यासारखाच मराठ्यांनी समुद्रात उभारलेला किल्ला म्हणून सिंधुदुर्गकडे पाहिले जात असे. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावरून किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळ जाताच समोर महादरवाजा दिसतो.

 

महादरवाजा : सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा ‘गोमुखी’ पद्धतीने बांधण्यात आलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा दोन बुरुजांच्यामध्ये लपलेला असल्यासारखा दिसतो. महादरवाजा नेमका कोठे आहे, ते किल्ल्याच्या जवळ गेल्याशिवाय लक्षात येत नाही. तसेच महादरवाजासमोर थोडी मोकळी जागाही आहे. या प्रकारच्या बांधकामास गोमुखी बांधकाम असे म्हणतात.

 

बुरुज : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजाच्या बाजूला असणारे बुरुज चिरेबंदी आणि भक्कम आहेत. या बुरुजावरून समुद्रावर नजर ठेवता येते. सिंधुदुर्ग किल्ल्यावर एकूण ४२ बुरुज आहेत.

 

नगारखाना : किल्ल्याच्या महाद्वारावर दगडात कोरलेली मारुतीची मुर्ती आहे. तसेच त्याजवळच वरील भागात नगारखाना आहे. त्याजवळच घुमट्या आहेत.

 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा : किल्ल्याच्या बांधकामाची पाहणी करत असताना ओल्या चुन्यामध्ये शिवाजी महाराजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा उमटलेला आहे. त्यावर घुमट्या बांधण्यात आलेल्या आहेत. छत्रपतीं शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या या ठशांची आजही पूजा केली जाते.  

 

जरीमरीचे मंदिर : महादरवाज्यामधून किल्ल्याकडे जात असताना, समोर जरीमरीचे मंदिर दिसते. या जरीमरीच्या मंदिरात जरीमरीची मुर्ती नसून तेथे केवळ एका चबुतरा आहे. मंदिर बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.

 

शिवराजेश्वर मंदिर : किल्ल्याकडे पुढे चालत जात असताना समोरच श्री शिवराजेश्वराचे मंदिर आहे. छत्रपती राजाराम महाराजांनी नावाड्याच्या वेशात वीरासनात बसलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा शिवराजेश्वर मंदिरात स्थापन केलेली आहे. स्वराज्याचे आद्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे हे एकमेव मंदिर आहे. मंदिरातील पूजा करण्याचा मान संकपाळ घराण्याकडे आहे. शिवराजेश्वर मूर्तीला पूजा केल्यानंतर सोन्याचा अथवा चांदीचा मुखवटा बसवला जातो. त्यामुळे मंदिरातील शिवराजेश्वराची मुर्ती अतिभव्य, सुंदर आणि उठावदार दिसते.

 

महादेव मंदिर : शिवराजेश्वर मंदिराच्या मागील बाजूस महादेवाचे मंदिर आहे. महादेवाच्या या मंदिरात महादेवाची एक पिंड आहे. महादेव मंदिराच्या परिसरात साखरबाव, दुधबाव आणि दहीबाव या गोड्या पाण्याच्या विहीरी आहेत.

 

छत्रपतींचा वाडा : दहिबाव विहिरीपासून पुढे गेल्यानंतर समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाड्याचे अवशेष नजरेस पडतात. छत्रपतींच्या वाड्याच्या शेजारी दऱ्या बुरुज आहे. या बुरुजास निशाणकाठी किंवा झेंड्याचा बुरुज असे देखील म्हणतात.

 

राणीची वेळा : दऱ्या बुरुजाच्या मागील बाजूस थोडेसे चालत गेल्यानंतर किल्ल्याच्या तटबंदीत एक छोटा दरवाजा आहे. त्यास दिंडीचा दरवाजा असे म्हणतात. या दरवाजामधून बाहेर आल्यानंतर एक चंद्रकोरीच्या आकाराची पुळण दिसते. त्या पुळणीस ‘राणीची वेळा’ असे म्हणतात. असे म्हणतात की, महाराणी ताराबाई या ठिकाणी समुद्र स्नानासाठी येत असत.

 

चुन्याचा घाणा : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधणी वेळी उभारण्यात आलेला चुन्याचा घाणा आजही किल्ल्याच्या परिसरात तसाच आहे.

याशिवाय सिंधुदुर्ग किल्ल्यावर काही देवी देवतांची मंदिरे आहेत. भगवती देवीचे मंदिर, मारुतीचे मंदिर आणि महापुरुष मंदिर आहे. तसेच आजच्या दिवशी सिंधुरत्न सिंधुदुर्ग किल्ला सुस्थितीत नसला तरी देखील अवशेष रुपात मराठेशाहीचा साक्षीदार म्हणून उभा आहे.

 

स्कुबा डायव्हिंग : किल्ल्याच्या परिसरात समुद्रामध्ये स्कुबा डायव्हिंग करता येते. यासाठी अनेक पर्यटक याठिकाणी येत असतात.

 

सिंधुदुर्ग महोत्सव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास २०१६ साली साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे महारा़ष्ट्र शासनाच्या पुढाकाराने सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 

मराठेशाहीच्या इतिहासात उभारण्यात आलेल्या या जलदुर्गास सिंधुरत्न (अरबी समुद्रातील रत्न) असे म्हणता येईल. शेवटी मराठेशाहीच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेल्या या जलदुर्गास एकदा तरी भेट देवून आपण येथील इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे, असे वाटते.

– नागेश कुलकर्णी

 

नागेश कुलकर्णी

इंजिनियरिंग (E&TC ) शिक्षण पूर्ण. एम.सी.जे चा डिप्लोमा. चालू घडामोडींवर लिखाण, विशेष  करून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषयांवर सविस्तर लिखाण. चाणक्य मंडल परिवारच्या साप्ताहिक स्वतंत्र नागरिक आणि मासिकासाठी लिखाण केलेले आहे.
तसेच उत्तम कवि, फोटोग्राफर, दुर्ग पर्यटक आणि अभ्यासक.